Jun 30, 2019

तुजवीण रजनी

निजली मैना निजला राघू
निजले वृक्ष नि वेली 
मंद झाली ज्योत समईची
निजला हरी मंदिरी

जड झालेले नयन दाटती
दिसे तुझी सावली
भास मनाला उगाच होई
भिववी रजनी काळी

निशिगंधाचा गंध पसरतो
मदनबाण दरवळतो
सुवास त्यांचा, गहिवर येतो
रात्रीच्या प्रहरात

मऊ बिछाना काट्यांसम रे
सर्वांगी टोचतो
निद्रादेवीचा शाप मला अन्
जिव्हारी लागतो

कुठे हरवशी सांग सख्या रे
गगनी का स्वर्गात?
तुजवीण रजनी साहेना मज
अडखळतो रे श्वास

Jun 7, 2019

आठवणींचा गंध पुरे !

नको परतणे फिरुनी मागे
पुढे जायच्या वाटेवरती
आठवणींचा गंध उराशी पुरे ! नको वेडी गाणी

दोन दीसांच्या संसाराची
धुरा वाहूया आंनदाने
आठवणींचा गंध येऊदे घटनांचे निर्माल्य

क्षण क्षण येता येता जातो
देतो पश्चात्ताप
प्रायश्चित्त घेताना सरते क्षण क्षण आयुर्मान

आठवणींचे सार कोणते?
काय शिकावे त्यांतून?
‘गंध फुलांचा’ याहून काही नसे त्यांस सारांश 

सुकती पाने, फूलपाकळ्या
काळाच्या ओघात
गंध राहतो त्या सर्वांचा केवळ मनांमनांत

नको दु:ख गेल्याचे आणि
नको क्लेश मृत्युचा
गेले ना जर काही मागे कशी नव्याला वाट मिळे?

Jun 4, 2019

सांगून जा

गे सखे जराशी थांब जरा
चंद्रमा नभी ना अवतरला ॥धृ॥

कथ हृदयातील गूढ कोणते?
लाल गुलाबी गुलाब फुलले
गालांवरच्या लज्जेचे ते
कारण मजला सांगून जा

हृदयावरती राज्य करे जो
स्वप्नामध्ये तुला भेटतो
नाव तयाचे काय सखे गे 
आज मला तू सांगून जा

चित्त चोरले ज्या प्रेमाने 
सखीस माझ्या वेड लावले
लक्ष तुझे अन् कुठे हरवले
नाव तयाचे सांगून जा

हळवी झाले तुझ्याचसाठी
मनी काळजी तुझी दाटली
चंद्र चांदण्या फुलण्याआधी
गुपीत मनीचे बरसून जा