Mar 28, 2019

देशील साथ का तरीही?

देशील साथ का तरीही
त्या अनवट वाटेवरती ?  धृ.

नसतील गुलाब फुले अन
नसतील रेशमी वस्त्रे 
नसतील दास नि दासी
ना सुंदर घर सुखसोयी  १.

कधी वणवण रणरण उन
कधी खाण्या भाकर पाणी
कधी लज्जा कधी अपमान
ना मानमरातब आणि  २.

बोलेन कधी प्रेमाने
वा मौन कधी रागाने
कधी माझा मीच नसेन
असतानाही हरवेन  ३.

त्या विचित्र संसारात
कधी जीव घाबरा होईल
मायेचे कुणी नसताना
एकांत तुला खाईल  ४.

ते वेडा म्हणती मजला
व्यवहार कळेना कवीला
मज ध्यास नवा हररोज
अन अनंत आशा वेड्या ५.

असतील काहीशा कविता
अन सुखदु:खाची गाणी
फुलतील फुले अश्रूंची
कधी आशेच्या झाडावर  ६. 

Mar 23, 2019

कोण तुला घाई?

वाजले किती काय ठाऊक? कोंबडा आरवे कुक् कुक्
सारे कसे चिडीचूप - आई उठे गुपचूप

आई गं आई, कोण तुला घाई?
सकाळ झाली नाही अन् गाढ झोपली ताई

झुंजुमुंजु झाले नाही - पेपरवाला आला नाही
आजी अजून उठली नाही - दूधवाला आला नाही

खडखड खुडखुड वाजवतेस डबे - काय कुठे शोधतेस, मला ना कळे !
पोळीचे पीठ, की दिव्याची वात? भाजीचा माठ, की तांब्याची परात?
 
कुकर शिट्टी होते - पोळी भाजी होते
बाबा उठण्याआधीच - सारे तयार होते

आई गं आई - पुरे तुझी घाई
बाळ रडू लागला - त्याला कुशीत घे ना

Mar 21, 2019

ध्येय

हृदयामध्ये खोल कुठेसे त्याचे घर एकटे
दारी त्याच्या जाता जाता अनंत काटेकुटे

हिरवळ नाही, झरा कोठला? वाळूचे टेकडे
फसव्या वाटा पुढे ठाकती अंधारी वळणे

खाच नि खळगे जिकडे तिकडे चालावे कोठून?
उमेद सुटते, मार्ग ना मिळे, पोचावे कोठून?

इकडे जावे खोल दरीत पुन्हा न येणे वरती 
तिकडे जावे दलदल फसवी रानफूलांखाली

कातरवेळी घुबडे काळी घुं घुं घुत्कारती 
रात्र भयंकर हिंस्र श्वापदे किंकाळी फोडती

पहाटवेळी सुसाट वारा अंगाला झोम्बतो
ध्येयासाठी मार्ग कंठता देह थकुनी जातो

कधी फिरावे माघारी तर जीव घाबरा होतो 
काट्यांवरती जाण्याचाही सराव का मग होतो?

ध्येयासाठी झपाटुनी तो केला अट्टाहास
प्रेम आमुचे ध्येयावर अन श्रद्धा ध्येयावर
                        ***
बहु श्रमाने दिसले आजि ज्याचा होता ध्यास
ध्येय गाठता समाधान ना, रिक्त मनाला बोच

नवीन काही खुणावते मग हवे वाटते नवे
एक संपण्याआधी दुजाची मनात नौबत झडे !

Mar 16, 2019

कधी वाटते

कधी वाटते लहान व्हावे                    कधी वाटते मोठे व्हावे
लाडू खावे भातुकलीचे  १                  दुखले तरी हसण्यासाठी २

कधी वाटते बाबा व्हावे                     कधी वाटते पक्षी व्हावे
दादापेक्षा उंच व्हावे ३                      उडून जावे आभाळात  ४  

कधी वाटते कदंब व्हावे                    कधी वाटते पाऊस व्हावे
चमचम काजवे बघण्यासाठी  ५           धो धो गारा पाडण्यासाठी  ६

कधी वाटते बाप्पा व्हावे                     कधी वाटते शिक्षक व्हावे        
एकवीस मोदक गट्ट करावे   ७            पंधरं बारे कळण्यासाठी ८

कधी वाटते गायक व्हावे                    कधी वाटते लेखक व्हावे
अआ इई गात रहावे  ९                     पाने पाने लिहीत बसावे   १०

कधी वाटते पुस्तक व्हावे                    कधी वाटते गरीब व्हावे
ग्रंथालयात उंच बसावे  ११                   पिंपळाखाली झोपी जावे १२

कधी वाटते पोलीस व्हावे                    कधी वाटते घड्याळ व्हावे             
तुरुंग कैदी पाहून यावे  १३                  टक् टक् टिक् टिक् करत रहावे  १४ 

कधी वाटते ऋषीच व्हावे                    कधी वाटते आभाळ व्हावे      
मौनव्रत मी करत बसावे   १५              चंद्रचांदण्या शिंपीत जावे   १६                                                                     
कधी वाटते स्वर्गी जावे                       स्वर्गी जाऊन तिथे रहावे
देव किती ते मोजून घ्यावे   १७             द्यावी सुट्टी देवांनाही  १८

Mar 9, 2019

तू होकार द्यावास म्हणून

तू होकार द्यावास म्हणून तीळ तीळ तुटलो
तुटून तुटून गेल्यावर सैरभैर फिरलो
फिरता फिरता कधीतरी तुला विसरून गेलो
चार दिवस चार रात्री आनंदाने जगू लागलो

विसरून गेलो तुला पण हरवून गेलो स्वत:ला
शोधू लागलो आरशात स्वत:च्याच रूपाला
पाहून माझे रूप मला भास तुझा झाला
खोडून टाकले आरशातल्या खोटारड्या रूपांना

तू होकार द्यावास म्हणून तुला मला नाकारलं
नाही नाही म्हणता म्हणता तुझ्यात विलीन झालो 

Mar 8, 2019

द द दाणे

द द दाणे शेंगदाणे म म मला आवडती
येता जाता पोटामधे कितीतरी दाणे जाती

गूळासंगे गूळाविना भुईमूग खावे बरे
कशासाठी? पोटासाठी ! खारे दाणे तिखे दाणे

चटणीत आमटीत कोशिंबीरी वापरावे
चिक्कीतही दाणे हवे भेळेतही दाणे हवे

उपासाला कंटाळ्याला चौपाटीत खावे दाणे
शाळेमधे डब्यातही मूठभर घ्यावे दाणे

एक दाणा चिऊताई पिल्लासाठी वेचतसे
चोचीमधे दाणा घेऊन् भुर्रकन उडतसे

शेतक-या धन्यवाद, दाण्यासाठी पिकासाठी
देवबाप्पा भूक देतो शेतकरी दाणे देतो