Dec 30, 1985

शब्द

रंग डाळिंबी पाकळ्या कुठे उमलूं नको रे
फक्त तुझ्या माझ्यामधे उडूं देत ही पांखरे

त्यांच्या जहरी तेजाला असे कांति यौवनाची
झळाळ त्या अन् शालूला ऊल गर्भरेशमाची
त्यांची एकच भरारी आकाशाला चेताविते
परि लाघवा तयांच्या घुमी अबोली हांसते
त्यांच्या छचोर गतीला नको विश्वाचे भरारे
फक्त तुझ्या माझ्यामधे उडूं देत ही पांखरे

त्यांच्या चांदोळ्या रंगाला झील हवी चंद्रिकेची
हेमरंगी अन् पंखांनी झूल झूलो कौमुदाची
आणि गव्हाळ अंगांगी लव्हाळल्या भावनांना
कुस्ककुस्कर ती हवी त्यांच्या अस्पर्श्य स्पर्शाची
रसरंगात्मक गंध त्यांचा उधाणून दे रे
फक्त तुझ्या माझ्यामधे उडूं देत ही पांखरे

त्यांच्या रवाळीं उन्मेषें स्वर्ग पापण्यां भिडतो
त्यांचा गंभीर गोलवा ब्रह्मपुरामधे नेतो
धीर गंभीर नादाने अंग उभारुंन जाते
आणि स्मृतीचे पांखरूं त्याचा प्रतिध्वनि गाते
मंद हुंकारांचा गाभा नेतो अनंत आकाशी
विरतो अन् पट तेथ धुंद निर्वैर विदेशी
त्यांच्या निस्वर अस्तित्वा पुन्हा सांकारू नकोरे
फक्त तुझ्या माझ्यामधे उडूं देत ही पांखरे

...'शब्द' सायाळ रे तुझे...पुन्हा बोलके नको रे
अनंताच्या निर्द्वन्द्वांत रेंगाळली ती पांखरे