Aug 29, 2018

इस्त्री

इकडची केली, की तिकडची विस्कटते,
तिकडची केली, की इकडची चुरगळते,
मला इस्त्रीच करायला जमत नाही,
आवडत तर त्यातूनही नाही.

इस्त्रीचे कपडे घालणा-यांचं
कौतुक मला नाही अन्
चुरगळलेले कपडे घालणा-यांशी
वाकडं माझं नाही.

कॉटनची नाही, लीननची नाही,
सद-याची नाही, झग्याची नाही,
मला इस्त्रीच करायला जमत नाही,
आवडत तर त्यातूनही नाही.

कडक कपडे घातल्यामुळे कधी कुणाचं
भाषण सुंदर झाल्याचं ऐकलं नाही.
इस्त्रीचे कपडे घातल्यामुळे कधी कुणी
माणूस प्रेमात पडल्याचं ऐकलं नाही.

साडीची नाही, धोतराची नाही,
स्कर्टाची नाही, पँटीची नाही,
मला इस्त्रीच करायला जमत नाही,
आवडत तर त्यातूनही नाही.

घरातली नवी कोरी इस्त्री मला
माळ्यात टाकून द्यावीशी वाटते,
किंवा घरी कोणी नसताना ती
बोहारणीला फुकट द्यावीशी वाटते.

इस्त्रीचा शोध लावणा-या इसमाचा
मला तिटकारा येतो.
कशाला भलतेसलते शोध लावतात
ह्याचा रागही येतो.

इस्त्रीचे कपडे घालणा-यांचा आत्मविश्वास
कपड्यांतच असतो का?
इस्त्रीचे कपडे न घालण्याचं धाडस
त्यांना करताच येत नाही का?

ब्लाउझची नाही, कोटाची नाही,
कुर्त्याची नाही, पायजम्याची नाही,
मला इस्त्रीच करायला जमत नाही,
आवडत तर त्यातूनही नाही.

इस्त्रीच्या दुकानदाराशी  मात्र
माझं काहीच वाकडं नाही, पण,
मला तिथे नोकरी करणं जमणार नाही.
आवडणार तर त्यातूनही नाही.

No comments:

Post a Comment