Oct 12, 2018

अविवाहित

(मात्रावृत्त : सूर्यकांत, चाल : आवडतो मज अफाट सागर)

आवडते मज सुंदर जिवन एकट्याच पुरुषाचे   
स्वातंत्र्याचे उधाण आणि आनंदाचे भरते ! 

गतजन्मीचे पुण्य कोणते, असे सुख मज मिळते?  
धन्यवाद प्रभु, तुझ्या कृपेने, हेच चालु राहु दे !   

सायंकाळी घरि आल्यावर हात पाय मी धुतो
चूल पेटवुनि पातेलित ऊन पाणी तापवितो

स्नानानंतर शुभंकरोति तारस्वरि मी गातो 
भक्तीभावे देव पूजितो नैवेद्याला दूध  

त्याच दुधाचा चहा घोटभर भुरकी मारुनि पितो 
डाळ नि तांदुळ निवडुनि घेतो पाण्याने ते धुतो

खमंग खिचडी स्वहस्ताने मिटकि मारुनि खातो
गार ताक नि थंड पाणी मग गटागटा मी पितो  

शेजा-यांची लोटि भांडी गडागडा गडगडती
पतिपत्नींचि रोज भांडणे टोकाला का जाती?

वादासाठी कशास करती विवाह जगतामध्ये? 
कंटाळा का येतच नाहि त्याच त्याच तंट्याने?

छज्ज्यामध्ये डोकावुनि मि देतो पाणी झाडांना
शेजा-यांचा कवि बालक भोंगा काढि रडताना

छज्ज्याखाली तरुण पोरे विडि ओढती रस्त्यात
कशास द्यावा जन्म उगाचि खुशालचेंडु पोरांस?

कपडे बदलुन अत्तर लावुन सिनेगृहि मी जातो
नविन हिंदि पिक्चर भारि आरामात मी पाहतो

येता येता रस्त्यावरची तुडुंब गर्दी बघतो
बारा वाजता पुस्तक वाचुन गुडुSप झोपि जातो 

वाद नको मज साथ नको मज नको भांडणतंटा 
प्रेमाचे तर नाव नको मज मी शांतिचा भोक्ता

रोज सकाळि सहा वाजता आनंदाने उठतो
चहा पोहे पेपर वाचुन कामाला मी जातो

गतजन्मीचे पुण्य कोणते, असे सुख मज मिळते?  
धन्यवाद प्रभु, तुझ्या कृपेने, हेच चालु राहु दे !

No comments:

Post a Comment