Oct 10, 2019

तो आभाळी, मी दिवाणी

एक रुपेरी पक्षी मजला
दिसला आभाळात
पळभर देखुनी अचपळ माझे
जडले मन त्याच्यावर

इवलासा तो होता सुंदर
मोहक चपळ बिलंदर
दुर्मिळ त्याचे गाणे मंजुळ
झाले मी घायाळ

मखमाली ते पंख चिमुकले
फडफडती आभाळी
लुकलुक डोळे पाण्यावरती
सदा शोधती काही

उंच भरारी त्याची गगनी
का मजला मोहविते?
स्वच्छंदी अन जगणे त्याचे
का मजला आवडते?

जेथे जातो तेथे उडते
भरकटते मन वेडे
पंखाविन ते उडे बागडे
इथे तिथे पलीकडे

तो नसताना उदास होते
क्षणभरच्या आठवणीने
पण वेड्याला ठाऊक नसते
माझे त्यावर झुरणे

असते त्याची दुनियादारी
उंच उंच आभाळी
जमीन त्याला असते एका
बंधित डबक्यावाणी

तो आभाळी, मी दिवाणी
गाते विरहाची गाणी
उडतो तो गगनी मी उडते
कल्पनेत आभाळी

Oct 6, 2019

आता भय ते कसले ?

जुळे अंधाराशी नाते
आता भय ते कसले ?

बीजाचा अंकुर अंधारी मातीत
तेंव्हाच फुलते झाड अंगणात
गर्भामधे वाढे भ्रूण अंधारात
अंधारी उगम सूर्याचा ही रीत
जाणता हे सारे, भय ते कसले ?

नात्यातील गुंते अंधार उसवे
मिटताना डोळे सारे उलगडे
वाईट दु:खद आसवांनी वाहे
चांगले सुखद हृदयात वसे
जाणता हे सारे, भय ते कसले ?

अंधार पडता दृष्टी अडखळे
भास अभासांचे रूप ना वेगळे
खरे खोटे दोन्ही अंधारात काळे
सत्याचे असत्य अंधारात दिसे
जाणता हे सारे, भय ते कसले ?

येणे अंधारातून जाणे अंधारात
प्रकाशाचे खेळ मधल्या काळात
प्राणज्योत विझता जीवाचे निघणे
मैलोंमैल दूर पुढच्या गावात
जाणता हे सारे, भय ते कसले ?

Oct 3, 2019

अंगणात माझ्या

अंगणात माझ्या सोहळे पांढरे
हिमफुले गाती शिशिराचे गाणे

हिवाळी गाण्याचे धवल रंग
हिम कण उडती शहारते अंग

अंगणात रोज शुभ्र फुले बहरती
ढगातून हलके अवनी अवतरती

आला गं आला उत्सव पांढरा
अंधाराच्या गावी उल्हास आगळा

पांडुरंग आता पांढरा दिसतो
शुभ्र फुले लेवुनी नटतो थटतो 

येशील का सख्या, हिमफुले वेचण्या ?
परडी परडी वाहू आपुल्या मैत्रीला

दिन जरी छोटा नको जाऊ प्रिया
अंग़णात लख्ख प्रकाश फुलांचा