Feb 6, 2017

आयुष्याची गाडी

झुकुझुकु जाई आयुष्याची गाडी
मला न ठावे कुठे वळण घेई
क्षणी इथे क्षणी तिथे मारी उडी
सुखदु:खाच्या रुळांवर परिक्रमा करी

अरे पहा ते डोंगर अहा पहा ती नदी
खिडकीतुनी दृष्ये सारी सुंदर दिसती
नका पडु मोही रूपे क्षणिक असती
क्षणार्धात् पहा कशी लुप्त ती होती

आगगाडीत माझ्या बहुत प्रवाशी
इच्छुकनिरीच्छुक सारे यात्रा करी
कुणा न ठावे कुणी कुठुनी येई
कुणा न ठावे कुणी कुठेही जाई

अज्ञानात कोणी आनंद घेई
ज्ञानी यात्रिकही ज्ञानाने मोही
योग्यायोग्याने कुणी संभ्रमात पडी
त्रयस्थयोग्याला मी कुठे शोधी

झुकुझुकु जाई आयुष्याची गाडी
अचानक कशी बिघडुनि जाई
तिला लागे पळाया चैतन्यइंधन
आवडे तिला सुखदु:खाचे बंधन

काही रुळ सारे सुखाचे असती
गाडी तिथे कशी भरधाव जाई ?
जिथे रुळ मात्र दु:खाचे असती
तिथे गाडी कशी धिमीधिमी जाई ?

झुकुझुकु जाई आयुष्याची गाडी
सुखदु:खाच्या रुळांवर विसावा घेई
बांधा बिस्तरा आपुले स्थानक येई
आगगाडीस आता मी दुरूनच पाही