Feb 19, 2019

देव आणि जावई

देव काळाकुट्ट चालतो - जावई गोरापानच लागतो. 
देव तान्हा, तरुण, म्हातारा चालतो - जावई मुलीपेक्षा मोठाच लागतो. 
देव लांब सोंड असलेला चालतो - जावई दीड इंची नाकाचाच लागतो. 
देव एक दात असलेला चालतो - जावई अठ्ठावीस ते बत्तीस दातांचाच लागतो. 

देव आभाळात, पाण्यात, देवळात, गुरुजींत, आईत, हत्तीत, नृत्यकलेत, मनात, दिव्यात, दगडात, कुठेही, कशातही, चालतो -जावई जमिनीवर आणि माणूसच लागतो. 
देव निर्गुण, निराकार, निळा, काळा, गोरा, कितीही तोंडे असलेला, लंगडा, कितीही हात पाय असलेला चालतो -जावई आकारबद्ध, एकतोंडी, दोन पायांचा, नाकी डोळी नीटस, देखणाच लागतो. 

देव साधा गरीब असेल तर उत्तम - जावई चलाख श्रीमंत लागतो. 
देव लठ्ठ ढेरीचा चालतो  - जावई लठ्ठ पगाराचा लागतो. 
देव येशू, महम्मद, मेरी, एल, शादाई, इत्यादी, मोजकी नावे वगळता कोणत्याही नावाचा चालतो
-जावई अर्थपूर्ण नावाचा आणि मुलीच्या नावाला साजेसा लागतो. 
देवाला आडनाव नसते - पण आडनाव नसलेला मनुष्य जावई होऊच शकत नाही. 

देव एक, तेहतीस कोटी, अनंत, कितीही संख्येचा चालतो - जावई एका वेळी एकच लागतो. 
देव स्त्री, पुरुष, प्राणी, झाड, नदी, पर्वत, नाग, अतिथी चालतो - जावई पुरुषच लागतो. 
देवावर हळदीकुंकवाचा वर्षाव केला तरी चालते - जावयाला कुंकवाचा जास्तीत जास्त एक टिळा चालतो. 
देवाला सोवळे धोतर नेसायचे असते - जावयाला जीन्स द्यायची असते. 

देवाने मानेभोवती नाग गुंडाळला किंवा कवट्यांची माळ घातली तरी चालते
- जावयाने तसे काही केले तर पोलिसांना सांगण्यात येते. 
देवाने लांब लांब जटा वाढवल्या तरी चालते -जावयाने केस वाढवले तर ब्युटी पार्लरचा पत्ता देण्यात येतो. 
देव शंकराप्रमाणे घरजावई बनू शकतो - जावई घरजावई झाला तर हेटाळणी होते.
देवाला अरेतुरे केले तर चालते - जावयाला अहोजाहो करावे लागते. 

देव दरवर्षी चातुर्मासात भरपूर झोपतो - जावई एखाद् दिवस नऊ वाजता उठला तरी निंदा होते. 
देव नंदीवर बसून आला तरी चालते - जावयाकडे मात्र महागडी कारच लागते. 
देवाने एकवीस मोदक खाल्ले तरी चालते - जावयाने नऊ मोदक खाल्ले तरी भुवई उंच होते. 
देव एकपत्नी व्रत अवलंबलेला, पुष्कळ गर्लफ्रेंड असलेला, संन्याशी, बायकोला सोडून जाणारा चालतो
-जावई एकपत्नी व्रत घेणारा, बायकोला सोडून न जाणारा लागतो. 

देवाला जात नसते - जावयाची जात जाता जात नाही.  
देवाची आणि आपली पत्रिका जुळतेय की नाही कुणी बघत नाही
- पत्रिका तपासल्याशिवाय जावयाकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. 
देव एरवी सर्वत्र असला तरी शक्यतो भारतातल्या आभाळात राहतो - जावई परदेशी राहणाराच लागतो.

अनुमान : देवाला एरवी काहीही करण्याची शक्ती असली तरी तो प्रयत्नांतीही जावई होऊ शकणार नाही. 

Feb 17, 2019

मानवा प्राण तळमळला

ने मजसी ने परत पूर्वरूपाला । मानवा प्राण तळमळला ।।धृ ।।

युगयुगान्तरी विमल तरल मी होतो । धरणीला रक्षत होतो ।
जगजीवांना प्राणवायू मी दिधला । अन् कर्बवायू शोषियला । 
अव्याहत ते चक्र चालले होते । मनु जन्माआधी होते ।
                         तव कृत्यांनी ते डळमळले ।   
                         संतुलन सारे गडबडले ।
                         निष्पाप जीवही गुदमरले ।
अपराध तुझा, शिक्षा का सा-यांना? मानवा प्राण तळमळला ।।१।।

तव आचरणी विश्व प्रदूषित झाले । पाण्यात नको ते आले ।
बहु रसायने त्याज्य पदार्थही आले । ते नीर विषारी झाले ।
लाटांवरती तेल काजळी आली । जल सृष्टी भयभीत झाली ।
                         ते कलुषित पाणी पोटांत ।
                         शिंपले मासळी मूर्च्छित ।
                         शैवाल समुद्री निष्प्राण ।
अपराध तुझा, शिक्षा का सा-यांना? मानवा प्राण तळमळला ।।२।।  
                       
मातेसम जी, पृथ्वी, आई, धरती, ही । व्याकुळ होई मम जननी ।
परि अबला ती, देखी जे होई ते । कित्येक जीव बघ मेले ।
मी शोकाने धाय मोकलून रडतो । आईचे अश्रू ना पुसतो ।
                          करू कसे आईचे रक्षण मी?
                          समजेना मजला काहीही ।
                          तव साह्य न मिळता दुर्बळ मी । 
अजि उठ नरा, तत्पर करणे आता । वा  मृत्यु सागरी तुजला ।।३।।

Feb 2, 2019

नारायण पळे !

गुलाल उधळे      हवेत मिसळे
व-हाड वधूचे      गावांत थडके
विवाह मुहूर्त       उद्याच पहाटे
घाबरा घुबरा       वर थरकांपे  १.

वाजंत्री तुतारी      सनई चौघडे
दाराला तोरण      रांगोळी रंगीत
गुलाब केशरी      झेंडू फटाकडे
जिलेबी पुरण       श्रीखंड पानांत  २.

दारांत पाहून        वधूच्या वेषात
सुंदर गोजिरी       नवरी पुढ्यात
साक्षात मोहिनी     मेंदीत रंगली
छातीत धडकी      वराच्या भरली  ३.

मनात वादळे       काळीज थर्थरे 
पोटांत गोळा नि    पाय लटपटे
चढतां बोहला       ब्रह्मांड आठवे
मंगलाष्टकांत       “सावधान” ऐके  ४.

संसारा भिऊन      रामाला शरण
देवाला स्मरून      क्षणिक ध्यानस्थ
विवाह मोडून        फरार तेथून
द्वादश वर्षीय        नारायण पळे !  ५.