Aug 27, 2019

भूताचे स्थळ

काल मला भूताची मावशी भेटली होती
गो-यापान भाच्यासाठी स्थळे शोधत होती

भाचा तिचा गेल्या जन्मी होता पंतप्रधान
गावात म्हणे त्याचा आहे घरोघरी मान

उंच उंच पिंपळावर बंगली त्याची मोठी
बंगलीच्या दारापाशी नैवेद्याची वाटी

नैवेद्याच्या वाटीमध्ये झणझणीत काही
रोज रात्री घेऊन येते गावामधून कुणी

गच्चीच्या अवतीभवती पाकोळ्यांची गस्त
दुश्मनांचा छळ करतील सासूबाई मस्त

पारंब्यांच्या जाळीच्या झोपाळ्यांच्या बागेत
लटकत लटकत झोके घेतील सूनबाई मजेत

शोधा कुणी भूतासाठी गोरी गोरी नवरी
थोडी मूर्ख चालेल पण नको बाई नकटी

सूनबाई चपळ हवी हलकीफुलकी हवी
उंच उंच उडण्याची प्रॅक्टिस् तिला हवी

जातपात पहा मात्र हडळ बिडळ नको
भाचा माझा उगाचच नरकात जायला नको

आमावस्येच्या रात्रीला कर्तव्यदक्ष हवी
भूतधर्म भूताचार पाळणारी ती हवी

भाचा म्हणे अमेरिकेत कधीतरी जाईल
तिच्यासाठी पांढरा झगा उडत घेऊन येईल

करा कुणी भूतदया शोधा जरा लवकर
भूतवंशात भूतदिवा जन्मूदेत लवकर

Aug 23, 2019

रडगंधर्वांची मैफिल

(चाल : सुखकर्ता दु:खहर्ता )

रात्रीची मैफिल रोदन गाण्याची
प्रसिद्ध पंडित रडगंधर्वांची 
जुळवा तंबोरे दोन सुरांचे 
निराशेचे आणि तक्रारींचे

खर्ज सप्तकात रडा अश्रूंनी
तार सप्तकात रडा सुरांनी 
भावाविना गाणे रंगत नाही
यथेच्छ आळवावा राग तुम्ही

अर्क विसरू नये दु:खाचा कधी
दु:खाविना राग-आत्म्याविना जीव
आरोह अवरोह दु:खाचे सोपे  
कोमल सूर सारे दर्दभरे

तान घ्या मधेच केविलवाणी
श्रोत्यांच्या डोळ्यांत वाहूदे पाणी
आलाप संपता थोडेसे थांबा 
तबलजी लावेल टीपेचा तबला

गत तोडे बांधा दु:खाचे सारे 
चुकवू नका ताल आडाचौताल 
दमलात जर तर थांबा थोडेसे
साथीदारासही रडूदे थोडेसे

मैफिलीची पूर्ती करुणाष्टकाने
मागा देवाकडे पायांची धूळ !
मैफिल यशस्वी तेंव्हाच होईल
हसणारा प्रत्येक रडत जाईल

Aug 15, 2019

आपली माणसं आणि तिकडे

परदेशातून भारतात गेल्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो : “तिकडे आपली माणसं आहेत का गं ?” ह्या वाक्यातील दोन गोष्टींचे अभिप्रेत अर्थ आज पाहूयात : “तिकडे” आणि “आपली माणसं”. केवळ मराठी भाषा येऊन हे अर्थ कळणार नाहीत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मानसिकता आणि पार्श्वभूमी असणे अत्यावश्यक आहे.

"तिकडे" ह्या शब्दाचा अर्थ बहुतांशी वेळा प्रश्न विचारणा-या व्यक्तीच्या मनातली अमेरिका हाच असतो. म्हणजे बरेचदा न्युयॉर्क किंवा कॅलिफोर्निया. तिथे त्यांच्या ओळखीतला कुणीतरी कधीतरी गेलेला असतो. कंप्युटर इंजिनीअर म्हणून, नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी किंवा शिक्षक म्हणून. “तिकडे सगळे भारतीय पदार्थ मिळतात” ह्याचा अर्थ कॅलिफोर्नियातील काही गावांत काही भारतीय पदार्थ मिळतात असा असतो. मग तुम्ही जपान किंवा कोरियातून जरी परत गेला असाल तरी “तिकडे” चा अर्थ अमेरिकातला एक बारीक तुकडा असाच असतो. ह्या खेपेस कॅनडातून पुण्यात गेले तेंव्हा मला एक नवीनच पण मजेशीर प्रश्न विचारला गेला : “तिकडे चितळ्यांचे दूध मिळते का गं ?”

आता “आपली माणसं” ह्या शब्दप्रयोगाकडे वळूयात. प्रश्न विचारणा-याच्या पार्श्वभूमीनुसार “आपली” ह्या शब्दाचा अर्थ आपणच ओळखून उत्तर द्यायचं असतं. ह्या आपलीचे अनेक अर्थ असू शकतात: भारतीय, मराठा, हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण, मराठी भाषिक, इत्यादी, इत्यादी. ह्या लोकांच्या शब्दकोशानुसार बहुतांशी वेळा माणसे आपली आहेत की नाही हे त्यांच्या जन्मस्थानावरून , नावाआडनावांवरून, रंग, धर्म, आर्थिक सुबत्ता, इ. गोष्टींवरून ठरत असते. आणि मग आपली माणसे आहेत असे सांगितल्यावर प्रश्न विचारणा-यांना कमालीचे हायसे वाटते. जणू काही माझ्याविषयीची काळजीच संपते. जणू काही आता मला परदेशी कोणतीच अडचण भासणार नाही ह्याची त्यांना ग्वाही वाटते. आणि आपली माणसे नाहीत असे जर सांगितले तर त्यांना माझी चिंताच वाटू लागते. जणू काही मी एका निर्जन अरण्यात अन्नपाण्याविना काळ कंठत आहे असे त्यांना वाटते. अशावेळेस  "बिच्चारी!" असे मनात म्हणून ते दयेने माझ्याकडे बघतात.

लोकहो, होय, मी एकविसाव्या शतकातले आणि मोठ्या शहरांमधलेच अनुभव सांगत आहे. अगदी उच्चशिक्षित आणि अनपढ, कुणीही मला हाच प्रश्न विचारतात : “तिकडे आपली माणसे आहेत का गं ?” काही वेळा प्रश्न विचारणारा कुतूहल म्हणून हा प्रश्न विचारतो असे वरवर तरी वाटते. पण बरेचदा वरवर साधे दिसणारे हे प्रश्न रेसिस्ट असतात. त्यावेळेस हा प्रश्न विचारणारा माणूसच त्या वेळेपुरता “आपला” नाही असे क्षणभर वाटल्यावाचून रहात नाही.

Aug 14, 2019

एकच चूक


नवे कोरे नाव घेऊन नवीन देशात निघून गेला
नवीन गावात घर घेऊन नवे जीवन जगू लागला
नव्या गावात सारेच नवे, नवी माणसे, नवे मित्र,
नवी भाषा, नवी नोकरी, नवे काम करु लागला
नवीन घरी नवा बिछाना, नवी दुलई, नवी छोकरी
नव्याची नवलाई टिकेपर्यंत नवी झोप घेऊ लागला
                               
नव्या झोपेत स्वप्ने मात्र जुनीजुनीच पडू लागली
जुन्या गोष्टी विसरण्यासाठी आता तो डॉक्टरांकडे गेला
एक गोळी घेतल्यानंतर स्मरणशक्ती मंद झाली
नवीन भाषा, जुनी स्वप्ने, सारे काही विसरून गेला
“नवी छोकरी” पुढे येताच त्याने तिला झटकून टाकले
तिची नवीन थप्पड मात्र नवीन गाली जुनीच वाटली
                                 
पुन्हा दु:ख पूर्वीसारखेच, पुन्हा एकटे वाटू लागले
नवीन नवीन काय नक्की ? असे आता वाटू लागले
परत सगळे नवीन जुळवता कितीतरी तगमग झाली
सारे पुन्हा घडवून आणता त्याची मात्र चाळीशी सरली

                त्याची एकच चूक झाली:

आयुष्याचा रस्ता त्याला “फक्त वन वे” वाटला होता
त्याला काय माहीत की – तोच रस्ता –
वन वे, तरीही, वेगवेगळ्या वर्तुळांतून चालला होता ?