Jul 13, 2018

माधुरी

आज ती भेटली. तब्बल एकतीस वर्षांनी. होय तीच ती, माधुरी. माझी बालमैत्रीण. जिच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालो. जिच्यासोबत मी लहानपणी तासंतास घालवायचो. जिच्यासाठी मधल्या सुट्टीत जेवायचे थांबायचो. जिला काला खट्टा बर्फाचा गोळा प्रेमाने खाऊ घालायचो. जिच्यासाठी चोरून चोरून घरून लिमलेटच्या गोळ्या खिशात बांधून न्यायचो. आणि जिच्यासाठी आजीशीही कधीतरी खोटे बोलायचो. जिच्या हट्टापायी उंच उंच झाडांवर चढून चिंचा कै-या पाडायचो. ती अन् मी शाळेत एकाच बाकावर बसायचो. जिच्याशिवाय दुसरी कोणती मुलगीच मी ओळखत नव्हतो, अगदी आजकाल पर्यंत. जिच्या रंगारुपाने मी पार घायाळ झालो होतो आणि जिच्या गुणांवर मी भाळून गेलो होतो. तीच ती माधुरी, माझी सखी. माझी बालमैत्रीण. आज भेटली.

तिचे ते कुंदकळ्यांसारखे दात, तिचे ते मधुर हास्य. सावळाच रंग पण तरतरीत नाक, लालचुटुक ओठ, सडपातळ बांधा, काळेभोर दाट केस, लाघवी स्वभाव, नावाला साजेसा गोडगोड आवाज आणि कुशाग्र बुद्धी. सारे काही तसेच होते. जणू काही तीस वर्षांच्या उन्हाळ्यापावसाळ्यांचा स्पर्शही तिच्या त्या सौंदर्याला झाला नव्हता. कुठ्ठे कश्शाला नाव ठेवायला जागा नव्हती. आजही ती विशीच्या तरूणीसारखीच मोहक दिसत होती. अगदी तीन मुलांची आई असली तरीही.

वर्षानुवर्षे तिला भेटायची, तिच्यापाशी मन मोकळे करण्याची वाट पाहत होतो. रात्रंरात्र तिच्यासाठी जागवल्या. इतकी वर्षे सडाफटिंगच राहिलो. तिच्याच आठवणींत जगलो. शेवटी आज एकदाची ती भेटली. आषाढी एकादशीला, भर दुपारी तीन वाजता. जोगेश्वरी जवळच्या चहाच्या दुकानात. पु-या एकतीस वर्षांनी. तेच ओठ, तेच हसू, तोच मधुर आवाज, तीच भेदक नजर, तीच कुशाग्र बुद्धी, तेच सौंदर्य, तीच बालमैत्रीण, तीच माधुरी, पण... आज तिला भेटल्यावर काहीच कसे वाटले नाही?

चहाचा कप संपेस्तोवर नुसते हुं हुं करत बसलो. चहा किती गोड झाला होता. पाण्याऐवजी जिलबीच्या पाकातच जणू केला होता. आणि चहाच्या पुडीपेक्षा वेलदोड्याचीच पूड जास्त टाकली होती. चहा कसला तो, जणू वेलदोडी स्वादाचा जिलबीचा गरम पाकच! चहा नाव असले तरी तो चहा वाटत नव्हता. अन् माधुरी नाव असले तरी ती माधुरी वाटत नव्हती.

काय त्या कंटाळवाण्या सांसारिक गप्पा करत होती. चहासारख्याच गोड गोड पण अगदी नकोशा. काय तर म्हणे, नवरा कर्तबगार आहे. काय तर म्हणे, मुले खूप हुशार आहेत. नोकरी छान आहे अन् पगार उत्तम आहे. सासर प्रेमळ आहे. गाडी अमकी आहे, बंगला तमका आहे अन् जिथे राहते तो परिसर ढमका आहे. असेना का, मग मी काय करू? हो आणि हे पण म्हणाली की ती सुखी आहे. आता मात्र कमालच झाली! किती खोटे बोलावे एखाद्याने! इतक्या वर्षांत आयुष्याबद्दल ही काय नक्की शिकली? खरंच ती सुखी आहे, की मिळाले त्या आयुष्याला ती "सुखी आयुष्य" म्हणत आहे? काही का असेना! चहाचा एक घोट घशाखाली उतरत नव्हता अन् तिचा एक शब्दही ऐकावासा वाटत नव्हता.

हीच का ती माधुरी? ती  बालमैत्रीण? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला. बापरे! ती तीच होती. तीच सुंदर माधुरी. आता एक्कावन्न वर्षांची. बालमैत्रीण असली तरी ती माझी कधीच नव्हती. एखाद्या चित्रपटातल्या नायिकेसारखी ती खोटी खोटी वाटत होती. काल्पनिक, सुंदर, मनमिळाऊ, पण माझ्यापेक्षा भलत्याच विश्वात वावरणारी.

चहा संपला. माधुरी गेली. मला मात्र आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली. तब्बल एकतीस वर्षांनी.

No comments:

Post a Comment