Aug 12, 2018

स्वप्नातली

(वृत्त मंदाकिनी)

येशील का माझ्यासवे स्वप्नामधे मंदाकिनी?
माळीन मी केशी तुझ्या चंपाकळी गे सुंदरी. 

त्या रक्तरंगी भानवा, हेवा तुझा वाटेल का?
गालावरी लज्जा तुझी, का रक्तिमा वेडावली?

तू उर्वशी, तू मेनका, तू अप्सरा, तू राधिका,
त्या चंद्रवर्णी तारका, आभा तुझी पीतील का? 

तो मख्मली शालू तुझा, ती वेलबुट्टी जांभळी,
ते लाजणे हास्याविना, ना शोभते ओठी तुझ्या.

देशील का काही क्षणांची साथ तू ह्या प्रेमिका?
स्वप्नी तुझ्या काही क्षणी माझीच तू होशील का? 

सांगे मला स्वप्नातले ते गोड कोडे चंचले,
सारी मनीची वादळे, सारे मला तू सांग गे.

स्वप्नातल्या गे कल्पने, सत्यामध्ये येशील का?
माझ्या मनीची आस तू, आभास तू, हव्यास तू!

स्वप्नातल्या वेड्या मना, स्वप्नामधे गुंगू नको,
मंदाकिनीचे वेध ते, जागेपणी पाहू नको.

No comments:

Post a Comment