May 27, 2019

व्हतास कोन?

ती : व्हतास कोन रं, व्हतास कोन?
गेल्या जल्मी, तू व्हतास कोन?
येडा, रेडा, का रानरेडा?
इळा, कावळा, का डोंगकावळा?

तो : व्हतो बामन म्या नव्हे रावन 
नाही खायाचो मटण चिकण
द्येवाला द्याचो नारळ कमळ
वरन पुरन अन शंकरपाळं 

व्हतीस कोन गं, व्हतीस कोन?
गेल्या जल्मी, तू व्हतीस कोन?
हडळ, कुदळ, का भांडकुदळ?
बाभूळ, गांडूळ, का वटवाघूळ?

ती : व्हते कोळीन म्या नव्हे जखीन
नाही खायाचे वरन पुरन
द्येवाला द्याचे सुकं चिकण
बोंबिल वाटन अन ओलं मटण

तो : अरारा ! अरारा ! थांबीव तुझा नगारा
तुझं माझं जमनार न्हाय
भाग पोरी पळूण जाय
यकटाच -हाईन, म्या यकटाच -हाईन
ग्यानबा तुकाराम, पालखीत जाईण

व्हतीस कोन गं, व्हतीस कोन?
गेल्या जल्मी, तू व्हतीस कोन?
  
ती : हट् मेल्या, पळनार न्हाय !
तुझा माझा समंद न्हाय
भाग पोरा पळूण जाय
यकटीच -हाईन, म्या यकटीच -हाईन
पालखीच्या म्होरं म्या वरडत -हाईन

व्हतास कोन रं, व्हतास कोन?
गेल्या जल्मी, तू व्हतास कोन?

May 21, 2019

एक स्वप्न असं पडतं

एक स्वप्न असं पडतं
उंच उंच जिन्यातून,
वर खाली पळताना,
धाप लागते, श्वास अडतो,
बाहेरचा मार्ग सापडत नाही,
बाहेरचा मार्ग सापडत नाही.

एक स्वप्न असं पडतं
ह्या देशातली, त्या देशातली,
सारी माणसे पुण्यात असतात,
इकडे तिकडे भटकताना
"लिओनेल ग्रू" स्टेशन येतं
"लिओनेल ग्रू" स्टेशन येतं.  

एक स्वप्न असं पडतं
सगळीकडे पाणीच असतं,
कसेबसे तरंगताना,
इतर कुणी दिसत नसतं,
किना-याचा पत्ताच नसतो,
किना-याचा पत्ताच नसतो. 

एक स्वप्न असं पडतं
त्याचं हसणं ऐकू येतं,
काळा स्वेटर स्पष्ट दिसतो,
तिचा भास होऊन जातो,
दूर पळून जावसं वाटतं,
दूर पळून जावसं वाटतं. 

एक स्वप्न असं पडतं
विमान लवकर सुटणार असतं,
मोठा पल्ला गाठायचा असतो,
आईबाबांचा निरोप घेताना,
तुटून जातेय असं वाटतं,
तुटून जातेय असं वाटतं. 

एक स्वप्न असं पडतं
पाच क्षणांची गोष्ट मनात,
पाच तास चालू राहते,
पुन:पुन्हा तेच दिसते,
काय खरे काय खोटे,
काहीच मला कळत नाही,
काहीच मला कळत नाही. 

May 16, 2019

माझं घर

माझं घर नव्हतं
ह्या किंवा त्या देशात
माझं घर होतं
तुझ्यावरच्या विश्वासात

त्या घराचे दार जायचे
तुझ्या डोळ्यांतून आरपार
तुझ्या निष्पाप डोळ्यांत बघायचे
तेंव्हा वाटायचे अगदी सुरक्षित
आईला आणि बाळाला
एकमेकांच्या कुशीत वाटावे तसे

एक दिवस जेंव्हा
तो विश्वास तुटला तेंव्हा
माझं घर कोसळून पडलं
मी कोलमडून पडले, बेघर झाले
अनाथ होऊन अर्भकाप्रमाणे
असहायपणे रडू लागले
येणा-या जाण-या प्रत्येकाच्या
दयेचा, थट्टेचा विषय झाले

आता कशीबशी सावरत आहे
शोधते आहे असे घर की ज्याला
विश्वासाच्या पोकळ भिंती नसतील
किंवा मैत्रीचे तकलादू छ्प्पर नसेल
मी, तू, आपण, माझे, तुझे, आपले,
अशा नावांची दालने नसतील
हल्ली, त्या दालनांमध्ये मी गुदमरते

घर म्हणजे काय शेवटी ?
कणभर सुरक्षिततेची भावना
आणि आभाळाएवढे स्वातंत्र्य
तुझ्यासोबत किंवा तुझ्याविना