Aug 31, 1978

दोहद (सांग सांग राजस बाळे)

सांग सांग राजस बाळे तुझ्या दोहदाते
पुरवू किती आनंदाने कोडकौतुकाते ||

कल्पवृक्ष सान्निध्याने होई रागहीन
देवदेवता सान्निध्यें तैसी होई शुद्धगान ||

निर्मल नभी संध्या दाटे स्वर्ण कांति तिज
सुखद वायुलहरी फिरती कोटरी निनाद ||

स्वजन सुजन किती हे आले तुझ्या कौतुकाते
स्मरणी ठेव कौतुक परि हे शुद्ध चैतन्याचे ||

उमलत्या कळ्यांना जपणे हाचि गे निसर्ग
नव्या कल्पनांची उब हाचि त्यांचा गर्भ ||

क्षणिक सुखाच्या मागून आठवे शाश्वत
सत्य चित्शक्तीच्या स्पर्शे लाभे पूर्णानंद ||

स्वैर गगनी हिंदोळावे झेप आकाशांत
फिरुनि परत मागे यावे बाल कोटरांत ||

सात्विक विचारांसाठी प्रयत्न करावे
रामायण भारतातें नित्य गे वाचावे ||

सत्यसंस्काराचे फक्त देणे संततीसी
तयाहून कांही देणे नाही नाही हाती ||

तपश्चरणपूर्वक भजुनी त्रिविक्रम ध्यावा
तेजगर्भ जोपासुनिया आनंद धरावा ||

कोळेश्वरादि देवांस एक प्रार्थना ही
सात्विक संतति देई कुले उध्दरावी ||