Sep 3, 2018

वणवा

ते वणवा म्हणती मजला | मी हावरट अग्नि भुकेला |
मी वैश्वानर संतप्त | आगीचे मजला रक्त ||
तो प्रखर सूर्य मम मित्र | भोजना करी आमंत्र |
तो मारुत वारा घाली | मज इकडे तिकडे पसरी ||

एकटा पंक्तीला बसतो | मी अरण्य जाळीत सुटतो |
सा-याचा फडशा पडतो | वरुणाला ना घाबरतो ||
कुणी म्हणती दावाग्नीही | मज आग उसळते उदरी |
मी अखंड तरु खादडतो | झुडुपे वेली पीदडतो ||

सूचीपर्णी मजला प्रिय | इतरही बहुविध वृक्ष |
ती वने झडकरी दग्ध | मज भोजनास पक्वान्न ||
खाऊनी तृप्त होतात्सा | मी देतो धुराळ ढेकर |
ती इवली जळकी गवते | बडीशेप सुपारी मज ते ||

कुणी म्हणती मजला भस्म्या | कुणी वैश्विक पारा वाढ |
कुणी करी यज्ञ मम शमण्या | आगीत आगीची वाढ ||
कुणी करार कानून करती | अंमल त्याचे रेंगाळी |
कुणी म्हणती कलियुग अस्ति | कुणी हे तर कुणी ते म्हणती ||

काहीही म्हणा मानवहो | दुरुनची बसा टीवटीवीत |
जर याल मला निजवाया | भस्मसात करीन तुम्हाला ||
तनु तुमची क्षणी जळेल | राखेत राख मिसळेल |
होत्याचे नव्हते करतो | मी अग्निराज बलवान ||

No comments:

Post a Comment