Dec 22, 2019

उडा पाखरांनो आता

उडा पाखरांनो आता
स्थान इथे तुम्हा नाही
पंख फडफडुनी गगनी
दूर देशी जावा तुम्ही !

स्वास्थ्य इथे तुम्हा नाही
मान इथे तुम्हा नाही
मोल एका कवडीचेही
मायदेशी तुम्हा नाही

दूर देशी धरती हिरवी
मनमुराद नांदा तुम्ही
दूर देशी आभाळात
मुक्त उडा स्वच्छंदीही

दूर देशी रानामध्ये
रानमेवा खावा तुम्ही
मायदेशी धुराळ्याचे
श्वास नका ओढू तुम्ही

अन्न इथे तुम्हा नाही
पाणी इथे शुद्ध नाही
रोगराई जिथे तिथे
कर्बवायु नांदे इथे

दूरदृष्टी कोणा नाही
निर्दयता जेथे तेथे
स्वार्थ, सत्ता, संपत्तीची
हाव इथे जेथे तेथे

राज्य इथे गुंडांचे अन
कायदेही अन्यायाचे
लढा देत मायभूमी
जाल थकून इवले तुम्ही

उडा पाखरांनो आता
स्थान इथे तुम्हा नाही 

Dec 21, 2019

गोष्ट एका पतिव्रतेची


नको पाप माथी माझ्या तुला टाकल्याचे
    नको दु:ख अंत:करणी तुला सोडल्याचे

साथ तुझी देता देता बहु वर्ष झाली
   ग्रीष्म शरद सरता सरता वृद्ध तनु झाली 
हवे नको देता तुजला हरवले मला मी 
    स्वप्न तुझे माझे म्हणुनी गमवले मला मी
म्हणती मूर्ख कोणी मजला पतिव्रता कोणी

एक वेड पतिधर्माचे एक ध्येय पतिसेवेचे
    लाड तुझे करता करता भ्रष्टमती झाले
एक रात्र पाहून तुजला परस्त्री सवेही
    धजवले ना दुबळी मी, ना दिली सोडचिठ्ठी 
म्हणती मूर्ख कोणी मजला पतिव्रता कोणी

नको पाप माथी माझ्या तुला टाकल्याचे
    नको दु:ख अंत:करणी तुला सोडल्याचे
उणेपुरे सारे आयु वाहिले तुला मी
     तुझ्या दीर्घ आयुसाठी वृक्ष पूजिला मी
म्हणती मूर्ख कोणी मजला पतिव्रता कोणी

         ***(डोळे उघडल्यानंतर )***

आज वाटे सोडून तुजला वृक्ष मी पूजावे
    गर्द दाट झाडीमध्ये गाढ झोपी जावे
एक रोप लावून पुढच्या पिढ्या मी जपाव्या 
    सृष्टीचक्र फिरण्यासाठी वृक्ष हाच त्राता !
म्हणती मूर्ख कोणी मजला वृक्षव्रता कोणी

नेत्र आज उघडले माझे जरि उशीर झाला
    पतिधर्म घेण्यापेक्षा वृक्षधर्म मोठा
एक वृक्ष देतो सर्वां दाट सावली ही
    वृक्षवाढ होण्यासाठी वृक्ष वाढवावा
म्हणती मूर्ख कोणी मजला वृक्षव्रता कोणी

नको पाप माथी माझ्या वृक्ष तोडल्याचे
    नको दु:ख अंत:करणी रान मोडल्याचे
उर्वरित सारे आयु वृक्षवर्धनास
    देईन मी माझ्या खुशीने रान वाढण्यास
म्हणती मूर्ख कोणी मजला वृक्षव्रता कोणी

नको पाप माथी माझ्या वृक्ष तोडल्याचे
    नको दु:ख अंत:करणी रान मोडल्याचे

Dec 13, 2019

विसरलास का?


आपली मैत्री जुनी होती 
कोणाचीही दृष्ट लागावी अशी

गरजेच्या वेळी धावून आलास
अडले नडले पाहत राहिलास
आजारपणात मदत केलीस
चुकलंमाकलं समजून घेतलंस

आपली मैत्री जुनी होती
कोणाचीही दृष्ट लागावी अशी

लेकाला तुझ्या शिक्षण दिलं
मुलीच्या लग्नात उधार दिली
आई गेल्यावर धावून आलो
तुझं माझं एकंच समजलं

म्हटलं ना, 
आपली मैत्री जुनी होती ...

काल तू मित्र होतास, पण, 
आज तू शत्रू आहेस 
"धर्मापुढे " पर्याय नाही म्हणालास

कारण काय? तर दूर कुठे तरी 
“आमच्यातल्या” एकाने 
“तुमच्यातल्या” काहींना मारले 
  ... आणि मग ... 
अचानक तुला आठवले की 
शेजारी बनण्या अगोदर 
तू हिंदू होतास आणि मी मुस्लीम होतो 

अरे, आपण पन्नास वर्षांचे शेजारी होतो ना?
आपली मैत्री जुनी होती...
शेजारधर्म विसरलास का?