Oct 29, 2018

मनाचे कोडे

सांगा त्याचे कुठले कोडे ?
काय शोधते, उगाच वेडे ?   धृ.

दटाविले तरि शांत बसेना
सावरले तरि स्थिर असेना
पाया पडलो तरि ऐकेना
हट्टी वेडे फिरे चहुकडे  १. 

राबराबलो तरी थकेना
दमून गेलो ते झोपेना
सकाळ झाली तरी उठेना
नियम तयाचे, कुठले वेडे ?  २.

स्वर्ग लाभला परि करमेना
सुखात बुडलो तरी हसेना
भरून गेलो तरी रिकामे
सांगा त्याचे, कुठले कोडे ?  ३.

बालत्वी कधी घोर निराशा
सुंदर काया तरी हताशा !
वृद्धत्वी कधी अनंत आशा
सुरकुतले तरि हसते वेडे  ४. 

समाधान का नकोच त्याला ?
असलेले का दिसे न त्याला ?
नाही त्याचा पाठपुरावा
काय शोधते, उगाच वेडे ?  ५ .

Oct 22, 2018

चांदणी रात

आभाळी मेघ दाटले दीस मावळे
क्षितिज पहुडले ढगांच्या दारी
अस्पष्ट चांदणी हसे मेघ सावळे, दूर माघारी

रेतीत चमकती हिरे शंखशिंपले
रंग उधळले रुपेरी घाट
ते स्वप्न नव्हे तो हाट शशिचा थाट, चांदणी वाट

नीर शुभ्र विमल झळकते उगा भिरभिरे
क्षणी भरकटे पसरते गूढ
ते नीर नव्हे मदमत्त रतीचे नेत्र, धुंदली रात्र

चांदणे समुद्रावरी धरी अवतरी
तळपती नभी अप्सरा गगनी
मज आवडते सुंदरी जरी अजनबी, ढगांची परी  

तो तारपुंज गगनात पाही पाण्यात
हालते बिंब सागरी लहरी
नभ सोडून लाटेवरी चंद्रमा धरी , शुभ्र चांदणी

Oct 16, 2018

दूर देशी दूर गावी

ठेच त्याला लागली की रक्त माझे सांडते
दु:ख त्याला स्पर्शिले की नेत्र माझे वाहिले 

राहतो तो दूर देशी भासतो माझ्या मना
हासतो तो दूर गावी मोद का माझ्या तना?

अंधकारी सूर्य त्याचा मध्यरात्री जागतो
पूनवेला चंद्र त्याचा अर्धरात्री झोपतो

दूर देशी दूर गावी मित्र माझा राहतो 
पाश वेडे त्यागुनी तो ध्येय त्याचे शोधतो

चार मासी बर्फ त्याच्या आसमंती शोभते
आठ मासी ना हिवाळा स्वर्ग तेथे अवतरे 

बर्फ त्याच्या दूर देशी गारठे माझी तनु
रात्र त्याच्या दूर गावी चांदणी माझी वपु

बांधवांना सोडुनी तो दूर देशी राहतो
पत्र नाही वृत्त नाही काळ माझा गोठतो

दूर देशी दूर गावी मित्र माझा राहतो 
पाश वेडे त्यागुनी तो ध्येय त्याचे शोधतो 

दीस येती दीस जाती वाट त्याची पाहते
आठवांची वादळे ती, का कशाला? ना कळे

रेशमाचे पाश वेडे आर्तता आक्रंदते
भेट नाही वर्ष झाली चित्त का आक्रोशते?

गाठ नाही त्या सख्याची आज वाटे एकटे
भास त्याचा ना पुरे, तो सारखा का आठवे?

दूर देशी दूर गावी मित्र माझा राहतो 
पाश वेडे त्यागुनी तो ध्येय त्याचे शोधतो