Mar 30, 1996

मंगलाष्टके (कल्याणीचा विवाह)

मूर्ती मंगल ही तुझी नमितसे शक्ति शिवाच्या सुता |
श्री कोळेश्वर माउली अदिति अन् देवेश्वरा देवता ||
मातामंगल तात तो गुणनिधि वंदू सवे माधव |
ज्यां स्मरणे शुभसर्वदा वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ||१||

ना बाबा तुज सोडणार मुळीही हट्टी अशी पोर तू |
शाळेची परि लाभता गवसणी विद्या तरंगी ऋतू ||
गेले गे किति हेलकावत सुखे ल्यालीस गे यौवन |
'ठेवी' च्या धनिका पुढ्यांत बघण्या आतूरले मन्मन ||२||

लक्ष्मी तूं गृहिची जणु बघुनिया आनंद जोशी कुळा |
कन्या देउनि आज माय घरचा स्वानंद ओसंडला ||
सद्भावे श्वशुरांदिका रमवुनी होई गृहस्वामिनी |
गार्हस्थ्ये सकला जनांसि सुखवी भर्त्यासि हो भामिनी ||३||

सखयांच्या तव नेत्री अश्रु बघुनी भांबावली द्योतना |
सहवासोद्भव प्रेमरज्जु किति गे खेंचोनि घेती मना ||
ताटातूट वियोग गाठी सगळे आहे जया आधिन |
'त्या' स्मरणे शुभ सर्वदा वधुवरा चिंतीन रात्रंदिन ||४||

ज्या देशीं रवि पांच तास उशिरा संध्येस आलिंगतो |
ज्या देशीं हिम चार मास क्षितिच्या संगात गे रंगतो ||
ऐशा देशी सुदूर जाशि म्हणुनी काळीज हेलावते |
वात्सल्यास मुली जरी लपवितो तें आंत हंबारते ||५||

विद्येनेच नरास येत पशुता 'कामार्थ' जैं ती वरी |
ती विद्या जरि शुद्ध धर्मसहिता मांगल्य विश्वी भरी ||
ऐसे जाणुनि जो जगे जगति या रक्षील त्या श्रीहरि |
श्री, कीर्ति, यश, सौख्य, प्रेम जगि तो संपादि ध्यानीं धरी ||६||

विद्या, पुत्र, कलत्र, मित्र, सुख गे नांदो अजेया घरीं |
सद् बु्द्धि विबुधां बुधांस सुखवो संपत्ति नांदो करी ||
आकांक्षा धरुनी उरांत बरवी संसारि या झेप घ्या |
ठेवोनी हृदयीं विवेक बरवा उत्तुंग स्थानीं रहा ||७||

ब्रह्माणि शचि पार्वती रति तशी देवो तुम्हा मंगला |
अन् सूर्या तशी अश्विनी कुमरही अर्पोत गे मंगला ||
नक्षत्रांसह लोकपाल अवघे वर्षोत ते मंगल |
ताताच्या सह माय अजि सखये प्रार्थी तुम्हा मंगल ||८||

( पहिले आणि तिसरे कडवे आईचे बाकी बाबांचे )