Aug 1, 2018

आपलं अशक्य

तुला आगीचंच आकर्षण
       तू आगीत तेल टाकत राहिलीस
पण आग विझवता विझवता
       माझी मात्र पुरेवाट झाली

तुझं लक्ष रटरटणा-या संसार खिचडीच्या
       खमंग सुगंधाकडं होतं
माझी अवस्था मात्र कधीही फटफटणा-या
        बुडबुड्यासारखी झाली होती

तू, वारा घाल, जेवण वाढ, पाय चेप,
       अशी सेवा करत होतीस
मला मात्र एकटेपणाचा मोकळा
        श्वास घ्यायची आस होती 

तू "आपण हे घेऊयात, ते घेऊयात,"
       अशी सारखी कटकट करत होतीस
मला मात्र भणंगासारखं जगण्यातच
        मोठी मजा वाटत होती

तू हे घास, ते पूस, हे धू, ते वाळव,
       ह्यातच सुखी होतीस
मला मात्र खोली कितीही स्वच्छ असली
       तरी मनातून घाणच येत होती

तुला आयुष्यात कधी गोड आशा
       तर कधी घोर निराशा दिसत होती
आशानिराशेच्या जुगार खेळात पडण्याची
        माझी  इच्छाच नव्हती

तुला भांडणतंटा लाडीगोडी काहीतरी
        एकत्र करण्याची इच्छा होती
मला मात्र तुझ्या सहवासाचीच
        सतत भीती वाटत होती

तू हवेत तरंगत होतीस
      पक्ष्यासारखी मुक्त बागडत होतीस
मला मात्र गुरुत्वाकर्षणाने
      जमीन गच्च खाली खेचत होती

तुला कधीतरी एकत्रित आयुष्याची
      नीट सुरुवात करायची होती
मला मात्र आयुष्याची सुरुवातच
       तुझ्याशिवाय करायची होती

No comments:

Post a Comment