Oct 9, 2018

पैशांचं झाड


पैशांचं झाड मोठं अंगणात लावलं, खत पाणी घातलं – परिश्रमांचं
पैशांच्या झाडाची सावली नाही पडली, फुले नाही डवरली – वसंतात

पैशांच्या झाडाची फळे नाही पिकली, मैना नाही झुरली – विठूसाठी
पैशांच्या झाडावर घरटे नाही दिसले, पक्षी उडून गेले – आभाळात

पैशांच्या झाडाखाली मुले नाही खेळली, झोका नाही घेतला – चिऊताईने
पैशांच्या झाडावर चोर येऊ लागले, दरोडे पडले - पोलीस आले

पैशांच्या झाडाखाली हमरीतुमरी झाली, भांडणं झाली – पैशांसाठी
पैशांच्या झाडाची वाटणी एकदा केली, भाग चार केले – भावांसाठी

पैशांच्या पानांचा सडा मोठा पडला, बिल्डर वेचू लागला – मंत्र्यांसाठी
पैशांच्या सड्यामुळे बायको चिडून गेली, घर सोडून गेली – झोपडीत 

पैशांच्या झाडावर एकदा भूत दिसले, भय वाटू लागले – श्रीमंतीचे
पैशांच्या झाडावर वेताळबाबा पाहिला, भांडणतंटा झाला – मित्रांच्यात

पैशांच्या झाडाचे रोप नाही वाढले, “बी” किडकी निघाली – कुजून गेली
पैशांच्या झाडाखाली सुख नाही लाभले, त्रास मात्र झाला – झोप उडली

पैशांचे झाड शेवटी गदागदा हलवले, वाटून सारे टाकले – गरीबांना
त्या दिवशी रात्री झोप छान लागली, भूतं पळून गेली – बाधा टळली  

No comments:

Post a Comment