May 31, 2020

नाकी नऊ येतात कसे ?

बांधकामाचे रिकामटेकडे एक बिल भरण्याआधी थकून गेले, थकून गेले
थकले बिल एका फायलीत वर्षोंवर्षे पडून राहिले, पडून राहिले
म्हणता म्हणता एका गठ्ठ्यात ती फाईल तुंबून गेली, तुंबून गेली
पाच वर्षांनी एका बाईला स्वच्छतेची हुक्की आली, हुक्की आली
हुक्की येता त्या बाईने अनेक फायलींचे ढीग उपसले, ढीग उपसले
ढीग उपसून धूळ झाडत डोळे चोळत खोकत बसली, खोकत बसली
खोकत बसता हाफिसामध्ये करोनाची अफवा पसरली, अफवा पसरली
अफवा पसरून मोठी झाली सा-या गावात दहशत बसली, दहशत बसली
दुस-या दिवशी हाफिसामध्ये कर्मचा-यांनी दांडी मारली, दांडी मारली
दांडी मारल्यावर तुकडे पडून कुठे पडली माहीत नाही, माहीत नाही
असे आमच्या रस्त्यांमधले बांधकाम अडले, बांधकाम अडले
खड्ड्यांत पडून माझ्यासकट दहा जणांचे पाय मुरगळले, पाय मुरगळले
मुरगळलेल्या पायांचा तो श्वास कसा कोंडून गेला, कोंडून गेला
मैत्रीणीचा फिजिओ मुलगा न बोलवता देवासारखा धावून आला, धावून आला
व्यायामाने मुरगळलेला पाय माझा मोकळा झाला, मोकळा झाला
पाय मोकळा झाल्यानंतर फिजिओवाल्यास शिंगे फुटली, शिंगे फुटली
शिंगे फुटून भलतेच मोठे बिल त्याने टेकवून दिले, टेकवून दिले
भारी बिल भरता भरता गरीब बिचा-या माझ्या नाकी नऊ आले, नऊ आले
नाकी नऊ येतात कसे नातवंडाने मला विचारले, मला विचारले
बांधकामाचे थकलेले बिल फायलीत तुंबता रस्त्यात पडून पाय मुरगळून
फिजिओमुळे नाकी नऊच येतात कसे त्याने पुसले, त्याने पुसले

May 23, 2020

अ न सर्टनटी


अनसर्टनटी

अनसर्टनटी डोक्यावरती
तलवार टांगते सर्टनटीने, अनसर्टनटी

अनसर्टनटी डोक्यामधले
खाते दाणे पिते पाणी
भलतीच फुगून डोक्यावरती
वाटते मिरे, हिंमत हरे, अनसर्टनटी

अनसर्टनटी जाण्यासाठी
माणूस बांधतो घरटे बिरटे
थोडे सर्टन झाले तरी
येते दुसरी अनसर्टनटी, अनसर्टनटी

अनसर्टनटी डोक्यामध्ये
करते प्रश्नांची सरबत्ती
उत्तर पुसता धूर सोडून
बनते डोक्यातली उदबत्ती, अनसर्टनटी


अन् सर्टनटी

अन् सर्टनटी पुन्हा पुन्हा
रोज रोज तेच तेच देते जगणे, ती सर्टनटी

ती सर्टनटी ज्याच्या दारी
जगणे त्याचे बोरिंग होई
ती सर्टनटी कंटाळवाळी
रोज रोज तीच तीच पोळी भाजी, ती सर्टनटी

ती सर्टनटी जगण्यामध्ये
ती सर्टनटी नोकरीमध्ये
कालच्या पाट्या पुन्हा टाकून
डोके फिरते, उबग येते, ती सर्टनटी

अनसर्टनटी अन् सर्टनटी जगण्यामध्ये
सवती सवती कटकट करती
एकीस धरता दुसरी चिडते
डोस्के धरून छळ छळ छळते,अन सर्टनटी