Apr 27, 2019

ओढ लागली जीवाला

एक ध्यास होता मला भगवंता पांडुरंगा
एक छंद होता देवा तुझ्या नामाचा मुकुंदा 

रुसलास म्हणून मी भक्तीभावे पूजा केली
बोललास नाही तरी श्रद्धा नाही रे सोडली

काळ्या दगडात विठू सखा सोयरा शोधला
अव्याहत केला यत्न पाषाणाला मनवण्या

सारे विश्वासाचे खेळ जिणे एकाकी साहेना
अरे भक्तीचे हे खूळ तुझ्यासवे राहण्याला

तुझ्यावीण एकटी मी जशी राधा माधवाची
तुझ्यासंगे शोभेन मी रखुमाई विठ्ठ्लाची

ओठी विठोबाचे गान मनी रखुमाई देवी
सारे आयुष्य सरले देवा तुझ्या भक्तीपायी

प्रेमभावे अंध झाले तुला मला शोधताना
कशासाठी शोध घेणे तेही आता आठवेना

आज वाटे पुरे झाले नाम घ्यायचे कशाला?
शब्दा अर्थ काय आहे? भावाचाच तो धुराळा

आता नाही हट्ट मला साथ तुझी लाभण्याचा
आता नाही वेड तुझे माझ्या थकल्या पापण्या

नाही उरली कोणती इच्छा अपूर्ण मनाची 
ओढ लागली जीवाला परतीच्या प्रवासाची

Apr 23, 2019

आठवणीतली डायरी

आठवणीतली डायरी तुझी अजून जपून ठेवलीय
मोरपंखी कव्हर घालून कपाटात ठेवून दिलीय

आठवण येते तुझी तेंव्हा
डायरी उघडून बसते
माहीत नसलेल्या गुपीतांचा
छ्डा लावीत बसते
ह्या पानावरची ती "मुग्धा" कोण ?
त्या पानावरचा तो "अनूप" कोण ?
इतक्या वर्षांच्या संसारात काहीच बोलला नाहीस

कुठेतरी अर्धवट लिहीलेली एखाद् दुसरी कविता
मागच्या पानावरचे तारीख नसलेले ते निनावी पत्र, ते कुणासाठी असेल?
मधेच एखाद्या पानावर काढलेले ते पक्ष्याचे सुंदर चित्र
तुझी स्वप्ने, आशा, आकांक्षा, सारे कसे मला नवीन, नवीन
एकाच छताखाली राहत असूनही काहीच माहीत नसलेले

वाचता वाचता रात्र सरते
उन्हाची तिरीप अंगावर येते
तुझ्या अक्षरात आणि शब्दांत अडकलेल्या
माझ्या मनात मात्र अजून काळोखच असतो
न कळलेल्या गोष्टींचा

तू गेलास तरी रोज नव्या रूपात भेटतोस
रोज नव्या रहस्याची भेट देऊन जातोस
आणि मग माहीत नसलेला कुणीतरी
दूरचा पाहुणा होऊन जातोस

Apr 12, 2019

कोकण देशाकडे

निळे जांभळे झरे वाहती हिरव्या कुरणावरती
फुलाफुलांची नाजूक नक्षी पाऊलवाटेवरती

फूलपाखरे रंगीत मोहक बागडती वेलींवर
कोकीळ पक्षी गाणे गाती प्रेमाचे आराधन

दूर कुठेसे समुद्रकाठी देऊळ पडझडलेले
भरतीच्या लाटांनी थकले म्हातारे झालेले

रेतीवर रांगोळी साधी शंख शिंपले कवड्यांची
कुणी काढली इतकी सुंदर? सांग मला गे आई

वेलांटी बगळ्यांची धूसर आकाशी गगनात
झेप उंच परी नजर भूवरी समुद्र लाटेवर

निसर्ग राजा साद घालितो वनराई बोलविते 
चल ना आई जाऊ आपण कोकण देशाकडे