Jul 24, 2018

सप्तपदी

भेटीचं आपल्या, नक्की काय कारण होतं?
माझं तरी तुझ्यापेक्षा पोह्यांकडेच लक्ष होतं  १.

मैत्रीचं आपल्या, नक्की काय कारण होतं? 
बाबा म्हणले सगळ्यांचं त्यातच नक्की भलं होतं  २.

लग्नाचं आपल्या, नक्की काय कारण होतं? 
सगळे म्हणले आपलं तेंव्हा वय उलटून जात होतं  ३.

प्रेमाचं आपल्या, नक्की काय कारण होतं? 
माझं तरी तुझ्यापेक्षा स्वत:कडेच लक्ष होतं  ४.

बाळाचं आपल्या, नक्की काय कारण होतं?
मला किSनी कधीतरी आई होऊन पाह्यचं होतं  ५.

सहवासाचं आपल्या, नक्की काय कारण होतं? 
मला वाटतं आपलं सगळं सवयीकडेच लक्ष होतं  ६.

संसाराचं आपल्या, नक्की काय कारण होतं?
दुसरं काही सुचत नव्हतं म्हणून बहुतेक गाडं ओढलं  ७. 

बहिणींची तुलना

 टीप: सदर कविता एका श्वासात म्हणावी.

तू लाल मी हिरवी, तू ड्राईड मी बेक्ड
  तू गोवा मी शिमला, तू हॉट मी फॅट
तू लुक्कड मी ढब्बू
तुला मान मला पोट
तू पावशेर मी किलो
तू लवंगी मी भोपळी  
तुझा तवंग मी खमंग
तुझा तोरा माझा डेरा
तू वाळकी मी भरली
तू चवीला मी पोटभर 
               तू झणझणीत मी मिळमिळीत
                   तुझी साठवण माझी पाठवण
                        तुझं वाळवण माझं कालवण
तू फोडणीत मी भाजीत
तू गावरान मी विलायती  
तुझं लोणचं माझं बिणचं 
तुझा ठेचा माझा ढोकळा
तुझा ठसका माझी ढेकर
तुझं तिखट माझं पंचामृत
तू फटकळ माझी फतकल
तू थोड्यांसाठी मी सर्वांसाठी

Jul 22, 2018

गेला कुठे महादेव?

(एकता, जानेवारी २०१९ अंकात प्रकाशित)

एकसंध भव्य लेणी                    अर्पू श्वेत पुष्प, बेल
दिव्य मंदिर रुद्राचे                     जल, दुग्ध, कर्पूरही
नक्षीदार कारागिरी                     जागृत हे देवस्थान
माथी सुवर्ण कळस  १.               देव नवसाला पावेल  २.

जटाधारी साधुयोगी                   महाशिवरात्रीसाठी 
भस्मरेषा स्पष्ट भाळी                 उठे भक्तांचं चांदणं  
भस्म चंदन रुद्राक्ष                     बाल, वृद्ध येती सारे
सारे गंगाधरासाठी  ३.                देवा भक्तीचं आंदण   ४.

देवदर्शनाच्या दारी                   "देव सोयरा सोयरा
कुणी पांथस्थ भिकारी               दीन दुबळ्यांचा वाली
अंध, भुका हवालदिल               अशक्य ते सारे शक्य
ओवी गोड गोड गाई  ५.            महादेवा तुम्हांसाठी"  ६.

किती मधुर मंजुळ                    कुणी रत्नाचे, मोत्याचे
त्याचा सूर दिलबहार                 देवा घाली हारतुरे
शिवा ऐकू का न येई,                 शिवलिंगा अभिषेक
कर्णबधिर का ईश?  ७.             दगडावर दुग्धनदी  ८.

सभोवती पोरेबाळे                    कुणी चोर, गुन्हेगार
गरीबाची भुकीपोटी                  खिसेकापू, छेड काढी
लोट्या पाहून दुधाच्या               देवाच्याच दारी सारे,
डोळे अधाशी लाचारी  ९.          भोळा सांब कां न बोले ? १०.

जिथे तिथे अंदाधुंदी                  भगवंताच्या कृपेनेच
स्वार्थ, लोभ, दुर्जनता                मिळे भक्तां मति, रीति
मंगळसूत्र घट्ट धरी                   स्वार्थापायी त्यांची नीति
स्त्रिया भाविक दर्शनी  ११.         कशी गंजली, गंजली?  १२.

एका मानवाचे दु:ख                  देवा सदाशिवा रुद्रा 
दुज्या मानवा दिसेना                 सांग दुर्लक्ष कां करी?
एक भुकी झोपी जाई                गेला कुठे महादेव  
दुजा अति खाई खाई   १३.         दीन दुबळ्यांचा वाली?  १४. 

कविता म्हंजे?

कविता म्हंजे?
भावनांची कदर
स्वत:च्या, इतरांच्या.  
अनुभवांचे विमल चित्र.
वर्तमानाचे दारुण प्रदर्शन.
भविष्याची दिव्य भव्य स्वप्ने.
काल निरपेक्ष जगण्याचे साहस.
निर्लज्जपणा, दया, प्रामाणिकपणा.
अनाहूत सुरांचे सुरेल वा बेसूर गाणे.
विनंती, औदार्य, स्वातंत्र्य, निंदानालस्ती. 
जुन्या आठवणींच्या बकुल फुलांचा सुगंध.
भूतकाळ पुसून टाकण्याची उगाचच धडपड.
काल, आज, उद्या, परवा हे आठवणं, विसरणं.
व्याकरण, भाषाशास्त्र ह्यांपासून किंचितशी ढील.
कल्पनेने सगळं काही निर्माण करणं, उध्वस्त करणं.
कल्पनेच्याच आधारावर पृथ्वीवरून मंगळावर जाणं.
शब्द हाच सूर, भावनाच ताल अन् कविता ही बंदीश.
सहानुभूती, थट्टा, विनोद, मैत्री, प्रीती, भांडण, तंटा.
शब्दांची -भावनांची चिरफाड, टीका, आत्मस्तुती.
जीवनाला सामोरे जाण्याची प्रामाणिक धडपड.
कल्पनेत रमून जाण्यासाठी सत्यापासून दूर
जाण्याची आयुष्यात केलेली मोठी तडजोड.
कुरूपच सुंदर कसे आहे ते सिद्ध करणं.
कधी समाजाचे, प्रेमाचे धिंडोरे काढणं. 
सुंदर गोष्टीतले दोष दाखवून देणं.
भाव भावनांचे क्लिष्ट लांब पाढे.
पाण्याने काठोकाठ भरलेल्या
काळ्या ढगासारखं जगणं.
शब्दांच्याच सहवासात
जगणं जगणं जगणं.
आयुष्य संपेपर्यंत
धीर देणं,धरणं,
शब्दानेच. 

Jul 19, 2018

कविता बाराच्या भावात

पुस्तकांच्या दुकानात
       एक कवितासंग्रह दीडशे कवितांचा.
किंमत किती?
        अवघे एकशे चौतीस रुपये. बापरे!
म्हणजे एक कविता
        सुमारे एक रुपया बारा पैशांना.
अगदी मर्ढेकरांची
       अन् इंदिरा संतांची सुद्धा...

मध्यमवर्गीय माणूस विचार करतो, काय घेऊ?
-एक कवितासंग्रह?
-दोन पिझा स्लाईसेस?
-एक तासाचा योगा क्लास?
-दोन लीटर पेट्रोल?
-एक सिनेमाचे तिकीट?
-दोन ड्रिंक्स की
सहा भेळीचे पुडे?...

सुख, दु:ख, प्रेमभंग,
      विरह, जन्म, मृत्यू,
तारुण्य, वार्धक्य, संसारचिंता
      हे तर सर्वांनाच अनुभवायला मिळते.
ते शब्दांत मांडून त्याचा
     अनुभव तर टाळता येत नाही आणि
तेच तेच उगाळून मन:शांतीही लाभत नाही.
      मग काय करायच्यात कविता अन्
नको त्या जीवनाच्या चिंता?

हे कवि लोक असा काही आव आणतात की
       सुख दु:ख फक्त त्यांनाच होते.
जणू काही कमळाचे फूल त्यांनाच प्रथम दिसते.
       अन् प्रिय व्यक्तीच्या वियोगाचा योग
जणू काही त्यांच्याच पत्रिकेत फक्त असतो.

मग त्या उघड्या भावनांच्या प्रदर्शनासाठी
       मी कशाला पैसे मोजू?
उगाचच विकतचे दुखणे,
       अन् फुकटच्या चिंता!

त्यापेक्षा
     १ लीटर पेट्रोल घेतो,
     २ भेळीचे पुडे, १ मोगरीचा गजरा,
     २ आईस्क्रीमचे कोन घेतो.
     बायको खूष होऊन जाईल!
...

नंतर काही वर्षांत
     एक कविता आठ आण्याला विकली जाते.
अन् मग कविही कवितासंग्रह
     करण्याच्या भानगडीत न पडता
बी. एड, एम. एड, वगैरे करून
     शिक्षक होऊन मोकळा होतो.
कवितेचा "भाव" दोन्ही अर्थांनी घसरतो.

एक दिवस कवि सारसबागेत
      अर्ध्या सुक्या भेळीचा पुडा घेतो.
त्याच्या लहानग्या मुलीच्या हट्टापायी.
      अर्धी भेळ किती, तर बारा रुपयांची.
अन् भेळीच्या पुडक्याचा कागद तो कोणता?
       तर वर्तमानपत्रातील कुसुमाग्रजांच्या
"कोलंबसचे गर्वगीत" कवितेचा.
       ते पाहून कवि सद्गदित होतो.

घरी येऊन "बाराच्या भावात कविता "
      नावाची जी कविता तो करतो
तिची किंमत त्याच्यालेखी अमूल्यच असते.
      मग जगाच्या लेखी ती शून्य का असेना!

Jul 13, 2018

धनगरवाडी

जांभूळगावची धनगरवाडी | वाडीतली वाट कशी सापावानी | सप सप सप सप ||

अल्याड पल्याड शेतीभाती हणमंताची | रानावानी | हिरवीगार हिरवीगार ||

शेतीवर पिंपळ बिलगून पाट | वाहे कसा | झुळु झुळु झुळु झुळु ||

पाटावर इंदु लई लई ग्वाड | पीक काढी | सुगी झाली | लगबग लगबग ||

हिरवी चोळी | तांबडं लुगडं | नाकात नथनी | तरनीताठी | तरनीताठी ||

इंदुचा आजा हणमंत | कळकट नेसू | लाल लाल पागुटे | धनगर जात धनगर जात ||

थकला आजा | घाम पुशी | कांदा भाकर पोटभर खाई | पानी ढोसी | गुडुक गुडुक || 

आजाची धणीन म्हाळसाबाई | घरदार राखी वाघावानी | डर डर डर डर ||

आजीचं केस कसं कापसावानी | पांढरं कुरुळं मोकळं सोडी | वळ वळ वळ वळ ||

इंदुचा दादला आळशी गेंडा | बेवडा कुठला | कुंभकर्न कुंभकर्न ||

माडीवर पोरगं काळं बेंद्र | बापावानी झोपा काढी | डाराडूर डाराडूर ||

मारुतीची घंटा घनघन वाजं | पोरगं उठं | भोंगा पसरं  | किर किर किर किर ||

आजीचं डोस्कं गरगर फिरं | पंख्यावानी | हिकडं तिकडं | हिकडं तिकडं ||

अबोली

दो प्रियसख वरिले मी ग्रीष्म नि वसंत     
तप्त मित्र गुंजारव मदनिका विरक्त 

रंगांच्या दुनियेतच धुंद नृत्य करी मी
ग्रीष्म की वसंत हा प्रश्न का सतावी?

पीत लाल ना केसर तप्किरी गुलाबी 
मम नामक रंगधारी लाजरी अबोली

रक्तवर्ण रतन रम्य प्रिय श्री गजानना
मोहकशी पुष्पवेणि शोभतसे गौरीला

अंगाची लाहीलाही आषाढी अल्प होई
तप्ततनु दाह परि हरिदासी शाश्वत मी   

गंध नव्हे यास्तव सोडुनि मज जाऊ नको
भक्तिनेच प्राप्ति तुझी अहर्निश रात्रंदिन 

मुग्ध भाव प्रेम परि हृदयस्पंदी दाटतसे
तन मन धन अर्पाया देवघरी रुद्रप्रिया

मौनव्रत जन्मजात स्फूर्ती मिळे कविमना
गुम्फनिका शब्दांची भक्तिभाव वल्लभा

माधुरी

आज ती भेटली. तब्बल एकतीस वर्षांनी. होय तीच ती, माधुरी. माझी बालमैत्रीण. जिच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालो. जिच्यासोबत मी लहानपणी तासंतास घालवायचो. जिच्यासाठी मधल्या सुट्टीत जेवायचे थांबायचो. जिला काला खट्टा बर्फाचा गोळा प्रेमाने खाऊ घालायचो. जिच्यासाठी चोरून चोरून घरून लिमलेटच्या गोळ्या खिशात बांधून न्यायचो. आणि जिच्यासाठी आजीशीही कधीतरी खोटे बोलायचो. जिच्या हट्टापायी उंच उंच झाडांवर चढून चिंचा कै-या पाडायचो. ती अन् मी शाळेत एकाच बाकावर बसायचो. जिच्याशिवाय दुसरी कोणती मुलगीच मी ओळखत नव्हतो, अगदी आजकाल पर्यंत. जिच्या रंगारुपाने मी पार घायाळ झालो होतो आणि जिच्या गुणांवर मी भाळून गेलो होतो. तीच ती माधुरी, माझी सखी. माझी बालमैत्रीण. आज भेटली.

तिचे ते कुंदकळ्यांसारखे दात, तिचे ते मधुर हास्य. सावळाच रंग पण तरतरीत नाक, लालचुटुक ओठ, सडपातळ बांधा, काळेभोर दाट केस, लाघवी स्वभाव, नावाला साजेसा गोडगोड आवाज आणि कुशाग्र बुद्धी. सारे काही तसेच होते. जणू काही तीस वर्षांच्या उन्हाळ्यापावसाळ्यांचा स्पर्शही तिच्या त्या सौंदर्याला झाला नव्हता. कुठ्ठे कश्शाला नाव ठेवायला जागा नव्हती. आजही ती विशीच्या तरूणीसारखीच मोहक दिसत होती. अगदी तीन मुलांची आई असली तरीही.

वर्षानुवर्षे तिला भेटायची, तिच्यापाशी मन मोकळे करण्याची वाट पाहत होतो. रात्रंरात्र तिच्यासाठी जागवल्या. इतकी वर्षे सडाफटिंगच राहिलो. तिच्याच आठवणींत जगलो. शेवटी आज एकदाची ती भेटली. आषाढी एकादशीला, भर दुपारी तीन वाजता. जोगेश्वरी जवळच्या चहाच्या दुकानात. पु-या एकतीस वर्षांनी. तेच ओठ, तेच हसू, तोच मधुर आवाज, तीच भेदक नजर, तीच कुशाग्र बुद्धी, तेच सौंदर्य, तीच बालमैत्रीण, तीच माधुरी, पण... आज तिला भेटल्यावर काहीच कसे वाटले नाही?

चहाचा कप संपेस्तोवर नुसते हुं हुं करत बसलो. चहा किती गोड झाला होता. पाण्याऐवजी जिलबीच्या पाकातच जणू केला होता. आणि चहाच्या पुडीपेक्षा वेलदोड्याचीच पूड जास्त टाकली होती. चहा कसला तो, जणू वेलदोडी स्वादाचा जिलबीचा गरम पाकच! चहा नाव असले तरी तो चहा वाटत नव्हता. अन् माधुरी नाव असले तरी ती माधुरी वाटत नव्हती.

काय त्या कंटाळवाण्या सांसारिक गप्पा करत होती. चहासारख्याच गोड गोड पण अगदी नकोशा. काय तर म्हणे, नवरा कर्तबगार आहे. काय तर म्हणे, मुले खूप हुशार आहेत. नोकरी छान आहे अन् पगार उत्तम आहे. सासर प्रेमळ आहे. गाडी अमकी आहे, बंगला तमका आहे अन् जिथे राहते तो परिसर ढमका आहे. असेना का, मग मी काय करू? हो आणि हे पण म्हणाली की ती सुखी आहे. आता मात्र कमालच झाली! किती खोटे बोलावे एखाद्याने! इतक्या वर्षांत आयुष्याबद्दल ही काय नक्की शिकली? खरंच ती सुखी आहे, की मिळाले त्या आयुष्याला ती "सुखी आयुष्य" म्हणत आहे? काही का असेना! चहाचा एक घोट घशाखाली उतरत नव्हता अन् तिचा एक शब्दही ऐकावासा वाटत नव्हता.

हीच का ती माधुरी? ती  बालमैत्रीण? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला. बापरे! ती तीच होती. तीच सुंदर माधुरी. आता एक्कावन्न वर्षांची. बालमैत्रीण असली तरी ती माझी कधीच नव्हती. एखाद्या चित्रपटातल्या नायिकेसारखी ती खोटी खोटी वाटत होती. काल्पनिक, सुंदर, मनमिळाऊ, पण माझ्यापेक्षा भलत्याच विश्वात वावरणारी.

चहा संपला. माधुरी गेली. मला मात्र आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली. तब्बल एकतीस वर्षांनी.

तिचं पत्र

तिचं पत्र आलं अन्             छातीत धडधडलं
मनी विचारांचं                   गूढ काहूर उठलं  १     
  
का लिहिलं असेल?            काय लिहिलं असेल?
कशी असेल ती?               नवीन काय घडलं?  २      
 
का तोच शिळा भूतकाळ     त्याच वेड्या आठवणी
तेच भावनांचे पूर अन्          तेच खुसपट उकरणं  ३        
 
असं का झालं अन्             तसं का नाही झालं?
तेच निरर्थक प्रश्न अन्         बिनबुडाचे आरोप  ४          

जे विसारायचं तेच             ती का आठवून देते?
नियती हात धुवून              का पाठीस लागते?  ५         

सारं कसं माझं                 सुरळीत चालू होतं
ठरवलं तसंच तर              सारं घडत होतं  ६          
  
अन् अवचित् आज            कसं तिचं पत्र आलं?
छातीत धडधडलं              गूढ काहूर माजलं  ७         

मनाचं मनाशीच नातं          भाबडं अन् निरागस
एक मन प्रकटलं               दुसरं मन बावरलं  ८