Jan 31, 2020

पाळीव


माझ्याकडे कुत्रा नाही 
माझ्याकडे मांजर नाही 
नाही म्हणायला गुंड्याएवढे 
गोंडस दु:ख कुरवाळते मी
 
जाईन जिथे तिथे लगेच 
स्वामिनिष्ठ मागे येते 
शेपूट हलवत गबाळे ते 
लाळ गाळते रस्त्यामध्ये

मी सोडून दिसता कोणी 
केविलवाणे भुंकत बसते 
दुसरे दु:ख दिसता क्षणी 
घाण त्याची हुंगत बसते

माझे दु:ख त्याचे दु:ख 
तिचे दु:ख सारेच दु:ख 
म्हणता म्हणता सगळीकडे
शोकसभा रंगत जाते 

काल होते त्यापेक्षा 
आज दु:ख मोठे होते 
लालन पालन करून त्याचे 
मीच त्याला मोठे करते

खाल्ल्या मीठास जागे राहून 
ते बिचारे साथ देते 
शेपूट हलवत जेथे तेथे 
माझ्याच मागे धावत बसते