Dec 31, 1980

दोहद (सखी सांग झडकरी)

सखी सांग झडकरी सांग दोहदाला |
टाकुनी सर्व कामांसि आजि या जमल्या नवबाला |
कनकांगि न्हाउ घातियले तेजाने |
ओठांत रंग भरियेला ओजाने |
प्राचीस चेतना दिधली सूर्याने |
झुळुक जरी कलिकेस लाजवी हांसवी हृदयिं तिला |
सखी सांग झडकरी सांग दोहदाला ||१||

मुखचंद्र फिकाळुनी गेला लाजू नको |
ओठांत अरुण लपला त्या दडवु नको |
हृदयांत कुतूहल जमले त्या छिपवू नको |
छिपवाछिपवी करूनि असा कां मिहीर तिमिरी लपला |
सखी सांग झडकरी सांग दोहदाला ||२||

हें कौतुकभरले डोळे थरथरती |
लडिवाळपणा ओसंडे सांगू किती |
वात्सल्यसिंधुसी आली की भरती |
प्रेमाशिष देवुनी चिंतिती सर्वमंगलाला |
सखी सांग झडकरी सांग दोहदाला ||३||

पतिचरणा पूजित जावे श्रद्धेने |
दिनधर्मापूर्ण करावे मौजेने |
घटनांसी जोखित जावे बुद्धीने |
सुसंस्कार सद्विचार दोन्हीहि तारिती संततिला |
सखी सांग झडकरी सांग दोहदाला ||४||

मनशांत सदा तव राहो तृप्तीने |
पितरांसि आठवित जावे भक्तीने |
थोरांसि तुष्ट राखावे युक्तीने |
प्रार्थित जा निशिदिनिं कोळेश्वर अदिति वामनाला |
सखी सांग झडकरी सांग दोहदाला |
टाकुनी सर्व कामांसि आजि या जमल्या नवबाला ||५||