Dec 11, 1981

विरहवेदना


कशी सांगू प्रिया तुला
माझी विरहवेदना
तिचा रवाळी उन्मेष
शब्दरूपच घेईना

रंग डाळिंबी पाकळ्या
झाल्या अबोल अबोल
गर्भरेशमाची ऊल
साहवेना तिचा सल

रसरंगात्मक गंध
हेमरंगी आणि पंख
कौमुदाची शुभ्र झूल
सांकळले सारे मूक

सखा सागरापल्याड
रेंगाळल्या पाखरांच्या
निस्वरशा अस्तित्वाला
वेध मंद हुंकाराचा...

(अश्विन वद्य दशमी, शके १९०३)

सा-या अंधारकणांना फुटे

सा-या अंधारकणांना फुटे चांदण्यांचे गीत
व्याकुळल्या लोचनात पिसे गीत उन्मळत ||

देहभाव विसरोनी असे चांदणे प्राशावे |
माझे, जे न माझे तेही, तेही तुलाच अर्पावे |
मुग्ध देणेघेणे सारे मूकपणे आक्रोशात ||१||

विसावली किलबिल तिला उबेचा पिसारा |
षार थंडीलागी नाही अशा कोटरी निवारा |
कांठ पापणीचा भिजे नकोवती भाव आर्त ||२||

रोमरोमींचे हे न्यास दान तेजाचे मागत |
सर्वस्वाचे लेणे पुरे स्फुरणा-या चैतन्यात |
टाहो हृदयाला फुटे सारी मुले गदगदत ||३||

(कोजागिरी, शके १९०३)

भरलेले आर्त मन

भरलेले आर्त मन आतां गोठुनिया गेले
विचारांचे गोल चक्र कसे थांबून बसले ||

शिणलेल्या या तनूला कोण आतां बोलावील?
ओल्या भावनांची सूक कोण पुन्हां ओलावील?

अस्मानाच्या पोकळीला आग लागली कोरडी
मऊमऊ रेशमाची वस्त्रे झाली गे नागडी ||

पाखरांचे प्रेमशब्द वाटू लागले प्रलाप
किती प्रेम दोहोंतले मोजमोजले...अमाप!

हांक तुझी ऐकली गं पहा किती ती अधीर
दमले गं पाय माझे कसें तोडू हे अंतर?

नाही राहवे डोळ्यांना पूर त्यांचा कसा पुसूं?
तुझ्या वियोगे या दिशा रडती गे मुसुमुसूं!

काही नाही गं आधार रहावत नाही आतां
अंध झालेल्या या मला कोण सांवरील आतां?

(१९६८)