Jan 31, 1982

काळाची खिलारें

दुडुदुडु धांवताती बघ काळाची खिलारें |
स्मरणांच्या मऊ गाथा पाय धुलीवरी कोरे ||

खूण धुळीची जास्वंदी घंटा घणती घणाणा |
प्रेममाखाल्या पेंद्यांच्या हांकारती त्यांना ताना ||

किती पर्णे पुष्पे फले आस्वादिली रानीवनी |
रान राहिले तें मागे रेंगाळल्या आठवणी ||

रेंगाळल्या आठवणी रात्री करिती रवंथ |
उद्यासाठीं पुढे आहे सदा निराळाच पंथ ||

कशी खट्याळ धांवती बघ काळाची खिलारे |
रेंगरेंगाळती मागे आठवणींची खिलारे ||