Aug 25, 2018

अर्थ

(वृत्त भुजंगप्रयात)

तुला शोधिले शब्दशब्दात भावा
तुला शोधिले भावभावात अर्था 
मिळाले किती अल्प त्या शोधअंती
कुठे शोधु भावार्थ ह्या जीवनाचा? 

तुला शोधिले हास्यहास्यात मोदा
तुला देखिले अश्रु युद्धात दु:खा
सुखाचे मिळाले किती अल्प रेणू
मिळाले अती दु:ख शोकात अद्री 

तुला पाहिले मातृप्रेमात स्नेहा
तुला जाणिले पितृप्रेमात धैर्या
अहोभाग्य माझे असावे म्हणूनी
मिळाले बहू प्रेम मातापित्यांचे  

तुला शोधिले देशदेशात मित्रा
तुझ्या प्रीतिची आस जन्मांतरीची
मिळाली जरी प्रीति एके दिनी ती
समाधान कोठूनि आणू मला मी? 

तुला शोधिले पंढरी मंदिरीही
तुला जाणिले भक्तिभावात प्रेमा
तुला देखण्या चित्त आसूसलेले
परी दर्शनी, काय होणार आहे? 

तुला शोधिले मालकंसात नंदा
तुला ऐकिले गोकुळी वेणुनादा
समाधान नाही परी शोध अंती
कुठे शोधु भावार्थ ह्या जीवनाचा? 

No comments:

Post a Comment