May 1, 2019

मी जुना पुराणा

लोटले मास कितीतरी लोटली वर्षे
ना कुणी पाही मजकडे वळूनी येथे
एकटा बिचारा कंटाळून मी गेलो
पानापानांचा हिशेब ठेवीत बसलो

त्या दिनी पाहिली हुशार मुलगी एक
मन उत्सुक झाले पाहून तिला आपसूक 
परी लक्ष न देता ओलांडून ती गेली
कुठल्या डबड्यावर बटणे दाबीत बसली

वर जाता जाता धक्का लावून गेली
मम जीर्ण तनुची शकले शकले झाली
मी जुना पुराणा ग्रंथ जीर्ण पानांचा
शतकांपूर्वीचा वृद्ध नकोसा आता

कधी कुणी विदेशी छायाचित्रे काढी
जगभरात माझ्या इतिहासाची गाणी
परी आशय माझा समजेना कोणाला
मी जुना पुराणा ग्रंथ जीर्ण पानांचा

No comments:

Post a Comment