Jan 20, 1990

मंगलपंचक

वंदू श्रीमन्मंगलमूर्ति सुवरदा कोळेश्वरा सन्निध
जगदंबा तशी आळवूं सुनयना उत्फुल्ल कमलोद्भवा
पाचारुं शुभकार्यी सर्व ऋषींना आशीर्वचा द्यावया
ज्यांच्या केवल सुव्रतेचि जग हे पाहे सदा मंगल ||१||

चंद्राच्या मधुमीलनास रोहिणी तशी आतुरली उत्तरा
शोभे हांति तिच्या सुरम्य वदना तारांकिता मालिका
सांगे भाव तिच्या मनातले नकळत आकीर्ण नेत्रद्वय
यशवंता समयीचि घे समजुनी आले घरीं मंगल ||२||

गार्हस्थी सुखदु:ख सर्व जगींयां या सृष्टीचक्रापरी
क्षणिकाची परि कासयास करणें द्वैतातुनी संगती
जन्मोजन्मि जिच्या सवेचि फिरणे संसार चक्रांतुन
एकंकारचि एक मार्ग गमतो दावेल जो मंगल ||३||

दाक्षिण्यम् स्वजने दया परिजने शाष्ठ्यं सदा दुर्जने
प्रीति: साधुजने न जो नृपजने विद्वज्जने ष्यार्जवम्
शौर्यं शत्रुजने क्षमा गुरुजने नारीजने धूर्तता
ऐसे वागुनि जो बुधजना रमवितो सर्वत्र त्या मंगल ||४||

दीप्तीचे रविशी अतूट बंधन तसे राही सदा त्वन्मनी
जलधीचे लहरीशी जसे विहरणे तैसेची घे मानुनी
देवोनी कुलदीपक रत्न नभींचे उद्धारी दोन्ही कुळे
प्रेमाच्या मधुसिंचनी शुभद या भेटो सदा मंगल ||५||