Feb 24, 2020

तो ना एकटा कधीही

ज्याची धरणी माऊली
आणि अंतराळ बाप
तो ना पोरका जगती
सारे विश्व त्याच्या घरी

सूर्य चंद्र तारकाही 
सदा साथ त्यास देती
अंध:कारी संकटात
मार्ग तयास दाविती

बंधु बांधव पहाड
वृक्षवेली गोतावळी
हर्षोत्सव प्रीती सदा
नांदे तयाच्या सदनी

शांती तयाच्या हृदयी
जसे उदक सागरी
वर लाटा बहु जरी
घनगंभीर अंतरी

असा संसार जयाचा
तो ना एकटा कधीही
सारी सृष्टी तयासाठी
असे सुखास कारणी

Feb 16, 2020

संघर्ष

सारे हवे ते पदरात आहे
सुखात आयुष्य क्रमित आहे
सगळे कसे ते सुरळित आहे
संघर्ष माझ्या रक्तात आहे

सुदृढ शरीर उत्कृष्ट आहे
व्याधी बिमारी अज्ञात आहे
चिंता कुचिंता स्वप्नात आहे
संघर्ष माझ्या रक्तात आहे

लक्ष्मी पुढे हात जोडून आहे
दुर्भाग्य दारिद्र्य अज्ञात आहे
कोणास वाटेल स्वर्गात आहे
संघर्ष माझ्या रक्तात आहे

आहे पुढे त्यास मी अंध आहे
नव्हते कधी ते पुढे लख्ख आहे
कोणी मनाला भुलवित आहे
संघर्ष माझ्या रक्तात आहे

Feb 14, 2020

उमला कळ्यांनो

उमला कळ्यांनो वसंत आला
शिशिर वस्त्रे फेकून टाका
पळून गेला वेडा हिवाळा
उबदार वारे अंगावरी घ्या

दडले तुम्हांत विपुल रंग
छटा अनंत एका तनुत
लज्जा सरुद्या, पडदा ढळूद्या
सौंदर्य तुमचे आम्हां दिसूद्या

लालित्य तुमचे तुमच्या वपुत
सुगंध तुमचा तुमच्या मनात
आरक्त पत्रे उमलून देह
भारून टाका समस्त लोक

सूर्यास वाटेल तुमचाच हेवा
धरतीस वाटेल अभिमान वेडा
मारुत येता हलकेच मुरडा
दाही दिशांना वसंत फुलवा

खुडता कुणीही नकोत अश्रू
चुरता कुणीही क्षमा असूद्या
नि:स्वार्थ तुमचे सुधन्य आयु
सुगुण तुमचे स्मरणी असूद्या

विचित्र दुनिया घेईल गंध
सुकून जाता निर्माल्य देह
काही क्षणांचे फुलवून आयु
पुढच्या वसंती पुन्हा तुम्ही या

Feb 10, 2020

प्रार्थना

एक नवीन विचार
आज मनात येऊ दे
भूतकाळाचे मळभ
दूर निघून जाऊ दे

एका विचारची शक्ती
पुरे आहे लढायला
गूढ संघर्ष मनीचा
धूम पळून जायला

नव्या विचाराची वाट
पाहते मी हररोज
आला जर कदाचित
तर स्वागत करेन

नवा विचार धरता
उद्या जुनाट होईल
नवा प्रश्न तयामुळे
मनामधे उगवेल

मग अजून वेगळा
मनी विचार येऊ दे
नव्या जुन्याचे मळभ
दूर निघून जाऊ दे