Oct 6, 2018

अभिप्राय

हे वाचका,
का आसुसते हे वेडे मन
तुझ्या टीचभर अभिप्रायासाठी? 
वाट पाहून का बेचैन होते, 
सैरवैर धावते, अडखळते 
तुझ्या कडू-गोड शब्दांसाठी? 
तुला काय वाटते ते एकदाचे 
सांगूनच का टाकत नाहीस? 
कशासाठी मला एवढे भीतोस? 
टाळतोस? आढेवेढे घेतोस? 
चुलीत घालण्यासारखे लिखाण 
असले तर ते सांगत का नाहीस? 
किंवा ब-यापैकी असले तर ते 
कबूल का करत नाहीस? 
तुझ्या धारदार शब्दांनी मला 
घायाळ का करत नाहीस? 
किंवा तुझ्या स्तुतीसुमनांचा 
शिडकावा का करत नाहीस?
तू काय हल्ली वाचन करणेच 
सोडून दिले आहेस की काय?
तुझ्या वाईट अभिप्रायापेक्षा 
तुझ्या शांततेतले शब्द मला 
छळतात, कठोर वाटतात
खरं सांगू, फक्त स्वत:साठी
लिहायचा मला कंटाळा येतो
नाहीतर मी रोजनिशीच 
नसती का लिहिली? काय?
तुझ्याशी संवाद साधायचाय
म्हणूनच हा सारा खटाटोप
हे वाचका, अभिप्राय देऊन 
माझी कविता सुधारण्याची 
जबाबदारी जरा घेशील का?
माझ्यासाठी नव्हे, कवितेसाठी,
एकत्र काम करायला तुझी
काही हरकत आहे काय?

No comments:

Post a Comment