Dec 31, 1970

महादू

तडकत्या उन्हांत रस्ता सळकत होता
वरून सुन्न होता खालून उन्ह होता
डांबराचे पाणी दिसायला लोणी
कातल्या पायांना नागोबाची फणी

ढगाच्या जोषांत महादू चालला
रस्ता डासवला दोन व्यक्ति
लांबोडी आकृती म्हादूची प्रकृती
दुसरी सांवली त्याचीच विकृती

रोज रोज जातो महादू ह्यावेळी
एकटाची येतो रस्ता वाजवितो
माजलेले रान खाजवित जातो
दाढीच्या खुंटांत दु:ख छुपवितो

पावसाळा आला ढग गरजला
रस्ता वाफाराला चिंबचिंब झाला
नदीचा प्रवाह भासूं लागला
मनाच्या कप्यांत हांसूं लागला

आणि तिकडून ढगाच्या जोषांत
येणारा महादू कसा घसरला
चिंब रस्त्यावर आडवा झाला
विश्रांतीचा नशा असा चढला !

१२ जानेवारी १९६३

पोटोशीला

ही सुहृदाची भेट घेऊनि सखे पलीकडे जा |
                  मला अन् पूर्ण विसरुनि जा ||

नको कुस्करुं पूर्वस्मृति त्या भूति ज्या निमाल्या |
                    काळ जरि उजळुनिया गेल्या ||

ते शपथांचे ढीग भार जा गाठी मार त्यांना |
                   अर्पि त्या शतपाताळांना ||

सांग...सखे...अन् सांग ओरडुनि जनसमर्दाला |
                       बोल द्या माझ्या माथ्याला ||

दु:ख तुला जरि प्राणपणाचे क्षिती मला नाही |
                       कशाला केली अशी घाई ?

झाले माझे काम आता चल कर झडकरि काळे |
                           मला अन् भोगूंदे दुसरे ||

कथा कुणाची व्यथा कुणा नियतीही अशीच जगताची |
                            आणि ती अशीच चालायची ||

कृतघ्न  (१९६८)

माझी गरीब झोपडी

माझी गरीब झोपडी मला जरी शामियाना |
हिच्या कणाला कणाला येती ममत्वाच्या वेणा ||

हिला कंगोर घालोनी खडे सदा निवडुंग |
मदतीचा हात देती त्यांना कराळ भुजंग ||

तरी सांवरून जरा वळा माझीया वाटेला |
काट्या धोंड्यांची संगत सदा तुमच्या दिमतीला ||

पहा झुंझाट हे वृक्ष गगनाला सुळी देती |
चांदण्याही ज्यांच्या शौर्या वेडावून डोळा देती ||

या, ना गेंद केतकीचे मान लवोनि दमले |
थोर पायांच्या स्वागता सोनेरी हे पक्षी आले ||

...नका दचकू इतुके नाही भिण्याजोगे काहीं |
रानवेलींचे वेटोळे... ससोबांना घर देई ||

क्रूर श्वापदेही देती किंचाळून सांग काय |
चैतन्याचे आम्ही दूत आम्हा श्रमाचे हो काय !

आम्हा खळगी भरण्या नाही आई बाप कोणी |
सकाळच्या न्याहारीला रक्तमांस नाही लोणी ||

जन्मापासून आमुच्या को-या करंट्याच हांती |
ज्यांच्या वेड्या वेडावण्या क्रूर दंष्ट्र की हांसती !

लदबदले हे वृक्ष आंबे अंजिरेही त्यांत |
भुकेलेल्या पक्षिगणा सुगंधाने हांकारित ||

हंस शुक अन् सारिका तसे कोकिळ कूजन
पारव्यांच्या थव्यासंगे डोळे जाती उंचावर ||

उंच वृक्षांच्या फांद्यांना धुंद मधाळ पोवळा |
लाल सोपस पायांना जशी पोट-यांची पोळी ||

एक लचका तोडण्या नका अधीर हो होऊ |
भ्रम विनयाचा होई ...जरा थोडी वाट पाहू !

सळसळाळता झरा कसा चपळ गतीने |
हुली देतो खडकांना कशा नाजूक चुष्कीने !

आता मात्र सांवरून नका पुढे पाय टाकूं |
निर्विषण्ण शांततेला असा धका नका लावू ||

नका डोकावू वा-यांनो कसे तुम्हाला न कळे ?
माझी लाडकी चिमुली निन्नावली तृणबाळे ||

Dec 30, 1970

जरी एकटा असशी तूं तरि

तृणपर्णांच्या मखमालीची
जरी असे तुज आज पर्वणी
तरीही स्मरणीं असूंदेत तव
तप्त उन्हाळीं नाही कोणी

हंस-या ओठीं येशी तूं जरी
तुटपुंजी परि तुझी शिदोरी
जगायचे तर जीवा वांचून
मरायचेही मरणांवाचून

जन्म मृत्युची दोन्ही टोके
जुळून आली तुझ्या जीवनी
दूर एकटी कधी न राहे
अभंग त्यांची तिखट सगाई

खोल खोल जायचे यापुढे
बूड मात्र कधीही ना लागे
जीव वरी परी शरीर खाली
काळोखाच्या भिंतीमागे

कुरतडून काळोख्या भिंती
सचैल किरण कधी न मिळती
आकांताने स्फोट उडवुनी
पणास लावी सारी शक्ति

जरी एकटा असशी तूं तरी
आत्म्याची अस्मानी शक्ति
गरुड बघ झेपावे वेगे
पुढती ठेवुन भेदक दृष्टी

(१९६८)

झरझरझर सरसरसर

झरझरझर सरसरसर मार्ग विरे पटपटा
वेगाला धुंदि नवी अन् कठोर अस्मिता

त्या हिरव्या कंचुकीस पदर वेष्टि झुळमुळात
चटकदार वळणांना शालीनसे सांवरीत

उंच शिडांचे पर्वत सपसपत्या अन् सरिता
जन्मजात की कविच्या सहजस्फूर्त ह्या कविता

ही पानांची सळसळ गगनाला घुसळविते
रोमांचित या वेगा स्निग्धकरी नवनीते

अन् वेगा कैफचदे सळसळाळ लळलळाळ
उन्मादित नागिणीची कांति ल्यात झळझळाळ

फूत्कारांचा प्रवेग उन्मळवी वृक्षमुळे
हादरती भूपृष्ठे गळती अन् पुष्पफळे

परि त्यांना उचलण्यास पोर तिथे नाही एक
भय दाटुनि पोटामधी गती पाहुनि जाय झोक

वृक्षतळी कोण उभ्या या वेगा थोपाविती ?
फिरणा-या याचकां परि त्यांची नाही क्षिती !

वस्ति नाही गांव नाही वळण घाट काही नाही
थांबण्याची याचकां अजिबातची संवय नाही

फक्त त्यांस एक ध्यास पैलतीर गाठणे
मुचकुळल्या शतजीवीं  नवजीवन ओतणे

मग कशास थांबावा वाटेमधि तो उगाच
जीवनास थांबावा मृत्युपाशी एकदाच

तोवरि सरि घाई करी सुटलीजीवन सरिता
वेगाला धुंदी नवी अन् कठोर अस्मिता

झरझरझर सरसरसर मार्ग विरे पटपटा
वेगाला धुंदी नवी अन् कठोर अस्मिता

(१९६४)

सखे

थांब थांब माझ्या सखे
नको अशी दूर जाऊ
कातळाच्या काठिण्याला
असा तडा नको लावूं

थांब थांब माझ्या हृदये
कसे जाववे गं तुला
जीवघेणी ही दूरता
कशी साहवे गं तुला ?

मला विसर म्हणशी
बोल ओठांतला खोटा
ओल्या रात्रींत विरल्या
तुझ्या माझ्या दोन वाटा

(१९६८)

पांखरूं

मनपंजरी अवचित येते तुझ्या स्मृतीचे मुग्ध पांखरूं
आर्तस्वरांनी साद घालते सांग त्या मी कसे आंवरूं
स्वरसंगम किती मधुर तयाचा मदीय जीवा सदा भुलवितो
एकांती परि आज मात्र तो मम हृदयीची तार छेडितो

तुझे नि माझे हास्य धराया सुरम्य निर्झर उसळी लहरी
निळ्या फुलांचे सुरभित लाघव मृदुल तृणांची नीज लाजरी
मनीं आठवुनि सारे सारे आज भावना अशी बावरते
तुझ्या स्मृतीचे मुग्ध पांखरूं आर्तस्वरांनी तसेच घुमते

(१९६४)

भेसुर रात्र

ती गेली भेसुर रात्र अन् काळोख निस्सीम संपला
काळास दावुनि वांकुल्या क्षणएक अमृत थांबला

त्या क्रूर शापित वल्गना आता न त्यांची वास्तही
निघृण त्या निराशा राहे न त्यांचा गंधही

सत्याची ही कवाडे खुलली सदाच साठीं
माहीत नाही त्यांना भयभीत आडकाठी

आला अहा समीर उठवी खगोली स्पंदना
आकाशीं चित्रे रंगुनी सांगून जाती वेदना

ग्वाही दिली नि त्यांनी नाही कधी निराळा
त्या शुभ्र गंधी श्यामली अणुरेणु त्यासी अर्पिला

पुष्पास टाकोनी कसा झेपेंत गंध जाई ?
ज्याने तयासी निर्मिले त्यावीण कांहीं नाही !

चिंता कशास आतां भूतांत जे निमाले ?
वर्षी नव्या तुझ्या मी हृदयीं विलीन झाले

(१९६९) 

बोडके डोळे

दुडदुडत्या रस्त्यांत सळसळत्या पानांत
भिरभिरत्या पाखरावर लवलवत्या पानावर
दवाच्या बिंदूंत फुलाच्या अंगांत
हिंदोळ्या झांवळीवर प्रमदेच्या ओठावर
जीव का रे तुझा ? जीव का रे तुझा ?

पोक आल्या क्षितिजाचा खारवलेल्या सागराचा
काळ्या काळ्या शेणानं सारवलेल्या रात्रीचा
गहन-गूढाला उगाचपणे उकलणा-या पहाटेचा
भेसूरल्या शांततेचा दिशाशून्य जगद्गतीचा
ध्यास का ते तुला ? ध्यास का रे तुला ?

असे वेडे वेडे वारे नको खुळ्या झुलवूस
शून्यामधल्या पोकळीत उगी नको कुरडतूस
पुढे कर दोन हात दे एकाने घे एकाने
विश्वाचे हे गूढ कोडे सुटते इतक्या सहजतेने
म्हणून म्हणतो हत् वेड्या... सरक बघ, सरळ जा

(१९६९)

हिप्पी

तुझी जवळीक मना जरा वाटते कठोर
परी तिच्यावीण नाही जीवनाचे गे उत्तर

भीड म्हणून म्हणतो भवितव्य तू उत्तुंग
परी कवणासी भल्या बु-याचा गे थांग ?

मन ओले ते करावे शिरशिरा वारा प्यावा
रक्त बधीर करावे मेंदू झिंगून सोडावा

अंग पूर्ण सैलावून पिसे गीत उन्मळावे
दशदिशांना धरून गरगरा फिरवावे

सर्व सर्व केले तरी जरा वाटते तो उणे
तुझ्या मात्र सगवित सर्वस्वाचे पुरे लेणे

(मे, १९६९)

ओल्या ओल्या वाळूंत


ओल्या ओल्या वाळूंत
तुझे नांव कोरताना

कणन् कण थरारतो
आनंदाच्या उर्मींनी

ओल्या हिरव्या वा-यांत
तुझा स्पर्श अनुभवतांना

लाजेनं लावलेल्या पापण्यांना दिसतं
ओठांवरचं अनोखं हसूं

गंधमधुर पहाट लेवून येते
तुझ्या हास्याची सुराभित वसने

मिटल्या पापणीत उमलतात
सोनेरी क्षणांची अदमुरी स्वप्नें

पूर्वेला उमटतं प्रकशाचं पहिलं पाऊल
गगनधरेच्या ओठांतून झिरपलेल्या

अमृतगारव्याला कवळत
अन् आसमंत उजळतो

तुझ्या आठवणींच्या स्निग्ध तेजांत

(१९६४)

ना तुला अन् मजही आली

ना तुला अन् मजही आली
खाज ती करिता पुरी
विश्वामित्र हि नारदा जी
करुनी गेली बावरी ||१||

तू मला अन् मी तुला
का स्वप्नीं ऐसे पाहतो ?
मध्यरात्रीच्या निसर्गा
मधुर स्मृतीनें गाडतो ||२||

वायुच्या मधुमुग्ध स्पर्शे
लाटही फेसाळते
पण तुझ्या त्या सुप्त स्मृतीने
रक्तही साकाळते ||३||

थंड माझ्या भावनांना
वाफ आली कोरडी
मुक्त माझ्या कल्पनांना
आडवी ती हरघडी ||४||

धुंदल्या माझ्या मनाला
मधुर शब्दही बोचती
अन तयातिल वासनांचे
गुप्त कप्पे खोलती ||५||

कोण तूं कुठलीहि याचा
थांग पत्ता ना मला
मूर्ख मी म्हणुनी खुळा हा
ध्यास मनी शिलगाविला ||६||

(१९६४)

तुझें हृदय जाणण्या

तुझें हृदय जाणण्या
शब्दकळ्या शोधियल्या
होत्या लाजलेल्या, सखे,
नाहीं कधी उमलल्या ||१||

कर करांत गुंफतां
ओठ अस्फुट हंसले
परी चांदणे बोलेना
गीत नाही साकारले ||२||

मिठीमध्यें विसावशी
तरी बोल लाजलेले
ओठांतून अमृतानें
गूज परी सांगितले ||३||

(१९६८)

हांसतोस ओठातून


हांसतोस ओठांतून हृदय न धरी धीर हे
नयनांतून माझिया हास्य तुझे ओघळू दे ||

खेळवती अस्फुट स्वर
स्मितलहरी अधरांवर
गीत स्वरांतून मधुर मम ओठी उमलुं दे ||

इवलीशी जुइकळी
स्पर्शत ही अंगुली
मोहकसा हा चाळा कचपाशीं गुंतू दे ||

मुरड नको भृकुटीला
बंध नको नजरेला
तव स्पर्शे हृदयीची मुग्धवेल बहरु दे ||

(१९६७)

पाश रेशमी


पाश रेशमी मत्प्रीतीचे
तुला न खुपतिल, तुला न रुततील
खड्ग घेउनी सामर्थ्याचे
अखंड स्फूर्ति तुजला देतील ||१||

मनोमनाची भावमाधुरी
हृदयीची हृदयांतच ठेवीन
दबलेल्या अन् या आशांचा
स्वप्नामध्यें स्वर्ग उभारीन ||२||

देव कुणाचा होई परंतु
एक आणखी एकच आशा
हृदयराउळी सदैव तुझिया
माझ्या स्मृतिचा धूप जळावा ||३||

(१९६५)

नाते अपुलें

या हस-या नभपुष्पांना
क्षण मिळेल सुंदर वाणी
गुंफतील मधुर स्वरानें
प्रीतीची आपुल्या गाणी ||१||

अन तृणपर्णांतुन हिरव्या
कोवळे शब्द पालवले
इवल्याश्या हलवित ओठां
सांगतील नाते अपुलें ||२||

ही मिळेल अदभुत जादू
जर कधी भाबड्या वा-या
प्रीतीचें गुपितचि अपुलें
दरवळेल दाही दिशांना ||३||

(१९६४)

प्रीत

तुझी नि माझी प्रीत चिरंतन
दु:ख, मरण तिज धजे न स्पर्श
तिला न कसले भय वा बंधन
तुझी नि माझी प्रीत चिरंतन ||१||

तिला न रुचती भंगुर नाती
प्रीतीची प्रीतीवर प्रीती
श्वासोच्छ्वासी तिच्या स्फुरतसे
अभिन्नतेचे अखंड स्पंदन
तुझी नि माझी प्रीत चिरंतन ||२||

तिला नित नवें शाश्वत जीवन
तिला मोहवी विहंग गायन
तृणपर्णांतून नितळ दवांतून
तिला लाभते नित संजीवन
तुझी नि माझी प्रीत चिरंतन ||३||

(१९६४)

शिकविलेस मजला

शिकविलेस तूं मजला
अस्फुटशा ओठांतून
गीत कसे गुंफावे
मोहकशा शब्दांतून ||१||

शिकविलेस तूं मजला
धुंद, गूढ स्पर्शांतून
गंध कसा बोलांनो
आणावा हृदयांतून ||२||

शिकविलेस रंगांतून
विश्व नवे उजळाया
अंतरीची आंच पुरी
आर्त स्वरीं ओताया ||३||

शिकविलेस अर्पाया
जीवन प्रीतीस्तव
रम्य चांदण्यात, अहा
विसराया देहभाव ! ||४||

शिकविलेस हे सारें
शिकविलें न एक तूं
जीव कसा जगवावा
तुजवांचून, तुजवांचून ! ||५||

(१९६३)

Dec 15, 1970

ओठ पाकळ्या मिटतां

ओठ पाकळ्या मिटतां मना आहे ही जाणीव
पुढे स्मरायचे फक्त ओठांतील गोड भाव

मिठी गळा घालताना आहे हृदया माहीत
मिठीतील अधीरता पुढे स्मरायाची फक्त

आहे आज वाट एक कक्षी विसावला हात
पुढे वेगळ्या वाटांनी सजवायचे जीवित

आज प्रीतीच्या प्रवाही एकएक झाले सूर
पुढे आहे आळविणे दूरतेचे आर्तस्वर

जीवनी या साथ देणे अन्य कोणा जीवा जरी
काय लुटू नको तरी तुझ्या सुरांची माधुरी

तुझ्या स्वरांची शिदोरी माझा तोल सांवरील
तेज कोमल प्रीतीचे मला मार्ग दाखवेल

गोड स्मृती त्या गीताची पुढे होईल सखया
माझ्या भागल्या जीवाला तोचि विसावा विसावा

Dec 14, 1970

अधर

एक मला अन् एक तुला

ही अमृताची देवघेव
थांबेचिना संपेचिना

धुंद ही नशा की
समजेहि ना उमजेहि ना

हा पुष्पराजीचा फुलोरा ?
कां गंध ? त्याची सावली ?

ही मुग्धमधुची कर्णिका
की लहर त्याची शिरशिरी ?

दे इंद्र्धनूचें भिंगरंग
कां लहरी त्याच्या सरकत्या

हे क्षितिज चुंबित जल अथांग
कां थेंब त्याचा टिपुरसा ?

हे मूढ मम हृदयातले
गूढ तूं उकलून दे

हे सर्व तव हृदयातले
की चुणुक त्याची समजूंदे !

(१९६७)

Dec 12, 1970

दिलदार तुझ्या बघण्यांत

दिलदार तुझ्या बघण्यांत
कधी न दिसे गे उन्माद
स्वच्छंदी तुझ्या हास्यांत
ना लपला कधी आनंद

मितषार तुझ्या कैफाला
शालीन रेशमी अभ्रे
ते नयन रम्य लाजविती
शरदांची की नक्षत्रे

हें रोमरोमीचे न्यास
भुकेविण मागुन जाती
फक्त एक प्रकट करावा
मृद्गंधि मोकळी प्रीती

तनु कशी बावरी बाई
जांभळ्या नभीची कोर
केतकी रंग लेवोनी
मोगरा फुले रंगेल

बावरत्या नेत्रांमधले
निसटते नील सांवरुनि
देतेस छटा मुद्रेला
निर्विकार घन गंभीरी

परि नटखट हा गे तीळ
मिस्कील कशाच्यासाठी
मुडपोनि वाकुल्या दावीं
बैसोनि रंगल्या ओठी
(१९६८)

याद

थडथडते दांत रवरवते अंग
बंडीत थंडी खोबरी गाल

थरथरती नजर ओषट गारवा
कसे हे असे कसे हे असे

पहाटेचा वारा भुंकत होता
भुंकत होता एखाद्या धनगरी कुत्र्यागत

त्या दिशांची लाली ती पहावत नव्हती
देत होती कसलीशी ओंगळ याद

जी अगोदर ओंगळ वाटली नव्हती

१९७०

Dec 11, 1970

प्राजक्त

बाई या प्राजक्तानं
फुलं फुलं उधळली
गो-या नाजूक देहाला
कांती केशरी शोभली
बाई या प्राजक्तानं ||१||

मेंदी रंगलेले हात
दंग फुलं वेचण्यांत
परि लबाड नजर
कुठे कुणास शोधत ?
कुणा कशास शोधत ?

ओळखीच्या पावलांची
मना लागता चाहूल
फुटे अस्फुटसे हांसू
कसे डोळे लाजतात
अधीरता अधरांत ||३||

कोण उन्हाची ही घाई
गोड गुपित फोडाया
पुष्पपाकळ्या मृदुल
सोनरंगी रंगवाया
चुम्बनांनी कुस्कराया ||४||

(१९६२)

तुझ्या पावलांचा स्पर्श


तुझ्या पावलांचा स्पर्श हा घडावा
तोच माझिया रे जिवाचा विसावा

सहज तू हि जाता जाता नेत्र थबकावे
भागलेल्या या कायेने चांदण्यात न्हावे

अस्फुटसे हास्य तुझिया ओठी उमटावे
भावसुमे गुंफित मग मी चिंतनी रमावे

पाऊस आला

नाहीशी झालेली चोरांच्या पावली
नभाच्या कुशींत विद्युत कुंथली
कुन्थण्याने तिच्या जागे झाले रान
वर होई मान सा-या प्राण्यांची
स्नायू ताठरले केस तरारले
डोळे वटारले जबडे हालले

गर्जनांनी त्यांच्या नभ कुस्करले
त्याच वेदनेने वीज जागी झाली
षार रोमांचांनी डवरून गेली
घामाच्या कैफात सादळून गेली

घामाचे जंजाळ वाढले फार
मावेनासे झाले तिच्या शरीरी

आणि त्या वेदने लाजली विद्युत
थरारली नभीं पुन्हां एकदां

संचलने तिच्या नवा रंग आला
हवेमध्ये कसा डोंब उसळला

घामाचा शिंतोडा खाली घसरला
कोणासा पुटपुटला पाऊस आला

(१९६५)

झोप


रात्रभरिच्या जागराने नीज येते पाखरा
मागती ते आसरा ||

तरि कुणाच्या मुग्ध स्पर्शे खंत नाही त्याजला
आश्चर्य वाटे मला ||

झोप ती चुरडोनि बसली माठ्ठश्या माथ्यामधि
जणु ति ना उमटे कधी ||

संजीवनीच्या शिथिल स्पर्शे लेखणी करते मजा
प्रतिभा घेई सजा ||

कल्पनांच्या दुग्ध डोही टपकली शाई निळी
कवि मनाचा घे बळी ||

कां कुणी तलवार हाती घेऊनि युद्धोत्तर
कापि ऊर्मीचे शिर ||

ना मला पर्वाही त्याची उर्मी कविची जाऊदे
रडुनी अश्रुही न्हाऊदे ||

कां मला इच्छाही झाली पाडणे पानां व्रण
शोधतो ते कारण ||

कोणच्याशा मंद स्मृतीने भावना गोंजारती
आणि हृदया उबविती ||

ऊब ही त्याचीच आहे सांगताना ‘लाजतो’
आणि आता झोपतो ||

(१९६३)

किती तुझी वाट पाहू?


किती तुझी वाट पाहूं? उन्हे आली जांभयाला
सोनचाफ्याची हलचाल डोळ्यां लागे खुपायला

किती तुझी वाट पाहू? सांज गेली रे आंबून
पक्षी सारे गप्प झाले पाहुन् अंधेरा लांबून

किती तुझी वाट पाहू? रात आली रे सराया
दमलेल्या नयनांना कोण आतां रे चुम्बाया?

झाली आहे निजानीज खुपे घड्याळ्याचें गान
पेला ओठासाठी उभा शीळ जाते वेडावून

षाsर अंधार दाटला होते कशी घालमेल
पहांटेची हाक आली तरी नाहीं रे चाहूल

दोन माडांच्या कुशीत चांद बघ घुसळला
चांदण्यांची जागा भरी नयनीची अश्रुमाला

दमले रे हांकारुन नको असा अंत पाहूं
दृष्टी निजायला गेली... किती तुझी वाट पाहूं?

(१९६५)

कुजबुज

दोन पक्ष्यांमध्ये झाली कुजबुज
उद्या पहाटेला उठायचे
पहिल्या कोंबड्याला जागे व्हायचे
दोघेही झोपले वैतरिणीच्या तीरी
कदंबाच्या शिरी घरट्याच्या उरी

थंडीने मांडला आकांत बाहेर,
घरट्याबाहेर जणु ‘सासर’
दोघेही पक्षी घरटी निजले
कोंबून घेतले उबेमधे
डोळे मिटलेले हळुच उमलले
समोर पाहिले दोहोजणांनी

काय आश्चर्य हे? काय हे झाले?
आत्ता मी कुठले रूप पाहिले?
समोर मानव कोठुनिया आला?
कसा काय आला?
प्रश्नार्थी चिन्हांचा ढीग जाहला

दोघांच्या मनात एकच प्रश्न
मानवाची काय नारी एक नर
हळुहळु प्रेम टिपले दोघांनी
चारीही डोळ्यांनी गुप्तभाषा केली
विचारांची रीघ सुरु जाहली
दोघांही वाटले ईश्वराची कृपा
थंडीसाठी ‘रगा’ त्याने धाडिले
दोन्हीही त्या काया आकृष्ट जाहल्या
दोन्हीही वेष्टिती एकमेका

थंडी पार गेली नवी उब आली
रात्रही सरली हळुहळू
परंतु दोघे झोपलेले होते
थंडीमध्ये ‘ध्येय’ गोठले होते

(बाबांची पहिली कविता, १९६२)

निसटत्या संध्याकाळी

निसटत्या संध्याकाळी जरा पंखात शिरावे
आणि त्यांच्या स्पंदनाने थोडे नभ कुस्करावे ||

निळ्या रेशमी तंतूंचा पसरला हा रुजामा
त्याच्या पूर्वपश्चिमेला रुप्यासोन्याचा मुलामा ||

लगबग ही वा-याची जाई कसा बावरून
केशराचा तो कल्लोळ असा बुडाला पाहून ||

षार अंधा-या आकाशी कोण आल्या ह्या अस्मिता?
जणू नंदनवनांत रेलणा-या ह्या सुस्मिता ||

ओला दुधाळ रवाळ जसा अमृताचा फेस
सडा शिंपीत तयाचा येतो रोहिणीचा ईश ||

आता झोंबणारी हवा आणि काळेरा एकांत
सृष्टी रंध्ररंध्रातून देते हुंकार प्रशांत ||

नाही आता धागधूग कशाकशाची कोणाला
नाही उरली काळजी कोणाच्याही जाणीवेला ||

समाधानाच्या निश्वासी सारे मोकळे विपाश
द्वंद्वातील सारे झाले जणु निर्लेप आकाश ||

(१९६६ साली शाळेच्या नियतकालिकात छापून आली.)

Aug 30, 1970

भास्वतीस

काय आज वाटले ते कसे तुला सांगू राजा
ओल्या रसार्द्र भावना ओथंबती मन:स्पंजा

अरे छकुल्या तान्हुल्या माझ्या प्रियेच्या पाडसा
तुझ्या स्वर्ग्यंग हास्याला चन्द्रबिंबाचा कवडसा

अशा नाजुक देहाची मातृहृदयाला ओढ
कशी दाठरते ऊर वेडे पिसे प्रेम द्वाड

काय जगाचे हे कोडे हास्य फुटे विचारांती
जिथ हृदय ओतले विपाकाची परी भ्रांती

तुझे हांसू आणिआंसू समजतो आम्ही वेडे
तरी सोडवी ना कोणी भावनांचे तुझ्या कोडे

व्यवहारि ह्या जगाची कीव पोर ही ना करी
येथे वेडे सानथोर लक्षपूर्ण ध्यानी धरी

कोण कोठून आलीस कांसयासी येणें येथ
काय भवितव्य तुझे माझ्यासंगे कां ही गांठ ?

कांहीच ना मज ठावे तरी म्हणतो तू माझी
काय याहून असावी खुळी मूढ पितर तुझी ?

सत्य संस्काराचे एक तुझे लागतो मी देणे
परी तुझ्या हांती थोडे काय निवडून घेणे

अशी पराधीन पोरी समजले कां तू माझी ?
स्वातंत्र्यात, मुली, भेटें पूर्ण घनानंद राजी

ध्यानी येई तान्ह्या माझ्या म्हणे काय तुझा तात
ज्याच्या तेजाला सांभाळी भाग्यशाली तुझी मात

आजी आजोबा हे काका आत्या पणजोबा तुझे
पुण्य त्यांचें तुझ्या मागे परी हे ही भाग्य तुझे

शब्द अफाट वाढले परी तात्पर्य एकले
जगासंगेची जो वाढे त्याने स्वत्व गमावले

बाळे शांत तुझे चित्त सदा कौमुदास चाखो
तुझे सत्वशुद्ध भान अहर्निश तुला राखो

तुझी नित्यमुक्त वृत्ती देवो तुला विरंगुळा
समाधान गाभा लाभो कधी होवो न निराळा

तुझी प्रत्येक चोदना श्रुतिप्रणीतचि असो
उत्तरायु सख्या तेंही याची प्रेरणेचे असो

काय याहून मागावे देवापाशी ना आठवे
किती दिले दिले तरी खरे प्रेम कां आटावे ?

(श्रावण वद्य दशमी, शके १८९२) 

Jan 20, 1970

पहाटवारा

पहाटवारा पहाटवारा अबंध त्याचा नूर निराळा
क्षणि एकांती रानफुलांशी क्षणांत फुलवी रम्य पिसारा
पहाटवारा पहाटवारा ||

षार रेशमी त्याच्या टापा बेभानपणे पुढती धांवें
जाई परंतु मागे ठेवी खिंदळणा-या हिरव्या लाटा
पहाटवारा पहाटवारा ||

मूक गूढ कांहीं न त्याकडे प्रमदेचे गर्भाद्रित हांसू
दुग्ध धुक्याच्या प्रावर्णामधि घेऊनि पुढती जाई झरारा
पहाटवारा पहाटवारा ||

कोमल नाजूक ओठावरती चंचल मिस्किल नेत्र लावुनी
ताण भिरभिरी उगांच घेऊन गंध पसरवी स्निग्ध शिरशिर
पहाटवारा पहाटवारा ||

पहाटवारा पहाटवारा त्यास न ठाऊक आळशीभ्रांती
द्वंद्वाच्या पलीकडे पोचवी मूढशोक गुलजारी निद्रा
पहाटवारा पहाटवारा ||

रुबाब त्याचा खुपे न डोळ्या गर्ववर्ज्य उन्मत्त सिंह हा
बेगुमान त्या पाउलांमध्ये निराशेस विकढोर दरारा
पहाटवारा पहाटवारा ||

मार्ग न त्याचे छुपे नि भेकड प्राणशून्य त्याची ना फडफड
फोफावत भरधांव येऊनी आकांक्षा शिड फुगवी टरारा
पहाटवारा पहाटवारा ||

चंद्र अंशू आले हे झिरपत निळ्या नभाच्या पडद्या उलगत
गंभीरास चैतन्य देऊनि अथांग विश्वी भरुनी उरला
पहाटवारा पहाटवारा ||

क्षितिजाच्या पलीकडून येई अबोल परि करि विश्व बोलके
तृणपर्णांची कोमल भाषा समजुनि देई सागर गीतां
पहाटवारा पहाटवारा ||

अजिंक्य त्याची रेशमी शक्ति सर्वरसांनी सर्वगतींनी
मंजूर केली त्याची सत्ता विश्वचक्र जो फिरवी गरारा
पहाटवारा पहाटवारा  ||

अभान वारा अक्रूर वारा वेडा वारा बुलंद वारा
भव्याच्या मर्यादा रेषा नकळत उसवुनी जाई झरारा
पहाटवारा पहाटवारा ||

(१९६८)

Jan 19, 1970

अभंग मूर्त

स्वप्नासम नभीं तारे विरले
सोनगुलाबी छटा लहरली
नीजधुक्याची क्षणीं झटकोनी
अवखळतेनें वसुधा हंसली

धुंद कळ्यांचे नीरसे हांसे
स्वैर वायुची नाजूक फुंकर
तृणबाळांची मिळी पदतली
ओली चाहूल होती ज्यावर

धुक्यातील ती हिरवी माया
उरे आज पण फक्त तवंग
नेत्रे टिपली हृदये जपली
तुझी मूर्त परि असे अभंग

(१९६२)

Jan 1, 1970

तुझ्या अमृत मनाचे

तुझ्या अमृत मनाचे
बोल सुंदर कोवळे
लाडलाडल्या शब्दांचा
गंध गोड दरवळे ||१||

शब्दरसांत रंगले
धुंद गंधात गुंतले
सूर सूराला जुळतां
माझी नाही मीं राहिले ||२||

दृष्ट हीन दुनियेची
शब्द रंग विसरले
शोधी हरपला गंध
विष अमृताचे झाले ||३||

हृदयीच्या वेदनांनो
नका पाझरु डोळ्यांत
कण अमृताचे शोधा
अशा जहरी बोलांत ||४||