Nov 29, 2018

लुचपतनगरीत

कुरतडलेल्या पोत्यातले
खंडीभर गहू घेतले
उंदरांच्या लेंड्यांसकट
गावभर फेकून दिले.
थवा आला पक्ष्यांचा
अन्नावर तुटून पडला
चिवडून चिवडून दाण्यांचा
क्षणार्धात फडशा पडला.

पक्ष्यांची फौज मोठी
हावरट साले निर्लज्ज कुठले
सात जन्मांचे उपाशी जणू
भस्म्या झाल्यागत खाऊ लागले.
कुणी मंत्री, कुणी मुख्याध्यापक, 
कुणी बिल्डर, कुणी पोलीस...
अरेरे! सांगायलाही लाज वाटते,
त्यात एक "गुरुजी" पण होते.

कुणी कष्टाने दाणे मिळवत होते
पोटासाठी, शिक्षणासाठी,
औषधासाठी, संसारासाठी.
कुणी दाणे ओरबाडत होते
मस्तीसाठी, गाड्यांसाठी,
रेससाठी, जुगारासाठी.

लुचपतनगरीत, आशा ती कसली?
तरीही, धीर धरा, थांबा थोडे.
कुणी सांगावे, उद्या काय असेल?

एक दिवस असा येईल, 
त्या कुरतडलेल्या पोत्यातले
कणन् कण विषारी बनतील.
अन् त्या पक्ष्यांच्या फौजेतील
सगळे लाचखोर पक्षी क्षणार्धात
बेशुद्ध पडतील. कशासाठी?
एका निष्पाप बाळाच्या
उज्ज्वल भवितव्यासाठी.

Nov 22, 2018

आमचं - तुमचं

आमचं कसं शिस्तीत होतं                       तुमचं कसं बेशिस्त असतं 
आम्ही पहाटे उठायचो                           सकाळी उशीरा उठायचं 
बाबांना अहोजाहो करायचो                    बाबांना अरेतुरे करायचं 
आईचं  ऐकायचो                                 आईचं, आणि ऐकायचं?
उलट नाही बोलायचो                            सुलट नाही बोलायचं 
शाळेत गप्प बसायचो                            शाळेत बेताल वागायचं 
गुरुजींचे रट्टे खायचो                              बाईंचं डोकं खायचं
रात्री पाढे, पावकी, निमकी,                    रात्री फेसबुक, इमेल, 
स्तोत्रे, आरत्या म्हणायचो                        इंटरनेट चाळायचं 
पार्टीसाठी घरामध्येच                             पार्टीसाठी हॉटेलात 
शिरा पुरी खायचो  १.                             नूडल्स बिडल्स खायचं  २.

आमच्या काळी - हे होतं, ते होतं, असं होतं, तसं होतं, हे चालायचं, ते नाही चालायचं ...
तुमच्या काळी - हे नाही, ते नाही, काहीही आहे, सगळंच चालतं, सगळंच भारी असतं   ३.

आम्ही कधी                                        तुम्ही कधी 
उपाशी पोटी झोपलो                             एकटे वाटून झोपता 
दु:ख छातीवर झेललं                             दु:ख आल्यावर पाठ फिरवता
सवयीने एकत्रच राहिलो                         स्वातंत्र्यासाठी एकटेच रहाता
कीर्तन, पुराण ऐकलं                             योगा, विपश्यना क्लास लावता                                  
कठीण परिस्थितीत                               कठीण परिस्थितीत
देवाचं ध्यान केलं  ४.                             मानसोपचारतज्ञाकडे जाता  ५. 

आम्ही - नाटकं पाहिली, चित्रपट पाहिले, गावभर फिरलो, हसलो, रडलो, जगलो
तुम्ही - सोशल मिडीया पहाता, मूव्ही पहाता, जगभर फिरता, हसता, रडता, जगता  ६.

आमचं कसं - तुमचं कसं, असा काथ्याकूट पिढ्यान् पिढ्या होतो
शेवटी, कुणाबरोबर तरी किंवा एकटेच, तुम्ही-आम्ही दोघंही जगतो
तान्हेपणी आई दिसली नाही तर भोंगा पसरतो
मोठेपणी इजा झाल्यावर “आई गं,” म्हणून कण्हतो
मोठे संकट आल्यावर कुणापुढे तरी मदतीसाठी हात पसरतो
देवाला, डॉक्टरला, आईला, मित्राला, कुणाला तरी शरण येतो  ७. 

देव असो वा नसो, डॉक्टर असो वा नसो,
एकटे असू, दुकटे असू, तुम्ही-आम्ही अचानकच मरतो
वरवरचं वागणं दूर केलं तर, आमचं-तुमचं,
आपलंच म्हणूया, नक्की काय वेगळं असतं?  ८.

Nov 16, 2018

गुड मॉर्निंग

शहरातल्या आलीशान इमारतीतले,
अठराव्या मजल्यावरचे ते शेजारी.
भिंतीच्या अलीकडे - ती,
आणि पलीकडे  - तो.

कधी ती टाहो फोडून रडायची,
त्याला ते ठाऊकही नसायचे.
कधी तो चिडून चरफडायचा,
तिला त्याचा मागमूसही नसायचा.

सकाळी दोघे एकाच वेळी
कामासाठी घराबाहेर पडायचे.
चेह-यावर कृत्रिम हसू आणून,
एकमेकांना “गुड मॉर्निंग” म्हणायचे.

त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता.
तिला काय, कुणालाच माहीत नव्हते.
आवडतो म्हणून त्याने शिरा केला.
फारच बिघडला. पण तिची मदत
मागण्याचे धाडस नाही झाले.

त्याच रात्री तिचा लाईट बल्ब फुटला.
स्टूल वापरूनही दिवा बदलण्याइतकी
उंच ती नव्हती. मग अंधारातच राहिली.
त्याची मदत मागण्याची शरम वाटली.
                     ***
तरीही दोघे रोज सकाळी एकमेकांना
न चुकता “गुड मॉर्निंग” म्हणतच राहिली.
नेमाने. “गुड मॉर्निंग" करता करता
अनेक वर्षे उलटली. 
                     ***
गेल्या वर्षी तो परदेशी गेला.
तब्बल सहा महिन्यांसाठी.
तिला काहीही न सांगताच.
“गुड मॉर्निंग” म्हणायला कुणी नव्हते,
एवढाच काय तो फरक तिला जाणवला.

तो परत आल्यानंतर तिची आई वारली.
अचानकच. कुठून तरी त्याला कळले,
पण “गुड मॉर्निंग” म्हणण्याखेरीज
त्याच्याकडे दुसरे शब्दच नव्हते.
                    ***
अन् त्या दोघांमधली ती जाडजूड भिंत,
जी रोज रात्री त्या दोघांचे कढत अश्रू पहायची,
त्यांचा एकाकीपणा निर्विकारपणे शोषायची,
ती तशीच होती, नि:स्तब्ध! गार गार सिमेंटची.
ती तरी काय करणार बिचारी? ती असो वा नसो,
एकत्र असूनही एकत्र नसणारी अनेक कुटुंबे
तिने आणि तिच्या बहिणींनी पाहिली होती.
ती बोलत असती, तर काय म्हणली असती?
“गुड मॉर्निंग,” की अजून काही?