Aug 6, 2018

अनिरुद्ध

माझं नाव अनिरुद्ध आणि
माझ्या गर्लफ्रेंडचे नाव उषा. 

दिवसभर थकून भागून काम केल्यानंतर,
कधी एकदा तिला भेटीन असं मला होतं.

उषेबरोबर वेळ घालवायला मला फार आवडतं.
कधी एकदा तिला माझ्या कुशीत घेईन असं होतं.

ही उषा आहे छोट्या अंगाची,
पण फारच मऊ, लुसलुशीत आणि गुबगुबीत.

तिचा स्पर्श मला इतका हवाहवासा वाटतो. व्वा!
अनेक वर्षे मला ती प्रेमाने साथ देत आली आहे.

आयुष्यात कितीतरी चढउतार आले.
अनेक दु:खद रात्री आल्या.
पण प्रत्येक रात्री तिने मला दिलासाच दिला.

कधी चक्क तिच्या उरावर ढसढसा रडलो.
तर कधी तिला छातीशी घट्ट आवळून धरलं.

कधी ह्या कुशीवर, तर कधी त्या कुशीवर,
कित्येक भिजलेल्या रात्री
तिच्या सान्निध्यात काढल्या.

उषेसमवेत व्यतीत केलेल्या काळाला
मी साहजिकच “उष:काल” असे म्हणतो.

मी तिला भेटायला इतका आतुर
आणि आगतिक असतो, की माझा
उष:काल रात्री बारा वाजताच सुरु होतो.

रात्रीच्या गर्भातच, बेडरूममध्ये,
माझा उष:काल दडलेला असतो.

ही उषा फारच स्वतंत्र आणि उदार मतवादी आहे.
एखाद् दिवस, मी तिच्याशिवाय इतर
कोणाबरोबरही झोपलो तरी तिला ते चालते.

इतकंच नव्हे, तर ती उपस्थित असतानाही,
इतरांबरोबर निजण्याची तिने मला मुभा दिली आहे.

आजकालच्या आधुनिक युगातही इतक्या
अत्याधुनिक विचारांची स्त्री कुठं बरं सापडेल?
म्हणूनच मला ती फार आवडते.

माझी उषा...माझी उषु... माझी उषुटली...

दुसरा एक तिचा गुण मला आवडतो,
तो म्हणजे सहनशीलता.

कधी कधी रात्री मी फार जोरात
डरकाळी फोडल्यासारखे घोरतो.
त्या आणीबाणीच्या काळातही
ती मला सोडून जात नाही.

बिचारीच्या पदरावर, कधीकधी,
झोपेत माझी लाळही पडते.
तरीही ती ते सहन करते.
दुस-या दिवशी साडी बदलली की झालं!
आहे काय अन् नाही काय!
                 ...
आम्ही लग्न कधीच केलं नाही.
आम्ही “लिव्ह इन” रिलेशनशिपच पसंत करतो.

उगाचच जगाच्या समाधानासाठी आम्हाला
कागदी करार, सह्या, सप्तपदी, मंगलाष्टकं,
देवाब्राह्मणांचे आशीर्वाद, मंगळसूत्र, अंगठ्या,
सासर, माहेर, असलं काहीही आवडत नाही.

उषेला मंगळागौरी, झिम्माफुगडी, भोंडला,
लपाछपी, डोहाळजेवण, बाळंतपण, बोडण,
ह्या सांसारिक गोष्टींची अजिबात आवड नाही.

ती आपली स्वत:च्या खोलीतच बसून
सातत्याने रियाज व आत्मचिंतन करत असते.

एखाद्या सन्याशीणीप्रमाणे ती निर्विकार आहे.
ती कोणत्या काळातली आहे, काय माहीत?

तिला पारंपारिक गोष्टींची आवड नसल्याने
एखाद्याला ती आधुनिक आहे की काय असे वाटेल.

पण तिच्याकडे मोबाईल, इंटरनेट, फेसबुक,
काय-अप-डाऊन का काय असतं तेही नाही.

नऊवारी नेसून, नथ घालून, ती अहो जाहो करणार नाही.
पण मिनीस्कर्ट घालून, लिपष्टीक फासून यु नो, आय नो,
लाईक, ओह माय गोड, असलेही काही ती करणार नाही.

ती फक्त तीच आहे.
तिला काळाचे बंधन नाही आणि
संस्कृतीची लोणची घालायला किंवा
कृत्रिमतेचा पास्ता उकडायला
तिला जमत नाही. आवडत नाही. शोभत नाही.

माझं नाव अनिरुद्ध आहे आणि
मी उषुवर खूप खूप प्रेम करतो,
तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही.
                         ...
माझी उषा... माझी उशु...माझी उशुटली...

माझी साता जन्मांची जीवनसाथी...

माझी उशी,
तुझ्याशिवाय मी कसा आणि कुठे झोपू?

No comments:

Post a Comment