Dec 30, 1978

अंगाईगीत (हिमानीसाठी)

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

दिनराज घरीं परतला पाखरे जाती कोटरा
किलबिलाट मंदावला चांदण्या नभा बिलगल्या
तो रक्तरंग लोपला पसरिते राज्य आपुले निशा ||१||

तृणबाळ वनी पहुडले अरविंद पापण्या मिटे
तारांगण फुलुनी उठे चंद्रबिंब आल्हाद ते
तो रत्नखचित पाळणा झुलवितो विश्वदेव राजसा ||२||

हे गाल खोब-यापरी नक्षत्रवरी जांभुळी
गाभुळल्या ओठावरी कुतुहली अंगुली न धरी
टकटका बघोनी तुला होतसे जीव कसा कसनुसा ||३||

मऊमऊ पाय पसरुनी अवनीच्या अंकावरी
तृणबाळ पहा गोजिरी द्वंद्वहीन निद्रा वरी
अंगाई गीत सागरा गाऊनी जोजवी या पाखरा ||४||

तो पूर्वज बलतपनिधि प्रपिताही तेजोनिधि
तो तात पहा वात्सल्ये तुजसाठी श्रमतो किती
हे कौशिकतपकौमुदा अर्थ दे आप्तवृंद आशिषा ||५||

हे गंध नवे तुज जरी क्षणभरी दूर त्या करी
मख्मली जादुच्या उरी लवलवते हिरवे जरी
सांभाळी तूचि तुला थोपवी नव्या जगाची नशा ||६||

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

Dec 11, 1978

गायत्रीची आरती

आरती ओवाळूं जयजय गायत्रीमाते ||
वेदराशि स्वामिनी  वंदितो तवपदकमलाते वंदितो तवपदकमलाते ||धृ||

बहुसुकृतांची जोडि म्हणुनिया द्विज जन्मा आलो |
संसाराच्या चकव्यामाजीं सहजपणे रमलो |
सुखदु:खाच्या पाशामधि परि गुरफटुनि बसलो अचानक गुरफटुनि बसलो |
ज्ञानराशि तव विस्मरणाने संदेहि बुडालो ||१||

चतुर्वेदमय दिव्यदेहिनी ब्रह्ममयी माऊली |
सप्तस्वर छंदर्षिदेवता अलंकार ल्याली |
तत्वअर्थवर्णात्मकशक्ति तेजा सांभाळी | अलौकिक तेजा सांभाळी |
भक्तवत्सले माते तुझिया लोळण पदकमळी ||२||

तपोमयी यज्ञमयी देवी स्वाध्यायमयी तूं |
ज्ञानकर्म सत्संगमबोधे बोध्य एक परि तूं |
शाब्दबोध, तत्वबोधभेदिनि शुद्ध वेदमयी तूं | निरंजन शुद्ध वेदमयी तूं |
वेदहृदय हे समजुनि देई हेंचि तुला प्रार्थूं ||३||

हिरण्मयी वाग्वती भास्वती शाश्वतसुखदात्री |
अजअव्यय परमेशस्वामिनी कोटिभुवनकर्ती |
रविमंडल हृदयस्थ हंसगा वंदू गायत्री | ज्ञानदा वंदू गायत्री |
विश्वमंगले वेदराज्य दे भक्त हेचि प्रार्थी ||४||

आरती ओवाळू जयजय गायत्रीमाते ||
वेदराशि स्वामिनी  वंदितो तवपदकमलाते वंदितो तवपदकमलाते ||

भाद्रपद अश्विन, शके १९००

दोहद (देवि विशाखे)


जयजयजय श्री अदितिवामना कुलदैवत वंदुनि तैसे
देवि विशाखे रुसू नको तू दोहद पुरवू तव कैसे ||

मंगल दिन अजि पातला असे देवि मंगला गौरिव्रत |
सुवासिनी किति कौतुक करिती पूजेसंग तव सुभट |
भोजन करितां बोलू नको परि जरि दोहदभोजन आज
लक्ष रामचे तव पानावर रुचेल त्याते ते तव काज ||१||

आनंदाच्या अमृतडोही आनंदरागिण्या किति फुलल्या |
सुखासीन सौरभामधुनिया आनंदक्षण स्मृति विणल्या |
योग्यवेळी त्या उमलुनि येतील भविष्यांत ‘आनंद विधान’
जपुनिजपुनि परि फुलवि मनाला बंधनांतली मुक्तिच छान ||२||

सद्भावाने प्रेमरसाचे संगोपन तूं बहु केले |
पुण्य पुरुष श्रीराम वामनही शुकव्यासांसी मनी ध्यावे |
स्मरुनी श्वशूरा करी मंगल घरी तव येई आज
पुरोत सगळे शुभसंकल्पही आशिष त्यांचे पुरविती काज ||३||