Jun 29, 2018

नावांची मजा

कॅनडातील आजी नावाच्या गावात कोल्हा नावाचा एक मुलगा रहात होता. त्याचे आडनाव होते वाईट मुलगा. त्याचे मित्र विविध गावांतले होते. त्यातील काही गावांची नावे कोपर, डास, बोट, किल्ली, स्वेटर, बेडूक, सापाचे तळे, गाईचे डोके, कोल्ह्याचा सापळा, हृदयाची इच्छा, कायदेशीर, लोणच्याचे सरोवर, म्हशीच्या उडीत चक्काचूर झालेले डोके, हिरवळ, म्हाता-या बायका, गुदगुल्यांची खाडी, लांडग्यांची नदी, भुवई, तीन बंदुका, कावळ्याचे घरटे, झेंडा, संधी घेऊन ये, मला उडवून लाव, टोपी, इत्यादी होती. असे जर मी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही माझ्या गोष्टीला भाकडकथा असे म्हणाल. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल, कारण ही कॅनडातील ख-याखु-या गावांची नावे आहेत. ही अतिशयोक्ती नाही.

नावात काय आहे आणि काय नाही ह्या वादात मी पडणार नाही. पण एक मात्र खरे, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी नावात विविधता आणि गमतीजमती नक्कीच सापडतील.

Le Rocher de Grand-Mère (आजीचा खडक)
मग अमुक ठिकाणाचे नाव तमुक कसे काय पडले ह्याच्या अनेक मजेशीर गोष्टी ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ, केबेक राज्यात Grand-Mère नावाचे एक गाव आहे. त्याचा अर्थ आजी. ह्या गावात एका म्हाता-या आजीसारखा दिसणारा मोठा खडक आहे. त्यावरूनच त्या गावाचे नाव तसे पडले, अशी वदंता आहे. हा खडक कोणत्या नजरेतून आणि कोनातून पाहिल्यावर आजीसारखा दिसतो, ते परमेश्वरच जाणे!

तसेच केबेकमधील एका खाडीचे नाव "Baie du Ha! Ha!" असे आहे. होय, तुम्ही बरोबरच वाचले, अगदी उद्गारचिन्हांसकट. मराठीत त्याला हा! हा! ची खाडी असे म्हणता येईल. त्या नावाच्या व्युत्पत्तीची एक कथा अशी: एक बाई तिच्या लहानग्या मुलाला घेऊन खाडी पार करत होती. अचानक तिचे मूल पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर वाहून गेले. बाई किना-यावर पोचली आणि अत्यंत शोकाकुल झाली. तिने लाटांना तिचे मूल परत करण्याची प्रार्थना केली. तर त्याचे उत्तर म्हणून लाटा दगडांवर आपटल्या. त्या आपटणा-या लाटांचा "हा! हा! "असा ध्वनि झाला. तेंव्हापासून त्या खाडीला हा! हा! ची  खाडी असे नाव पडले.

आमच्या इथल्या ग्रंथालयाचे नाव "Bonenfant" असे आहे.  पुणे विद्यापीठाचे जसे "जयकर ग्रंथालय",  तसेच Bonenfant लाव्हाल विद्यापीठाचे . Bonenfant (म्हणजे चांगले मूल) आणि Malenfant (म्हणजे वाईट मूल) ही इथली आडनावे आहेत. माझ्या विद्यार्थ्यांमध्येही ही आडनावे बरेचदा आढळतात. अजूनही वर्गात पेपर वाटताना Malenfant अशा नावाने एखाद्या विद्यार्थ्याला पुकारताना मलाच आपले वाईट वाटते. बिचा-याची दया येते.

नमुन्यादाखल कॅनडातली अजून काही गावांची नावे:

निसर्गाशी संबंधित असलेल्या नावांची गावे : Snake Lake, Whitehorse, Dog Creek, Tiger Lily, Wood Buffalo, Milk River, Rose Bud, Seven Persons, Carrot River, Moose Jaw, Little Black Bear, Elbow, Eyebrow, Finger, Snowflake, Bird, Whitedog, Snowball, Crapaud (बेडूक), Poisson (मासा), Ripples, Crowsnest, Lawn, Foxtrap, Mosquito, Salmon Arm, Spread Eagle Bay.

अनपेक्षित नावांची गावे: Enterprise, Mission, Legal, Entrance, Unity, Success, Key, New Credit, Asbestos, Bright, Mechanic, Concession, Lower Economy, Trois Pistoles (तीन बंदुका).

इतर काही गमतीशीर गावे : Ta Ta Creek, Penny, Cereal, Stoner, Flathead, Mirror, Onefour, Thunderchild, Star Blanket, Spy Hill, Old Wives, Cut Knife, Climax, Drinkwater, Wawa, Tiny, Pickle Lake, Love, Oil Springs, Cardigan, Chapeau (टोपी), Drapeau(झेंडा), Burnt Church, Conception Bay, Witless Bay, Blow Me Down, Come By Chance, Heart's Content, Jerry's Nose, Heart's Desire, Little Heart's Ease, Fertile, Little Seldom, Exploits, Tickle Cove, Spanish Room, Dead Man's Flats, Head-Smashed-In Buffalo Jump.

नावांची गमतीशीर उदाहरणे द्यावीत तितकी कमीच!  Tatamagouche, Whycocomagh,Gananoque, Spuzzum, Osoyoos, Skookumchuk, Quispamsis, वगैरे गावांची नावे न उच्चारलेलीच बरी. माझ्या माहितीप्रमाणे, कॅनडामधील सगळ्यांत मोठे नाव "Pekwachnamaykoskwaskwaypinwanik" हे आहे.  ते Manitoba राज्यातील एका सरोवराचे नाव आहे. जगातील सगळ्यात मोठ्या नावाचे गाव कदाचित् Wales मधील "Llanfairpwllgwyngyllgogerychwyrndrobwllllantysiliogogogoch", हे असावे. ते लिहीतानाच मला मोठी घेरी येत आहे. उच्चारणे तर सोडूनच द्या. कल्पना करा, ह्या गावाचे स्पेलिंग जर लेखी परीक्षेत विचारले तर? आणि उच्चार जर तोंडी परीक्षेत विचारला तर? आपण त्या गावचे नाही हे आपले भाग्यच समजायचे!

वाचकहो, अशी नानाविध नावे तुमच्याही पहाण्यात, ऐकण्यात आली असतीलच. अशी काही नावे पाहिली की कितीही गंभीर असलात आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी, क्षणभर तरी हसू येतेच. विचार करा, तुमचे नाव-गाव आत्ता आहे ते नसून ते भलतेच  काहीबाही असते तर? समजा तुमचा जन्म "जेरीचे नाक" ह्या गावात झाला असता तर? त्यामुळे दैवाचे आभार मानून आहे त्याच नावागावात  समाधानी रहा. 

मी जर "म्हशीच्या उडीत चक्काचूर झालेले डोके" ह्या गावात जन्मले असते आणि माझे नाव जर "शूर्पणखा Malenfant" असे असते तर मी Baie du Ha! Ha! मध्ये उडीच मारली असती.