Dec 11, 1971

अंगाईगीत (मेधाराणी)


माझ्या गं अंगणात | मैना गाती गोड गाणी ||
सांगा झोप नेली कोणी | मेधाराणीची ||

तिन्हीसांजा गं झाल्या | किलबिल विसावली ||
झोप कुठे हरवली | मेधाराणीची ||

पापणी जड झाली | डोळे दिसती शिणले ||
निजपाखरांचे थवे  | कुठे गेले ||

चांदाचा कवडसा | म्हणतो गं डोकावून ||
स्वप्ननगरी मिळून | दोघे जाऊ ||

जाईजुईच्या गंधानं | वारं आंदुळतं तुला ||
नीज नीज गं तान्हुल्या | मेधाराणी ||