Dec 15, 2018

मी जळत होते

मी जळत होते, ते बघत होते
मनात मात्र सगळ्यांच्या 
वेगवेगळे विचार चालू होते

जन्मास आलेला मरतोच! हे माहीत असूनही,
"किती अघटित!" असे म्हणून काही रडत होते
थोरला मुलगा चितेत चंदनाची लाकडे घालत होता
धाकटा मुलगा मनात इस्टेटीची वाटणी करत होता
मुलगी दहाव्याच्या आमंत्रणांची यादी करत होती
सून "सासूबाईंच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या
काढायला हव्या होत्या का?" ह्याचा विचार करत होती
गुरुजींना मात्र विधी उरकून दुसरीकडे जायची घाई होती

लाकडे चंदनाची होती, तरी मला जाळतच होती
सुगंधी असली तरी देहाला चटकाच देत होती 
मला नव्हते श्वास ना प्राण ना हृदयाची धडधड ना हुंदके
पण इतरांचे मन वाचण्याची ताकद होती काही क्षणांसाठी

कुणी धाय मोकलून रडत होते, तर कुणी
काय बोलावे न समजल्याने गप्पच होते
कुणी "सगळं ठीक होईल," असे खात्रीने सांगून
रडणा-यांची समजूत काढत होते, तर कुणी
आपलेही कधीतरी हेच होईल, ह्याची चिंता करत होते

मी जळत होते,
निखारे विझण्याची वाट बघत होते
गार गार मातीला कडकडून भेटण्यासाठी
अधीर झाले होते 

Dec 13, 2018

नवीन गाणे

नवीन गाणे गाण्यासाठी नवा सूर लाभू दे 
त्या गाण्याला जुन्या सुरांची चाल नको लागू दे

सप्त सुरांचे ताल लयीचे कुंपण त्यास नसू दे
शास्त्राचे वा रागाचेही बंधन त्यास नसू दे

आशेच्या स्वप्नांची मंजुळ हाक ऐकू येऊ दे
त्या हाकेला साद घालण्या प्रतिभा मज लाभू दे

नवीन गाणे गाण्यासाठी नूतन शब्द स्फुरू दे
त्या शब्दांची नाजूक सुंदर कविता एक बनू दे

त्या कवितेच्या चालीवरती अंतरंग नाचू दे
हृदयामधला तरल भावही सुरांमधे उमटू दे

नसेल श्रोता कुणी तरीही गाणे ते झुळझुळू दे 
निर्जन वाटे गाता गाता नादसागरा मिळू दे 

Dec 11, 2018

जर तर

ती जर भाजी असती तर
पडवळ झाली असती
सरळ जातानाही उगाचच
वाकड्यांत शिरली असती

ती जर फूल असती तर
ब्रह्मकमळ झाली असती
एकोणतीस फेब्रुवारीला उमलून
कोमेजून गेली असती

ती जर नदी असती तर
सरस्वती झाली असती
कुणालाच काहीही न सांगता
उगाचच गुप्त झाली असती

ती जर ती नसती तर
दुसरी कुणी असती
कशीही असली तरी
डोक्याला भुंगाच लावून गेली असती

ती जर, ती तर
जर तर, जर तर ची
कटकट जर नसती तर
ही कविताच लिहली नसती

Dec 3, 2018

तेही तयाचेच देणे

माझ्या निर्गुण देवाला
सोन्या-चांदीचे वावडे
नको घालू उगा त्याला 
हार मोत्यांचे रत्नांचे  

नाही पारोसा तो देह
नको अभिषेक स्नान
नाही मागितले त्याने
गंध पुष्प पंचामृत  

तुझ्या स्तोत्र आरतीने
किटतील त्याचे कान
तुझ्या विद्युत मालेने
भाजतील त्याचे हात  

ज्याच्याकडे आहे सारे
त्याला काय तू देशील?
तुझी देवाण-घेवाण
कशापायी अट्टाहास?  

देव निस्पृह मनीचा 
नको काही तुझे त्याला
तुझ्या माझ्या मनी त्याचा
भास डोळे मिटताना  

असे काय तुझ्याकडे,
की जे, त्याने नाही दिले?
मनातील भक्तीभाव 
तेही तयाचेच देणे  

Nov 29, 2018

लुचपतनगरीत

कुरतडलेल्या पोत्यातले
खंडीभर गहू घेतले
उंदरांच्या लेंड्यांसकट
गावभर फेकून दिले.
थवा आला पक्ष्यांचा
अन्नावर तुटून पडला
चिवडून चिवडून दाण्यांचा
क्षणार्धात फडशा पडला.

पक्ष्यांची फौज मोठी
हावरट साले निर्लज्ज कुठले
सात जन्मांचे उपाशी जणू
भस्म्या झाल्यागत खाऊ लागले.
कुणी मंत्री, कुणी मुख्याध्यापक, 
कुणी बिल्डर, कुणी पोलीस...
अरेरे! सांगायलाही लाज वाटते,
त्यात एक "गुरुजी" पण होते.

कुणी कष्टाने दाणे मिळवत होते
पोटासाठी, शिक्षणासाठी,
औषधासाठी, संसारासाठी.
कुणी दाणे ओरबाडत होते
मस्तीसाठी, गाड्यांसाठी,
रेससाठी, जुगारासाठी.

लुचपतनगरीत, आशा ती कसली?
तरीही, धीर धरा, थांबा थोडे.
कुणी सांगावे, उद्या काय असेल?

एक दिवस असा येईल, 
त्या कुरतडलेल्या पोत्यातले
कणन् कण विषारी बनतील.
अन् त्या पक्ष्यांच्या फौजेतील
सगळे लाचखोर पक्षी क्षणार्धात
बेशुद्ध पडतील. कशासाठी?
एका निष्पाप बाळाच्या
उज्ज्वल भवितव्यासाठी.

Nov 22, 2018

आमचं - तुमचं

आमचं कसं शिस्तीत होतं                       तुमचं कसं बेशिस्त असतं 
आम्ही पहाटे उठायचो                           सकाळी उशीरा उठायचं 
बाबांना अहोजाहो करायचो                    बाबांना अरेतुरे करायचं 
आईचं  ऐकायचो                                 आईचं, आणि ऐकायचं?
उलट नाही बोलायचो                            सुलट नाही बोलायचं 
शाळेत गप्प बसायचो                            शाळेत बेताल वागायचं 
गुरुजींचे रट्टे खायचो                              बाईंचं डोकं खायचं
रात्री पाढे, पावकी, निमकी,                    रात्री फेसबुक, इमेल, 
स्तोत्रे, आरत्या म्हणायचो                        इंटरनेट चाळायचं 
पार्टीसाठी घरामध्येच                             पार्टीसाठी हॉटेलात 
शिरा पुरी खायचो  १.                             नूडल्स बिडल्स खायचं  २.

आमच्या काळी - हे होतं, ते होतं, असं होतं, तसं होतं, हे चालायचं, ते नाही चालायचं ...
तुमच्या काळी - हे नाही, ते नाही, काहीही आहे, सगळंच चालतं, सगळंच भारी असतं   ३.

आम्ही कधी                                        तुम्ही कधी 
उपाशी पोटी झोपलो                             एकटे वाटून झोपता 
दु:ख छातीवर झेललं                             दु:ख आल्यावर पाठ फिरवता
सवयीने एकत्रच राहिलो                         स्वातंत्र्यासाठी एकटेच रहाता
कीर्तन, पुराण ऐकलं                             योगा, विपश्यना क्लास लावता                                  
कठीण परिस्थितीत                               कठीण परिस्थितीत
देवाचं ध्यान केलं  ४.                             मानसोपचारतज्ञाकडे जाता  ५. 

आम्ही - नाटकं पाहिली, चित्रपट पाहिले, गावभर फिरलो, हसलो, रडलो, जगलो
तुम्ही - सोशल मिडीया पहाता, मूव्ही पहाता, जगभर फिरता, हसता, रडता, जगता  ६.

आमचं कसं - तुमचं कसं, असा काथ्याकूट पिढ्यान् पिढ्या होतो
शेवटी, कुणाबरोबर तरी किंवा एकटेच, तुम्ही-आम्ही दोघंही जगतो
तान्हेपणी आई दिसली नाही तर भोंगा पसरतो
मोठेपणी इजा झाल्यावर “आई गं,” म्हणून कण्हतो
मोठे संकट आल्यावर कुणापुढे तरी मदतीसाठी हात पसरतो
देवाला, डॉक्टरला, आईला, मित्राला, कुणाला तरी शरण येतो  ७. 

देव असो वा नसो, डॉक्टर असो वा नसो,
एकटे असू, दुकटे असू, तुम्ही-आम्ही अचानकच मरतो
वरवरचं वागणं दूर केलं तर, आमचं-तुमचं,
आपलंच म्हणूया, नक्की काय वेगळं असतं?  ८.