Jan 24, 2017

सखी


होतीस सखी पूर्वीच माझी
होशील का आता प्रेयसी माझी ?
  
आलीस मजसवे दूर परदेशी
दुर्लक्षिले तुला प्रत्येक वर्षी 


चुकलेच माझे क्षमा करी मजला
दिलदार असशी तुझ्या चाहत्याला


विश्वास माझा फार आहे तुजवर
सांभाळीशी जेंव्हा शोक अनावर


नाते तुझे माझे सप्तसुरांचे
तुटणार नाही ते गही-या प्रेमाचे 


सूर ताल लय तुझी सौंदर्यस्थाने
खुणाविती मजला अतीव प्रेमाने 


आलाप तुझा मला वाटे कठीण
शिकवी मला त्याचे सरळ वळण 


कळेल का मजला तुझे कधी तंत्र
देशील का तू मला त्याचा गूढमंत्र


ठेवीन तुला मी थाटातमाटात
चिडू नको मात्र क्षणातक्षणात 


रुसू नको अशी क्षणाक्षणात
ठेवीन तुला मी सुरेल सुरांत


समजून घेई तू माझ्या मनाला
नको पाहू अंत देई प्रीती मला 


पाहीन वाट मी त्या मिलनाची
आस मला असे टपो-या सुराची 


पाहीन वाट त्या दुर्मिळ क्षणाची
सूर होई एक साक्ष आपुल्या प्रीतीची 


होतीस सखी तू पूर्वीच माझी
होशील का आता प्रेयसी माझी ?