Oct 3, 2018

छप्पन वेळा

एका सायकॉलॉजिस्टचे पेशंटला पत्र :

छप्पन वेळा सांगितलं की 
तिच्याकडे बघू नकोस 
तिच्याकडे बघितलेस तरी लक्ष देऊ नकोस
तिच्याकडे लक्ष दिलेस तरी तिच्या बाह्य रूपावर भाळू नकोस
तिच्या बाह्य रूपावर भाळलास तरी ते फार काळ टिकणार नाही हे विसरू नकोस

छप्पन वेळा सांगितलं की
तिचा गोड आवाज सारखा ऐकत बसू नकोस
एखाद्या फालतू सर्दीने तो आवाज बिघडू शकेल हे विसरू नकोस
तो नाही बिघडला तरी तिचा आवाज तसाच तिचा स्वभाव असे समजू नकोस
तिचा आवाज आणि स्वभाव दोन्ही गोड असले तरी तुझ्याशी ती गोड वागेल असे मानू नकोस

छप्पन वेळा सांगितलं की
तिचा विचार करू नकोस
तिचा विचार केलास तरी त्यावर रवंथ करू नकोस
त्यावर रवंथ केलेस तरी तिला ते समजणार नाही हे विसरू नकोस
तिला ते समजले तरी त्याचा तुला काहीच उपयोग होणार नाही हे विसरू नकोस

छप्पन वेळा सांगितलं की
बायकांच्या फंदात पडू नकोस
फंदात पडलास तरी तेच तुझे अंतिम ध्येय असे मानू नकोस
तेच ध्येय मानलेस तरी तुला काय वाटते तेच तिला वाटेल हे गृहीत धरू नकोस
ते तसे जरी गृहीत धरलेस तरी सगळे तुझ्या मनासारखेच होईल असे कधीच समजू नकोस

छप्पन वेळा सांगितलं की
मी काय सांगते तोच अंतिम उपाय असे समजू नकोस
मला तुमच्या परिस्थितीचा अंदाज बांधण्याखेरीज दुसरे काहीच येत नाही
मी तुमच्या परिस्थितीचा अंदाज बांधला तरी तुझी समस्या मी कधीच सोडवू शकणार नाही
तुझी समस्या माझ्यापुरती मी सोडवली तरी त्यामुळे तुझ्यासाठी ती व्यथा दूर होईलच असे मानू नकोस

No comments:

Post a Comment