Dec 4, 2016

नको ना गं आई


माय माझी आहे दुधावरची साय
आठवणीने तिच्या मन माझे खाय  

नको ना गं आई सोडू तू आम्हाला
तुजवीण काही रुचेना मनाला

वात्सल्याची जणू असशी तू मूर्ती
करीशी सर्वांची तू इच्छापूर्ती

माय माझी आहे दुधावरची साय
तिची महती मी कुणा सांगू काय?

पाहुणे-राउणे येती सारे घरी
प्रेमाने सर्वांचे सर्व काही करी

कंटाळा आळस तुजकडे नाही
मायेने सर्वांचे सर्व काही करी

उत्साह तुझा आहे अगणित
न करू शके कुणी त्यावर मात

बुद्धीची ममतेची असशी तू मूर्ती
करीशी सर्वांची तू इच्छापूर्ती

मिळुनी मिसळुनी सर्वांशी वागशी
चुकले तर मात्र स्पष्टपणे बोलीशी

निर्भीड चलाख प्रेमळ तू असशी
गरजवंताला मदत तू करिशी

सहनशक्तीची मूर्ती तू असशी
ओसंडी उत्साह चैतन्य तुजपाशी

बाबांची सतत साथ तू देशी
अंतरबाह्य तू त्यांचीच असशी

उण्यापु-याकडे दुर्लक्ष करिशी
कधी कशाची तक्रार ना करिशी

सुख दु:ख सारे सम तुजपाशी
कोणत्या मातीची तू बनलेली असशी?

नको ना गं आई सोडू तू आम्हाला
तुजवीण काही सुचेना मनाला

अस्तित्त्वाची तुझ्या आच मनाला
मायेच्या स्पर्शाची ओढ जीवाला

बोलले नाही तरी कळेलच तुजला
नको ना गं आई सोडू तू आम्हाला

पडलीस आजारी कधी तू नाही
नसण्याची तुझ्या सवयच नाही

दु:ख खेदानें मन व्यापून जाई
नसण्याने तुझ्या मन माझे खाई

कुठुनी आणू मी तुजसम आई
सांग आता मला तूच काहीबाही

आई तुजवीण झाले मी पोरकी
होईन का गं मी परत बोलकी?