Jul 15, 2022

कळले न मजला सरले कधी ते


कळले न मजला सरले कधी ते
तारुण्य अवघे दारात होते
आयुष्य माझ्या मुठीत होते
अशक्य तेंव्हा काहीच नव्हते

म्हणतात कोणी दिन ते हरवले
किती रम्य आनंद देवून गेले
कधी कदापि सुख दु:ख अश्रू
नयनांत माझ्या थबकून गेले 
 
जुळले अनंत सौहृद्य बंध
तुटले कितीदा उगाच मित्र
संदर्भ त्यांचे मोडीत गेले
तरीही कितीसे शिकवून गेले

आले किती अन् गेले किती ते
हिशेब त्याचा न मांडला मी
उद्या न जाणो काही कुठेही
घडेल कसेही हे जाणिले मी

आरशात माझे रुपडे बदलले
म्हणतात सारे वयही उलटले
माझ्या मनातील तरंग मात्र
कधी न विरले, वृद्धीत झाले

आहेत अजुनी कित्येक दिन
मनात माझ्या उल्हास आणि
सुख दु:ख ठोकारून मी पहाते
स्वप्ने अजूनही कित्येक मोठी

Jul 14, 2020

एक पृथ्वी वाटोळी


एक पृथ्वी वाटोळी
अंगावरती पाणीच पाणी
ज्वालामुखी पोटात घेऊन  
कशास फिरते ? ठाऊक नाही !

एक पृथ्वी वाटोळी
अधांतरी -अंतराळी
गोल फिरत बसते तरी
दमत नाही बापुडी

एक पृथ्वी वाटोळी
पाठीवरती डोंगर दरी
दरीत तिच्या संध्याकाळी
गरगर  फिरते पाकोळी

एक पृथ्वी वाटोळी
खनिजे तिची माणूस काढी
झाडे तोडून डोंगर पोखरून
अंतराळात धूर सोडी

एक पृथ्वी वाटोळी
काही कारण नसले तरी
अंगावरचा प्लॅस्टिक कचरा
गरीब बिचारी सहन करी

एक पृथ्वी वाटोळी
आई आपल्या सर्वांची
खूप चुकले आपले तर
वणवा, पूर, दुष्काळ देई

एक पृथ्वी वाटोळी
लेकरे तिची सजीव प्राणी
अब्ज अब्ज जीवांमध्ये
मी कोण ? कुणीच नाही !

एक पृथ्वी वाटोळी
मी जरी कुणीच नाही
एका क्षणी माझे दु:ख
सारे आभाळ फाडून जाई

Jun 21, 2020

फेसबुकचे एक पान

एक मिक्स व्हेज लोणच्याची रेसिपी,
एक आडवेतिडवे झोपलेले मांजर,
एक आमरसाने चेहरा माखलेले बाळ,
कुठे ब्लॅक लाईव्हज् मॅटर--असे ओरडून सांगणा-या
अमेरिकेतल्या आंदोलनांचे व्हिडेओज्,
एक मोदींचे सात वर्षांपूर्वीचे मल्याळी भाषेत डब केलेले भाषण,
एखादी नैराश्याने आत्महत्या केलेल्या सिनेतरुणाची हृदयद्रावक कथा,
कुठे आर्मीतल्या जवानांना वाहिलेल्या श्रद्धांजलीची छायाचित्रे,
कुठे “चॅलेन्ज अ‍ॅक्सेप्टेड” म्हणत ठेवलेले विविध वयोगटातील महिलांचे पैठण्या घातलेले दागदागिन्यांनी नटलेले फोटो,
कुठे पोट खपाटीला गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या शोककथा,
कुठे करोनाग्रस्त पेशंटचे झालेले हालहाल,
कुठे नोकरी गेलेल्या तरुणांच्या कथा,
कुणाचातरी योगा क्लासमध्ये घातलेल्या शिर्षासनाचा फोटो,
एखादा ऑनलाईन जिमचा क्लास,
अमुक धर्म कसा श्रेष्ठ तमुक धर्म कसा वाईट ह्यावरची
उलट सुलट चर्चा, टीका, आरोप, प्रत्यारोप,
कुणाचेतरी झुमवर लग्न केल्याचे फोटो,
कुठे पूर, वादळ, टोळधाड झाल्याची बातमी,
कुठल्यातरी झाडावर रॉबिनने बांधलेल्या घरट्याची माहिती
आणि त्यातल्या निळया अंड्यांचे फोटो,
बारके बारके मिनीटभराचे नानाविध विषयांवरचे शंभर एक व्हिडीओ ,
कुठे धेडगुजरी मराठीतले साहित्य, कविता, चारोळी, पांचट विनोद,
कुठे राज्यकर्त्यांचा फालतू कारणासाठी उदोउदो
किंवा त्यांची बिनपाण्याने केलेली हजामत,
कुठे मोकळ्या आकाशाचे, कुठे निसर्गरम्य सूर्योदय-सूर्यास्ताचे,
कुणाच्या बागेतील झाडांचे, फुलांचे सुरेख फोटो,
कुठे सुगरणीचा खोपा, कुणाचे दोन मिनीटांचे शास्त्रीय संगीत,
कुठे झुणका भाकरीचा, टपरीवरील कटिंग चहाचा फोटो,
कुठे मित्रमैत्रीणींचे हादडतानाचे, फिरतानाचे, देशोदेशी काढलेले फोटो..
कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलेले शेकडो मेसेजेस्
आणि त्यानंतर“थॅन्क यू एव्हरीवन” म्हणून आलेली पोस्ट, बिलेटेड बर्थडे पोस्ट, लाईकला लाईक, लाईकच्या लाईकला लाईक, इमॉटिकॉन, चेहरे,चेहरे,चेहरे,....पोस्ट,पोस्ट,पोस्ट,...
……
फेसबुकवरच्या पानावरील अशा क्षणोक्षणी पब्लिश होणा-या,
लाईक मिळणा-या, कॉमेंटस् मिळणा-या, न मिळणा-या, संपूर्ण दुर्लक्षित केल्या गेलेल्या,फॉर्वर्ड केलेल्या असंबंधित पोस्टस् वरून पाच मिनीटे नजर फिरवून, कर्सर पुढे ढकलत ढकलत, इंटरनेटच्या भीतीदायक विळख्यात सापडलेली मी स्वत:ची एक पोस्ट ठेवून कुणी वाचतंय का असे भिकारड्यासारखे जेंव्हा चेक करत बसते तेंव्हा मलाच माझी कीव येते.
आणि ह्या असंबंधित घटनांच्या मागे लपलेली एक गोष्ट सहजासहजी लक्षात येते: माणसाचे एकाकीपण, कुठेतरी आपणही आहोत असे सांगण्याची धडपड कुठेही आणि कशातही असू शकते- एखाद्या पाककृतीत, एखाद्या कलाकृतीत, एखाद्या बाळाच्या फोटोत, एखाद्या टीकेत, एखाद्या लाईक मध्ये, एखाद्या सूर्योदयाच्या फोटोत,साईबाबांच्या आवडलेल्या एखाद्या प्रार्थनेत, किंबहुना फेसबुकच्या प्रत्येक पोस्टमधे !

Jun 9, 2020

सुविचार आणि मी


आमच्या सोसायटीच्या फलकावर रोज किमान एक तरी सुविचार अथवा म्हण सुवाच्य अक्षरात तुम्हाला वाचायला मिळेल. तो दिवस होता आशेच्या किरणांचा. मनास उभारी यावी असा. सकाळी सकाळीच एक पॉझिटिव्ह सुविचार फलकावर वाचला : “दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या व्यक्तींचे नुकसान होत नाही.”
इतर काही वेळी असेच कित्येक सुंदर आशादायी विचार त्या फलकावर वाचायला मिळतात. उदाहरणार्थ :
“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.”
हाती घ्याल ते तडीस न्याल.”  
“आपला हात जगन्नाथ.”
“कर नाही त्याला डर कशाला?”
“चार दिवस सासूचे,चार दिवस सूनेचे.” 
“छ्डी लागे छमछ्म विद्या येई घमघम.”
“लाथ मारेन तिथे पाणी काढेन.”
अरे वा ! काय सुंदर विचार आहे हा-लाथ मारेन तिथे पाणी काढेन ! केवढा हा आत्मविश्वास ! असे काहीसे वाचले की आपोआप माझ्या अंगावर मूठभर मांस चढते. मी स्वकर्तृत्वावर फार हुरळून जातो. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या दिवशी “दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या व्यक्तींचे नुकसान होत नाही,” हा विचार वाचून पॉझिटिव्ह ऊर्जेने माझे अंग सळसळू लागले. ढगाळ दिवस असूनही आपण सोनेरी किरणांनी न्हातोय की काय असे वाटू लागले. रस्त्यांवरच्या कर्कश्श हॉर्नच्या धुमश्चक्रीतही एक गोड धून आहे की काय असे वाटू लागले. इकोनॉमिक्सचा एकच क्लास तो पणऑनलाईन शिकत असूनही आपण काही कालावधीतच एक नामांकित अर्थशास्त्रज्ञ सहज होऊ आणि सारे जग बदलून टाकू असे मला ठामपणे वाटू लागले. पण हा उत्साह, हा आनंद, आळवावरच्या पाण्याइतकाच टिकला. सिग्नलपाशी भूकेनी कासावीस झालेली फाटक्या कपड्यांतली पाच-सहा वर्षांची पोरे वातानुकुलित गाड्यांमधून टाईम पास म्हणून शॉपिंगला जाणा-या सुखवस्तू बायकांना गजरे विकताना दिसली तेंव्हाच लक्षात आले की दुष्ट व्यक्तींच्या (राज्यकर्त्यांच्या) कृत्याने चांगल्या व्यक्तींचेही (लहान मुलांचे) नक्कीच नुकसान होऊ शकते. असो. इतर पॉझिटिव्ह सुविचारांचा विचार करण्याआधीच माझा आत्मविश्वास पार डळमळून गेला होता. ती रात्र कशीबशी सरली आणि मग निराशेने मला घेरले.

दुस-या दिवशी सकाळी सकाळीच सोसायटीतल्या फलकावर वाचले: “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे.” आणि मग ह्यापूर्वी वाचलेले ह्यासारखेच कितीतरी निगेटिव्ह “सु”विचार आपसूक आठवले :
जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.”
“कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.”
“आलीया भोगासी असावे सादर.”
“कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूच.”
“तेरड्याचा रंग तीन दिवस.”
“पालथ्या घड्यावर पाणी.”
“नावडतीचं मीठ आळणी.”
“शीतावरून भाताची परीक्षा.”
"भरवशाच्या म्हशीला टोणगा."
“कोल्हा काकडीला राजी.”
“थांबला तो संपला.”
अरेरेरे ! किती ती निगेटिव्हिटी ! कुणी हे “सु”विचार शोधले असतील देव जाणे ! पण आमच्या सोसायटीच्या फलकावर हे ही “सु”विचार वरचेवर सुवाच्य अक्षरात वाचायला मिळतात. अशा आणि तत्सम विचारांनी माझ्या अंगात निगेटिव्हिटी झुळझुळू लागते. लख्ख सूर्यप्रकाशाच्या दिवसावरही निराशेचे सावट पसरू लागते. जगाला आपला काहीच उपयोग होऊ शकणार नाही हे खात्रीपूर्वक वाटू लागते. इकोनॉमिक्सची एक कंसेप्ट कळली नव्हती ते आठवते. ती मला कधीच कळणार नाही ह्याची एव्हाना खात्री वाटत असते. कारण शेवटी “पालथ्या घड्यावर पाणी !” किंवा “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे,” हेच खरे !

दु:खी अंत:करणाने जड पावलांनी त्या दिवशी कामावरून मी घरी परतलो. शूज, सॉक्स इकडे तिकडे फेकले. बायकोने आवरलेल्या दिवाणखान्यात वस्तू इतस्तत: टाकून सोफ्यावर पडून चक्क घोरू लागलो. तोच तिच्या कर्कश्श आवाजाने जाग आली. बाईसाहेबांचा मूड आज रागावण्याचा होता. उगाचच कचकच भांडायला लागली. तिने नेमके कोणत्या सोसायटीतले सुविचार आज वाचले होते काय माहीत ?  मला वाटते, तिने आशावाद किंवा निराशावाद सोडून नुसते “वाद” ह्या विषयांतील म्हणी-सुविचार वाचले असावेत. उदाहरणार्थ  :
“कशात काय अन फाटक्यात पाय.”
“चोराच्या उलट्या बोंबा.”
“ज्याचं जळतं त्यालाच कळतं.”
“झाकली मूठ सव्वालाखाची.”
“ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला.”
तोंड दाबून बुक्क्यांचा मार.”
"उचलली जीभ लावली टाळ्याला."
“तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला.”
"कोणाच्या गाई म्हशी आणि कोणला उठाबशी."
“दुस-याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.”  
कुठला मुद्दा कुठे घेऊन कोणत्या विषयावर सहजगत्या भांडावे हे आमच्या सौभाग्यवतीलाच ठाऊक !  खरं तर मी फरशीवर टाकलेले घामट मोजे हाच एक मुद्दा होता. पण “तुम्ही हेच करत नाही, तेच करत नाही, गेल्या वेळी  सुनयनेच्या साखरपुड्याला पण तुम्ही आला नव्हता इथपासून ते माझ्या माहेरच्या मंडळींची तुम्हाला किंमतच नाही, सगळी कामं मीच करते, मी काही तुमची नोकर नाही... इत्यादी, इत्यादी,अनेक  विषयांना तिने लीलया स्पर्श केला होता. आधीच खच्ची झालेले माझे मन अजून विषण्ण झाले. तिच्या खोट्यानाट्या आरोपांनी मी बधीर झालो. मनात सुविचार तर सोडाच, कोणतेच विचार येईनासे झाले. सुन्नपणे मी तिच्या दुर्गावताराकडे पाहू लागलो. त्यावेळेस मला तिच्या किंवा माझ्या डोळ्यांत कुसळ, मुसळ, ह्यांपैकी काहीच दिसत नव्हते. परंतु तिने पुडक्यात बांधून आणलेल्या “काटा किर्र” मधल्या मिसळीचा वास मात्र घमघमत होता. मी आलोच पटकन,” असे म्हणून, झटाझट जिने उतरून खाली गेलो. ओल्या फडक्याने सोसायटीचा फलक स्वच्छ पुसून त्यावर ठळक अक्षरात एक ठसठशीत सुविचार लिहीला : “ ऐकावे जनाचे करावे मनाचे.”