Nov 29, 2019

लेकरं

एकाच आईची सारी लेकरं तिच्यासारखी नसतात
कोणते दूध वेगळे देते म्हणून वेगळी बनतात?

एकाच आईची सारी लेकरं एकसारखी नसतात
कोणते संस्कार वेगळे करते म्हणून वेगळी बनतात?

एकाच आईची सारी लेकरं तिच्या पोटची नसतात
अशी कोणती जादू म्हणून तिची लेकरं बनतात?

एकाच आईची काही लेकरं कधी आई बनतात
तेंव्हाच “खरी आई” कळली असे सांगून टाकतात

एकाच आईची सारी लेकरं जगभर हिंडतात
आईच्या हातचे साधे खायला तळमळून जातात

एकाच आईची सारी लेकरं भांड भांड भांडतात
आई जाता इस्टेटीचे तुकडे तुकडे करतात

एकाच आईची सारी लेकरं आई वेडी नसतात तरी
आई जाता सारी लेकरं नक्कीच एकटी पडतात

Nov 24, 2019

आरसा माझा

हाय रे माझा, आरसा हरवला !
पाहू कुठे मी आता कुणाला?

होते मी सुंदर नयनांत तुझ्या
बनले मी मोहक पाहून तुला
दृष्ट का लागली माझ्या रुपाला?
पाहू कुठे मी आता कुणाला?

गेले किती दिन पाहून तुला
तितुकेच दिन देखता न मला
कशी मी दिसते? कुणा ठाऊक?
रूपाची माझ्या पर्वा कुणाला?

व्यथा माझी एका सखीने पाहता
दिला पत्ता मला मोठ्या बाजाराचा
नानाविध तिथे आरसेच आरसे
नाही आवडला तरी एकही मला

तुझ्याविन वाटे कुरूप मी मला
नावडे मजला आरसा दुसरा
शोधा कुणीतरी आरसा माझा
सावरू कशी मी माझ्या मनाला?

हाय रे माझा, आरसा हरवला !
पाहू कुठे मी आता कुणाला?

Nov 20, 2019

अशीच होती ती

अशीच होती लाघवी ती
हवीहवीशी वाटणारी
माझे खूप चुकले तरी
तिचेच चुकले मानणारी

अशीच होती साधीभोळी
पाण्यास पाणी म्हणणारी
दहा लबाड फसवून गेले
तरी न समजणारी

अशीच होती उदार ती
भरपूर काही देणारी
शंभरातले नव्वद रुपये
गरीबांना वाटणारी

अशीच होती क्षमाशील
गुपचूप सहन करणारी
अमाप दु:ख ज्याने दिले
त्याचे भले करणारी

अशीच होती आईसारखी
भरपूर माया देणारी
बदल्यात कधी तिच्यासाठी
काहीच नाही मागणारी

अशीच होती मैत्रीण माझी 
फार फार वर्षांपूर्वी
देवाला ती आवडली म्हणून
त्याच्याचकडे निघून गेली