Nov 27, 2002

मंगलाष्टके (समीहनचा विवाह)

खालील मंगलाष्टक 'सत्येनोत्तभिता' ह्या विवाह सूक्तावर रचलेले आहे.

वंदूया फणिनाथ सुनु सुखदा अन् वृद्ध कोळेश्वरा
प्रार्थोनी अदिति उपेंद्र सहिता ती दिव्य योगेश्वरी |
पुण्यात्मे बहु थोर पूर्वज तसे वंदोनि वेदेश्वर
आरंभू शुभकार्य आजि दिन हा घेवोनि ये मंगल ||१||

सत्याला बिलगोनि भू जशि सुखे नांदे नभोमंडळी
सूर्याला बिलगोनि द्यौ जशि धरी देवांसही "अंतरी"|
आदित्यासि जसे धरी ऋत सदा स्वर्भूमि सोमा जशी
तैसे तुम्ही असा परस्पर सुखी सन्मंगलाचे गृही ||२||

तेजाने झळके त्रिचक्र रथ हा नासत्य दंस्रांसवे
भाग्याने तळपे सुरम्य वदना तन्मध्यगा भामिनी |
ऐसी ती सुभगा प्रचेतनकरा 'सूर्या' स्वनाथासवे
वंदूया तिजलागि भक्तिमतिने मित्रावरूणांसवे ||३||

घेतो मी तव हात हाति सुभगे सौभाग्यवृद्धिस्तव
सत्याची तुजलागि देत शुभदे ग्वाही सदा निर्मल |
आवार्धक्य अशीच गांठ असुं द्या सद्गार्हपत्यास्तव
पूषेच्या सुवरे प्रिये मम गृहीं घेवोनि ये मंगल ||४||

'जास्पत्यं सुयमं' असेच असुं द्या मन्मार्ग निष्कंटक
ऐसे आशिष मागतो 'वर' आतां त्या श्रेष्ठ देवां प्रति |
गृहपत्नी वशिनी सदा भव सुखे सत्पुत्रमाता भव
पूषेच्या सुवरे सदा मम गृहीं घेवोनि ये मंगल ||५||

आनंदे भरुदे घरांत फुलुदे संसार माझा सुखे
अशुभाचा कधि मागमूस नसुदे प्रेमांत तो रंगुदे |
नातूपणतुहि अंगणांत सुखिये नांदोत रात्रंदिन
दीर्घायू सुखदायि वीर असुनी राहोत देवप्रिय ||६||

सम्राज्ञी श्वशुरांसि होई सुभगे त्या वंद्य सासूसही
सम्राज्ञी भव देवरांसि शुभदा आप्तांसि हो भामिनी |
शंकर्त्री भव गोधनासि सुखदे आधार सर्वांसि दे
संसारी मम धर्मतेज फुलुदे ही कामना अंतरी ||७||

एकंकारुनि येवुदेत हृदये दाम्पत्यप्रेमामुळे
अनुकूला मति बुद्धिवृत्ति असुदे ती एकमेकांप्रति |
विश्वेदेव तशी सरस्वति अम्हा देवो सदा सन्मति
सद्भाग्यास्तव मागतो 'वर' तिला प्रज्ञान आम्हासि दे ||८||