May 8, 2018

अहंकार

त्याचीच भाषा आपण बोलतो
पण त्याला आपल्याशी
बोलताच येत नाही
तो मुका, का भित्रा ?

चारचौघांसारखाच
त्याचा सूर बेसूर असतो
पण स्वत:ला गंधर्वच समजतो
तो गायक, का बहिरा ?

इतरांसारखाच तो
ओबडधोबड असतो
पण स्वत:ला मदनाचा
अवतारच समजतो
तो सुंदर  नव्हे, अंधळा ...

घरादारांतच असतो
पण त्याच्या मनाचा
थांगपत्ताही लागत नाही
तो गूढ, का आतल्या गाठीचा ?

अन्यायाची त्याला
चीड येत नाही
माणुसकीने तो
विरघळत नाही
तो त्रयस्थ, का बेजबाबदार ?

आपल्यासारखाच
तो सुखी दु:खी असतो
पण अलिप्त असल्याचा
आव मोठा आणतो
तो निर्विकार, का ढोंगी ?

त्याच्या रक्ताचा रंग
लालच असतो
पण एका झटक्यात
हमरी-तुमरीवर येतो
तो संकुचित, का अतिरेकी ?

आधुनिक असल्याचा
टेंभा भारी मिरवतो
पण पत्रिकेतल्या
शनि-मंगळाने
गर्भगळीत होतो
तो बुरसटलेला, अंधश्रद्ध ...

आपल्याच देशात, परिचयात,
घरात, नात्यात असतो
पण गरजेच्या वेळी
गायबच होतो
तो आपला, का परदेशी ?

प्रेम लावतो, लळा लावतो
काळजी करायला लावतो
सुख देतो, दु:ख देतो
तो प्रियकर नव्हे, सहवास ...

अहर्निश सोबत असतो
पण शत्रुसारखा वागतो
आपला सखा, जीवनसाथी
तो आत्मभाव , का अहंकार ?