Feb 28, 1975

एक छानशी ऐरणी दुपार

एक छानशी ऐरणी दुपार  ...झलमलती लोहपुष्पे चुंबिणारी
... ज्यांचा जन्म घणाघातांच्या कासावीस तळतळातून झालेला
                                                                       असतो ...!

त्या दुपारीला ते माहीत आहे की आक्रोशाच्या दुपट्यातून
वर आलेल्या या बाळांना आपण जवळ करतोय
                                    .... ती आपली नसली तरी !

निखा-यागत तळपणा-या त्या पोरांच्या गालांना
प्रेम देणारे तिचे ओठ कसे करपून गेलेत
पण जिभेनं धर्म सोडला नाही त्यांना उद्योगांतच अंगाई
                                     कुठे आहे ते दाखविण्याचा

तारेच्या विणकामांत गुरफटून बसलेली ती वेळ हंसत्येय
हंसत्येय त्या वेड्या दुपारीला
वेड्ये, काय ... काय हा मूर्खपणा, ती म्हणत्येय -
मी पहा -
काल रात्री ज्यांना पाहून काळ्या रात्रीलाही वात्सल्य
फुटले गहि-या चांदण्याचे
त्या माझ्या पोटच्या बाळांनी असं नष्ट सौंदर्य व्हावं म्हणजे काय !

त्या वेलीनं म्हणूनच झुगारलय त्या नाजूक फुलांना -
ज्यांच्या मृद्गंधी हास्याच्या एकाच लकेरीनं
त्या वेलीची मान कालच उंचावली होती
... तिचं अस्तित्व जगाला हवं हवं केलं होतं

(फेब्रुवारी १९७५ च्या मधुकंसांत प्रसिद्ध)