Jan 29, 2019

कधी करू अभ्यास?

आई मजला वेळच नसतो कसे तुला समजेल?
नको रागवू, समजून घे गं, माझे थोडे ऐक

पहाट समयी थंडी भारी झोपावे वाटते 
किलबिल पक्षी गाणे गाती ऐकावे वाटते

सकाळ वेळी हवा चांगली हिंडावे भरपूर
आजीसोबत मंदिरातही जाण्या मी आतूर

शाळेमध्ये धडा ऐकता घड्याळात मी मग्न
इतिहासाच्या सनावळींनी डोके माझे सर्द 

मध्याह्नाला भूक लागते खावेसे वाटते
भोजन होता डोळ्यांवरती सुस्ती थोडि येते

शाळेनंतर उन केवढे दमावयाला होते 
संध्याकाळी दादासंगे खेळावे लागते

बाबा येतां आठ वाजता थोडा टिव्ही बघतो
दहा वाजता आजीची मी गोड कथा ऐकतो

इतके सारे करून आई थकून मी गं जातो
सांग मला तू, कधी करावा शाळेचा अभ्यास?

Jan 26, 2019

जनरीत

दिसलीस सखे तू जेंव्हा 
नव्हते का मन था-यावर?
अन दखल तुझी घेण्याचे 
सुचले ना मजला तेंव्हा 

तू अवचित का आलीस? 
कळून का, तुलाही नकळत? 
साक्षात पुढे गत विश्व 
मन क्षुब्ध नि भावही मुग्ध

ठरवून विसरलो होतो 
ते दग्ध कलह अन तंटे 
पाहता अचानक तुजला 
तुटतुटले बांध नि संयम

आलीस तशी गेलीस 
कळून का, तुलाही नकळत? 
नजरेतून देऊन जहर 
हृदयावर कशास वार?

किती मूक शब्द बरसले 
कवितेत शोधला आसरा 
एकेक शब्द पाझरला
मल्हार मनी कोसळला

कवितेतच न्हालो भिजलो 
शब्दांतच शोधत बसलो 
निसटले भाव ओंजळीतून  
सुख कणभर अन बहु दु:ख

हरलो मी हरलीस तू ही 
ह्या क्षणिक दुष्ट संसारी 
जनरीत कुणी म्हणती ही 
कोणासच चुकली नाही

Jan 9, 2019

ठेवा

(एकता, एप्रिल २०१९ अंकात प्रकाशित)

माझ्या अल्मारीत आहे 
ठेवा अमूल्य साड्यांचा
रेशमाच्या गाठोड्यात 
गंध सुंदर स्मृतींचा  

एक साडी मोरपिशी            
मऊ मऊ नऊवारी            
पेशवाई रुबाबाची               
ऊब आजीच्या मायेची        
            
पितांबरी भरजरी
माहेरच्या अहेराची
तिला पदर अंजिरी
वेलबुट्टी मखमली  
             
पहा इंदुरी चंदेरी             
दिली बाबाने प्रेमाने          
तिची किनार वेगळी         
बाबा, तुझी याद देई          
            *
आणि आता त्यात एक
भर आईच्या साडीची...
आई गेली, तिचा स्पर्श
साध्या सुती लुगड्यात

चार साड्यांचं गाठोडं 
प्रेम आठवांचं  धन
एक एक धाग्यासंग 
देई उभारी मनास
                                   

Jan 3, 2019

पाखरू

बागडते ते फुलाफुलांवर
हासत खेळत अल्लड वेडे
अचिंत निर्भय स्वप्नाळू अन
फुलपाखरू, मन पाखरू   

गोंजारून बांधून ठेवले
धरता धरता उडून गेले 
उडता उडता ढगांमांगुनी
कधी चमकले कधी बरसले 

काय तयाचे सांगू नखरे ?
अपुरे न पुरे शब्द अधुरे 
जुन्या फुलांच्या नव्या स्मृतीवर 
भरकटले, विरघळले का रे ?

चुकले, थकले, पंख चिमुकले
सरोजपुष्पी क्षणी पहुडले
सायंकाळी नभी उडाले 
सूर्याच्या अस्ता ना फसले 

उडत राहले, उडू राहू दे 
भरकटले, भरभर भटकू दे
नव्या जगाची नव्या दिशेची 
ऊर्जा त्याला सतत मिळू दे