Sep 27, 2019

लागते लागते

कधीही लागते कुठेही लागते
कधीही कुठेही काहीही लागते

सकाळी लवकर उठावे लागते
खिचडी खाताना कॉफीच लागते
खाताना कशाला घाईची लागते ?
कधीही कुठेही काहीही लागते

शाळेत जाताना ही झाडी लागते !
खळखळ वाहणारी नदीही लागते
पाराशी हनुमान मंदीर लागते
कधीही कुठेही काहीही लागते

गावाच्या बाहेर शहर लागते
रस्त्यात भलतेच ट्रॅफिक लागते
खड्ड्यात जाताना गाडीही लागते
कधीही कुठेही काहीही लागते

वेळीच शाळेत पोचावे लागते
अथवा सरांची छ्डीच लागते
अभ्यासात लक्ष द्यावेच लागते
कधीही कुठेही काहीही लागते

मैत्रीण मिळण्या नशीब लागते
असलेली मैत्री टिकवावी लागते
मैत्रीण चिडता मनास लागते
कधीही कुठेही काहीही लागते

घरी येता जाम भूकच लागते
तेंव्हा मात्र मला आईच लागते
गरम पोळीशी तूपही लागते
कधीही कुठेही काहीही लागते

ताईला कुणाची दृष्टच लागते
आजीला जपाचे वेडच लागते
दादाला टीव्हीचे व्यसन लागते
कधीही कुठेही काहीही लागते

निजताना डोक्याशी उशीच लागते
कुणाचीतरीच उचकी लागते
पुस्तक वाचता झोपच लागते
कधीही कुठेही काहीही लागते

स्वप्नात चोराची चाहूल लागते
दूर कुठेतरी आग का लागते ?
आगीत मला त्या झोप का लागते ?
कधीही कुठेही काहीही लागते

Sep 20, 2019

दारुड्याचे गाणे

ऐका लोकहो - ऐका हो ऐका
दारूचे गुण मी - सांगतो ऐका

थोडीशी पिऊन - गुंगच व्हाल
खुदकन् थोडे - उगाच हसाल
मनाची सोनाली - नयनी दिसेल
छोटीशी सुईही - दाभण वाटेल

भलतीच ढोसून - पागल व्हाल
घडल्या गोष्टींना - उगा रडाल
मनाची सोनाली - ढगात उडेल 
सुई नि दाभण - गायब होईल

नाही घेतली तर - होईल काय?
मनाचे भास - संपणार न्हाय 
सुई जरी सुई, सोनाली-सोनाली
अर्थ त्यांचा खरा - कळेल काय?

नाही प्याल तर - पैका वाचेल
वाचवून पैका - कराल काय?
जाणली कुणी - उद्याची बात?
कशास बचत - उगाच आज?

समज गड्या - अजब दुनिया !
पिता न पिता - भास मनास 
पांडुरंगाने - निर्माण केली
सृष्टीरुपाने - मायेची झिंग

दारुडा मी जरी - पटले ना आता? 
दुनियेचा आहे मी - खरा जाणता !

Sep 15, 2019

आजोळचे देवघर

किती अचानक जाते मन आजोळच्या वाटे
नाही चाहूल कसली सारे नकळत घडे !

झुंजुमुंजु होण्याचीही आता वाट ना बघते
उतावीळ मन माझे मला आजीकडे नेते

उष:काल झाला नाही तोच गंध मला येई
ओल्या मातीच्या अंगणी फुले प्राजक्त अंथरी

डोले तुळस अंगणी दारी आजीची रांगोळी
तिच्या सुबक रूपाला लाजे कृष्णाची कमळी

मधुमालती, शेवंती, टपोरे ते गुलाबही
देवपूजेच्या तबकी त्यांचे सर्वस्व अर्पिती

देवघरी उजळती वाती समईच्या मुखी
सारे शरीर जाळुनी देवा प्रकाश पाडती

धूप, चंदन, कर्पूर दरवळ दाही दिशां
दाह देऊन स्वत:स परिमळ देवघरी

गावातल्या घरी दारी मन थोडे हरवते
साध्यासुध्या गोष्टींचेही मनी छायाचित्र दिसे

सारे विश्व बदलते, असे कुणीतरी म्हणे... 
आजोळचे देवघर मनी तसेच राहते