Aug 31, 2018

विरहिणी

सहस्र किरणे तुझी वपुवरी किती झेलली
कठोर छळ तो तुझा दिनकरा अतीनिर्दयी
किती सहन ते करू प्रियतमा तुला लाभण्या
कशास झटले? कुठे हरवले, तुला शोधण्या?

हजार गुरु ते अनंत विधि ते तुला पावण्या
अमाप कवने सहस्र जप ते तुला स्तोमण्या
दुजे न मजला मला न दुसरे मनी स्वप्निही
तुझी मखमली झुळूक मनसा सदा वेडवी

खुशाल फिरले उगा भटकले पतंगापरी
मही उलथली नभा थडकले तुझ्या दर्शनी
अनंत गिरि ते असीम उदधी किती आयु ते
उगा बरसले किती नयन रे तुझ्या आठवी

दिनी निशिदिनी किती विरह तो तनू कष्टली
गहाण मम बुद्धि आणि प्रतिभा किती गंजली
दिनी निशिदिनी वृथा समय तो मती भ्रष्टली
समस्त घटिका तुला मिळवण्या कुठे अर्पि मी?

पुरे तव विधी, पुरे कवन कर्मगाथा तुझी
पुरे कवतुके, पुरे सकल गर्व पाढे तुझे
पुरूष जर तू अता अवतरी क्षणार्धी नरा
असेल जर प्रीत ती प्रियकरा मिठी घे मला

No comments:

Post a Comment