Dec 12, 1987

वेधसच्या मुंजीची मंगलकवने

वंदोनी गणराज मंगलमया कोळेश्वरा पूजुनी |
प्रार्थूया अदितीस वामन तसा राहो मनी सांठुनी ||
पुण्याचे विधि वंद्य पूर्वज तयां घेऊ सुखे आठवी |
आरंभू शुभकार्य अद्य सुदिनीं प्रार्थू मनी तो रवी ||१||

विद्या त्या किती एक नांदति सुखे बाळा जरी भूवरी |
ज्या लागीं सुख वाटण्यास श्रमती नाही तया जाणती ||
वेदांचा सुविरम्य हाचि महिमा बोध्यासि जे वेधिती |
खावोंनी मग ते रवंथ करणे ज्ञानार्जना पद्धति ||२||

स्वानंदे करुनी गुरूसी जवळी सेवोनि त्यां तुष्टवी |
प्रेमाने विधिरूप वेद पढुनी चित्तप्रसादा करी ||
संध्येचे व्रत आचरोनि सविता अर्घ्ये जपे तोषवी |
अग्नीसी समिधेस अर्पुनि महा तेजास बा मेळवी ||३||

शाळेचा दणका जरी झगडतो मौंजीव्रता मोडण्या |
युक्तीने परि हो सुदक्ष कुमरा लक्ष्यास त्या गांठण्या ||
कालाचा महिमा अगाध म्हणुनी पंकात नाही फसू |
तेजासी समशक्ति द्रव्य नसते सत्यासि बा या स्मरू ||४||

दाक्षीच्या तनयास मंगल जसे मौंजीत या वामना |
व्यासेया शुभकार्यी मंगल तसे होवी अशी प्रार्थना ||
दौहित्रा कपिलांस मंगल जसे स्वायंभुवे कल्पिले |
सद्भावे तुजसाठी प्रार्थुनि तशी गाऊ सुखे मंगले ||५||

शुभमंगल सावधान
(फाल्गुन शुद्ध द्वितीया, शके १९०९)